मराठी भाषा जतन आणि संवर्धन यांसाठी प्रभावी कृती आराखडा राबवा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – मराठी भाषा, साहित्य आणि बोलीचे जतन आणि संवर्धन यांच्यासाठी प्रभावी कृती आराखडा सिद्ध करून त्याची कार्यवाही करावी, तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता अन् परिणामकारकता यावी, यासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकींचे वेळापत्रक आगाऊ निश्चित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते. मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांसह अन्य मान्यवर प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

तंजावर येथील मोडी लिपीतील सुमारे १५ लाख ऐतिहासिक कागदपत्रांच्या ‘डिजिटायझेशन’ प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला, तसेच लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात येणार्‍या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याविषयी चर्चा झाली.

मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी ७५ ‘आंतरराष्ट्रीय बृहन्महाराष्ट्र मंच’ उभारण्याची प्रक्रिया चालू आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापिठात कुसुमाग्रजांच्या नावाने अध्यासन केंद्र, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू करण्यात आला आहे.