‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन ! 

कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !  

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांचा आध्यात्मिक इतिहास पहाणार आहोत. या लेखात आपण भारतीय कलांच्या निर्मितीविषयी समजून घेऊ.

(लेखांक ११)

भारतीय कलांचा देवीदेवतांशी असलेला संबंध ! 

‘भारतीय संस्कृतीमध्ये ‘कला ही केवळ करमणुकीचे साधन नसून ते ईश्वरप्राप्तीचे प्रभावी माध्यम आहे’, असे मानले गेले आहे. संगीत, नृत्य आणि नाट्य या ललित कलांचा उगम हा देवता अन् दैवीतत्त्व यांच्याशी जोडलेला आहे; म्हणूनच भारतीय परंपरेत ‘कला हे ‘उपासनेचे माध्यम’ आणि कलाकार हा ‘उपासक’ आहे’, असे सांगितले आहे.

मागील लेखात आपण भगवान श्रीविष्णु, श्रीकृष्ण, रामभक्त हनुमान आणि गणपति यांचा संगीताशी असलेला संबंध जाणून घेतला. आता या भागात आपण श्री सरस्वतीदेवी, श्री पार्वतीदेवी, तसेच गंधर्व, यक्ष, किन्नर आणि अप्सरा यांचा संगीताशी असलेला संबंध जाणून घेणार आहोत.

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/992810.html

७. श्री सरस्वतीदेवी 

भारतीय आध्यात्मिक परंपरेत सरस्वतीदेवीला विद्या, वाणी, कला आणि संगीत यांची अधिष्ठात्री देवता मानले जाते.

श्री. मनोज सहस्रबुद्धे

७ अ. नाद आणि स्वर यांची अधिष्ठात्री देवता : वेद आणि पुराणे यांमध्ये सरस्वतीदेवीला वाक् (वाणी) अन् नाद यांची मूळ शक्ती म्हटले आहे. संगीताचा आरंभ नादापासून होतो. नादातून स्वर, स्वरातून राग आणि रागातून रसानुभूती घडते. ही संपूर्ण प्रक्रिया सरस्वतीच्या कृपेनेच शक्य होते.

७ आ. वाग्देवी सरस्वती : सरस्वतीला ‘वाग्देवी’, असेही संबोधले जाते. ‘वाक्’ म्हणजे वाणी. कलेच्या उपासकाची वाणी आणि कंठ यांमध्ये सरस्वतीचा वास असतो. त्यामुळे साधना म्हणून गायन करणार्‍या कलाकाराच्या कंठातील सुरातून तिचेच माधुर्य अनुभवायला मिळते. कला-उपासक सरस्वतीदेवीच्या चरणी प्रार्थना करतो, ‘हे वाग्देवी सरस्वती, तुझ्याच कृपेने मी ही गायन, वादन सेवा करू शकत आहे. तुझ्या चैतन्याचा गोडवा माझ्या कंठामध्ये आणि जिभेवर निर्माण होऊ दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’

७ इ. सरस्वतीदेवी आणि वीणा : भारतीय संस्कृतीमध्ये ‘नादब्रह्म’, हे ब्रह्मदेवाचे ध्वनीरूप स्वरूप आहे. नादब्रह्माचे मूर्त स्वरूप, म्हणजे सरस्वतीदेवी ! सरस्वतीदेवीने धारण केलेल्या वीणेचा नाद हा सृष्टीच्या आदि नादाचे, म्हणजेच नादब्रह्माचे प्रतीक आहे आणि सरस्वतीदेवी ही त्या नादाची अधिष्ठात्री शक्ती आहे.

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ।।

अर्थ : जी कुंदाचे फूल, चंद्र, हिमतुषार किंवा मोत्यांचा हार यांप्रमाणे गौरवर्णी आहे, जिने शुभ्र वस्त्र धारण केले आहे, जिचे हात उत्तम वीणेमुळे शोभत आहेत, जी शुभ्र कमळांच्या आसनावर विराजमान झालेली आहे, ब्रह्मा, विष्णु, महेश इत्यादी देवता जिची निरंतर स्तुती करतात, जी सर्व प्रकारची जडता (अज्ञान) दूर करते, अशी ती भगवती, श्री सरस्वतीदेवी माझे रक्षण करो.

