Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी

मुंबई – सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईत २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. देहली येथे कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला.

१. मुंबई पोलिसांकडून जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. २३ जुलैच्या मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून ६ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.

२. ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई असणार आहे. कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीवर बंदी असेल. मिरवणुकींमध्ये ध्वनीक्षेपक, वाद्ये, बँड वाजवण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी असणार आहे.

मुंबई पोलिसांचा आदेश –

३. अंत्यसंस्कार सभा आणि स्मशानभूमी / दफन मार्गाच्या मिरवणुकीवर बंदी नाही. आस्थापने, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटना यांच्या कायदेशीर बैठकावर बंदी नाही. सामाजिक मेळावे, क्लब, सहकारी संस्था, सोसायट्या आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्यासाठीच्या बैठकांवर बंदी नाही.

हे वाचा → ‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले

४. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, दुकाने, कारखाने आणि नियमित व्यावसायिक कामकाज यावर बंदी नाही.

५. संमेलने आणि मिरवणुका ज्यांना विभागीय पोलीस उपआयुक्तांनी अनुमती दिली आहे, त्यावर बंदी नसेल.