‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांचा आध्यात्मिक इतिहास पहाणार आहोत. या लेखात आपण भारतीय कलांच्या निर्मितीविषयी समजून घेऊ.

(लेखांक ११)

भारतीय कलांचा देवीदेवतांशी असलेला संबंध !

‘या लेखाच्या मागच्या भागात आपण संगीताचे आराध्य दैवत भगवान शिव आणि ब्रह्मदेव यांचा कलांशी असलेला संबंध जाणून घेतला. आता या भागात आपण भगवान श्रीविष्णु, श्रीकृष्ण, रामभक्त हनुमान आणि गणपति यांचा संगीताशी असलेला संबंध जाणून घेणार आहोत.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/990406.html

३. भगवान श्रीविष्णु

३ अ. श्रीविष्णु आणि संगीत

१. वैकुंठात शेषशैय्येवर पहुडलेल्या भगवान श्रीविष्णूला ‘संगीत’ अत्यंत प्रिय आहे. विविध धार्मिक ग्रंथ आणि पुराणे यांमध्येही ‘श्रीविष्णूला सामगान प्रिय आहे’, असा उल्लेख आढळतो.

२. कर्नाटकातील संत पुरंदरदास यांनी ‘वेंकटाचल निलयम् वैकुंठपूर वासम्’ ही रचना केली आहे. त्यात व्यंकटेशाचे, म्हणजेच श्रीविष्णूचे वर्णन आहे. त्यातील दुसर्‍या कडव्यात त्यांनी म्हटले आहे, ‘तुम्बुरू नारद गान विलोलम् ।।’, म्हणजे ‘तुंबरू आणि नारद यांच्या गायनाने आनंदी होणारा श्रीविष्णु.’

अशा प्रकारे दक्षिण भारतासह भारतभरात अनेक संतांच्या रचनांमध्ये श्रीविष्णु आणि संगीत यांचे घनिष्ठ नाते दिसून येते.

३ आ. श्रीविष्णु आणि वाद्य

३ आ १. श्रीविष्णूने हातात शंख धारण करणे : श्रीविष्णूने त्याच्या डाव्या हातात ‘शंख’ धारण केला आहे. शंख हे एक सुषिर वाद्य (टीप १) असून त्याचा नाद दैवी आहे. शंखनादात नकारात्मक शक्ती दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच देवपूजा, धार्मिक विधी, तसेच काही मंगल कार्ये यांमध्ये शंखनाद केला जातो.

टीप १ – सुषिर वाद्य : फुंकून किंवा हवा भरून वाजवले जाणारे वाद्य. यात हवेच्या कंपनातून ध्वनी निर्माण होतो.

३ इ. श्रीविष्णु आणि नृत्य

३ इ १. भस्मासुराच्या वधासाठी श्रीविष्णूने मोहिनी रूप धारण करणे आणि भस्मासुरासह मनमोहक नृत्य करणे : भगवान श्रीविष्णूने ‘मोहिनी रूप’ धारण केले आणि ‘भस्मासुर’, या राक्षसाचा वध केला. श्रीविष्णूने भस्मासुराच्या समवेत जे लास्यमय (टीप २) आणि मनमोहक नृत्य केले, तेच नृत्य कालांतराने ‘मोहिनीअट्टम्’, या भारतीय शास्त्रीय नृत्य शैलीत प्रगट झाले. ‘मोहिनीअट्टम्’, या नृत्यामध्ये श्रीविष्णूने केलेल्या नृत्याप्रमाणेच सुकोमल, लास्ययुक्त हालचालींचा समावेश असतो. अधिकांश स्त्रियाच हे नृत्य करतात.

टीप २ – लास्य नृत्य : हे देवी पार्वतीने केलेले एक नाजूक आणि सुंदर नृत्य आहे. यात सौंदर्य, आनंद आणि सौम्य भावनेतून कोमल अन् लयबद्ध हालचालींद्वारे प्रेम, करुणा आणि शृंगार, हे रस व्यक्त केले जातात.

४. भगवान श्रीकृष्ण

४ अ. श्रीकृष्ण आणि बासरी : ‘बासरी’ म्हणताच आपल्याला सुमधुर बासरीवादनाने सृष्टीला मोहित करणार्‍या भगवान श्रीकृष्णाचे स्मरण होते. अनेक संतांच्या रचनांमध्ये श्रीकृष्णाच्या दिव्य बासरीचे वर्णन आढळते. संत सुरदास श्रीकृष्णाच्या मुरलीवादनाचे वर्णन करतांना म्हणतात,

जब हरि मुरली अधर धरत । थिर चर, चर थिर, पवन थकित रहैं, जमुना जल न बहत ।।

अर्थ : जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याची बासरी ओठांवर धरतो (बासरीचे वादन करतो), तेव्हा त्या बासरीच्या दिव्य नादामुळे चराचर सृष्टी स्थिर होते, वारा थांबतो आणि यमुनेच्या पाण्याचा प्रवाहही वहाणे विसरून जातो.

म्हणजेच, बासरीच्या दैवी नादाने संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये स्थिरत्व येते आणि या नादामुळे सगळेच जणू कृष्णमय होऊन जातात.

भगवान श्रीकृष्णाचे बासरीवादन हे सर्व कलाकारांसाठी आदर्श आहे. सकल सृष्टी मोहून टाकण्याचे सामर्थ्य त्याच्या वादनात होते. कलाकाराने कलेला साधनेची जोड दिल्यास त्याच्या कलेतूनही चैतन्याचे प्रक्षेपण होते आणि कलाकार अन् श्रोते यांना त्या वादनाचा आध्यात्मिक स्तरावरील लाभ घेता येतो.

४ आ. श्रीकृष्ण आणि नृत्य

४ आ १. श्रीकृष्णाने गोपींसह उच्च आध्यात्मिक स्तरावरील ‘रास नृत्य’ करून त्यांना एकरूपतेची अनुभूती देणे : शरद पौर्णिमेच्या रात्री श्रीकृष्णाने रास नृत्याच्या माध्यमातून गोपींना दिलेली भगवंताच्या एकरूपतेची अनुभूती सर्वश्रुत आहे. श्रीकृष्ण आणि गोपी यांनी केलेले हे नृत्य उच्च आध्यात्मिक स्तरावरील नृत्य होते. हे रास नृत्य करतांना गोपी त्यांचे देहभान हरपून गेल्या होत्या. या नृत्याच्या वेळी गोपी आणि श्रीकृष्ण एकरूप झाले होते.

ज्या वेळी कलाकार आपले देहभान विसरतो, तेव्हाच तो खर्‍या ईश्वरी तत्त्वाचा अनुभव घेऊ शकतो. ‘नृत्य-कलाकाराने भावस्थितीत नृत्य केल्यास त्यालाही परमेश्वराची अनुभूती आल्याविना रहाणार नाही’, हा आदर्श भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या परम भक्त असलेल्या गोपी यांनी सर्व नृत्य-कलाकारांच्या समोर ठेवला आहे.

५. हनुमान

सौ. अनघा जोशी

अ. हनुमान हा प्रभु श्रीरामाचा निस्सीम भक्त होता. त्याचे जीवन, म्हणजे रामनामाचा अखंड अंतर्नाद ! हातांत चिपळ्या धरून श्रीरामाच्या भक्तीत रममाण असलेल्या हनुमंताची विविध चित्रे आजही आपल्याला पहायला मिळतात. रामभक्त हनुमंत हा केवळ वीर नव्हे, तर संगीताचाही पंडित मानला जातो.

आ. समर्थ रामदासस्वामी मारुतिस्तोत्रामध्ये म्हणतात,

महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें । सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ।। २ ।।

अर्थ : मारुति महाबळी आणि प्राणदाता आहे. तो शक्ती देऊन सर्वांना कार्यासाठी उद्युक्त करणारा आहे. मारुति त्याची भक्ती करणार्‍याला सौख्य प्राप्त करून देतो आणि दुःख नाहीसे करतो. तो धूर्त (बुद्धीमान) आहे. प्रखर रामभक्त असल्यामुळे त्याला ‘वैष्णव’ म्हटले आहे. तो रामनामाचे सतत गायन (जप) करत असल्याने त्याला ‘गायक’, असे म्हटले आहे.

हनुमंताप्रमाणे आपणही भगवंताचे भक्त होऊन कलेच्या माध्यमातून ईश्वराला भावभक्तीने आळवल्यास आपली कला भगवंताच्या चरणी अर्पण होईल आणि आपल्यावरही ईश्वराची कृपा निश्चितच होईल.

६. श्री गणपति

सर्व विधींमध्ये श्री गणेशाला प्रथम पुजले जाते; कारण श्री गणेश ही सर्व विघ्नांचे हरण करणारी देवता आहे. त्याच्या आशीर्वादानेच सर्व विधी पूर्णत्वाला जातात. सर्व विधींप्रमाणेच संगीतातही श्री गणेशाचे स्थान श्रेष्ठ आहे.

६ अ. प्रत्येक कलेच्या प्रस्तुतीपूर्वी श्री गणेशाची स्तुती करून त्याचे आशीर्वाद घेतले जाणे : नाट्यशास्त्राच्या प्रथम अध्यायात सांगितल्यानुसार ब्रह्मदेवाने नाट्यशास्त्राची निर्मिती केली. विश्वातील पहिले नाट्य हे इंद्रसभेत प्रस्तुत झाले होते. त्या वेळी दैत्यांनी त्यात विघ्ने आणली. ‘या विघ्नांचे हरण होऊन देवतांचे रक्षण व्हावे’, यासाठी ब्रह्मदेवाने श्री गणेशाचे ध्यान केले. तेव्हापासून आतापर्यंत गायन, वादन, नृत्य आणि नाट्य यांचा आरंभ गणेशाच्या वंदनेनेच होतो. केवळ संगीतच नव्हे, तर प्रत्येक कलेच्या प्रस्तुतीपूर्वी श्री गणेशाची स्तुती करून त्याचे आशीर्वाद घेतले जातात.

नृत्यावर आधारित ‘अभिनयदर्पणम्’, या ग्रंथातील ‘प्रार्थनादिकम्’मध्ये म्हटले आहे,

विघ्नेशं मुरजाधिपं च गगनं स्तुत्वा महीं प्रार्थयेत् ।
तत्तद्वाद्यकदम्बकस्य विधिना पूजाविधामानयेत् ।। – अभिनयदर्पण, श्लोक ३१

अर्थ : (अभिनयापूर्वी कलाकाराने) विघ्नराज भगवान गणेश आणि नटराज भगवान शंकर यांची स्तुती करावी. त्यानंतर आकाश आणि पृथ्वी यांना वंदन करावे. त्या त्या वाद्ययंत्रांची विधीपूर्वक पूजा-अर्चा करावी.

६ आ. दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्ये श्री गणेशाच्या मृदंग वाजवतांनाच्या मूर्ती दिसतात.

६ इ. श्री गणेश आणि नृत्य : समर्थ रामदासस्वामी यांच्या एका रचनेत श्री गणेश नृत्य करत असल्याचे वर्णन आढळते.

तांडव नृत्य करि गजानन ।।
धिम-कित्र धिमकित वाजे मृदंग । ब्रह्मा ताल धरी गजानन ।।

यावरून ‘श्री गणेशही गायन, वादन आणि नृत्य प्रिय आहे’, असे दिसून येते. कलाकारांनी कलेची उपासना मनोभावे केल्यास त्यांना श्री गणेशाचे आशीर्वाद निश्चितच प्राप्त होतील.’

(क्रमशः)

संग्राहक : सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, बी.ए. संगीत), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. ५.१२.२०२५)


भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/995613.html