८. श्री राजमातंगीदेवी 

श्री राजमातंगीदेवीला ‘सरस्वतीदेवीचे तांत्रिक रूप’, असेही म्हणतात. कवी कालीदासविरचित ‘श्यामलादंडकस्तोत्रा’त राजमातंगीदेवीचे वर्णन करतांना कवी कालीदास म्हणतात,

माणिक्यवीणामुपलालयन्तीं मदालसां मञ्जुलवाग्विलासाम् ।
माहेन्द्रनीलद्युतिकोमलाङ्गीं मातङ्गकन्यां मनसा स्मरामि ।। – श्यामलादण्डकस्तोत्र, श्लोक १

अर्थ : रत्नजडित वीणा वाजवणार्‍या, मोहक, मधुर वाणी असणार्‍या, माहेंद्रनील रत्नाप्रमाणे चमकणारे कोमल अंग असणार्‍या मातंगकन्येचे मी मनाने स्मरण करतो.

९. आदिशक्ती पार्वती 

भारतीय परंपरेत नृत्यकला ही केवळ एक शैली नसून ती दैवी शक्तीची सुर, लय आणि ताल यांनी बद्ध, अशी क्रिया मानली आहे. या शक्तीचे सजीव, सौंदर्यपूर्ण आणि सृजनशील रूप, म्हणजे देवी पार्वती. ज्या ठिकाणी भगवान शिव ‘नटराज’ रूपात तांडव नृत्य करतो, त्याच ठिकाणी देवी पार्वती ‘लास्य’ रूपात नृत्य करून सृष्टीत संतुलन निर्माण करते.

९ अ. ‘लास्य’ नृत्याची अधिष्ठात्री देवी : ‘लास्य’ हा नृत्य प्रकार सौम्य भाव, शृंगार, करुणा आणि भक्ती यांचे प्रतीक आहे. नाट्यशास्त्रानुसार लास्य नृत्याची निर्मिती पार्वतीने केली आणि तो नृत्य प्रकार तिने देवता अन् अप्सरा यांना शिकवला.

९ आ. पार्वतीदेवी आणि तांडव नृत्य : ‘कालिका तांडव’, ‘गौरी तांडव’, ‘उमा तांडव’, असे विविध तांडव नृत्य प्रकार देवी पार्वतीने शिवासह केले. ‘या नृत्यांमधील काही प्रकारांमध्ये पार्वतीने शिवासह उग्र रूपातील तांडव, तर काही प्रकारांमध्ये ‘आनंद तांडव’ केला’, असा उल्लेख शास्त्रात आहे.

कलाकारांच्या साधनेसाठी लागणारी ऊर्जा आणि शक्ती प्रदान करणार्‍या आदिशक्ती पार्वतीच्या चरणी कोटी कोटी नमन !

१०. यक्ष, गंधर्व, किन्नर आणि अप्सरा

भारतीय पुराणे आणि महाकाव्ये यांमध्ये यक्ष, गंधर्व, किन्नर अन् अप्सरा या कनिष्ठ देवतांचा संगीत आणि नृत्य यांच्याशी अतूट अन् दैवी संबंध सांगितला आहे. यक्ष, गंधर्व, किन्नर अन् अप्सरा हे संगीत आणि नृत्य प्रिय इंद्रदेवाच्या दैवी दरबारामधील दैवी कलाकार होत. गंधर्वांचे गायन किंवा अप्सरांचे नृत्य हे दैवी संबोधले जाते. त्यामुळेच आजही उत्कृष्ट गायकाला ‘गंधर्व’, ही पदवी दिली जाते.

१० अ. यक्ष : यक्ष हे निसर्ग, संपत्ती आणि भूमी यांचे रक्षक असून त्यांचा संगीताशीही संबंध आहे. ‘यक्ष-यक्षिणी हे नृत्य आणि गीते यांत रममाण असतात’, असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. यक्ष हे कुबेराचे सेवक आहेत. कर्नाटकातील मंदिर परंपरेत प्रसिद्ध असलेले ‘यक्षगान लोकनाट्य’, हे ‘यक्ष’, या संकल्पनेवरून नावारूपाला आले.

१० आ. गंधर्व : भारतीय संगीताचे दोन प्रकार मानले गेले आहेत – देशी संगीत (लोकरंजनासाठीचे संगीत) आणि मार्गी संगीत, म्हणजेच ईश्वरप्राप्तीसाठीचे संगीत. गंधर्व हे मार्गी संगीताचे उपासक होते. त्यामुळेच भारतीय संगीताला ‘गंधर्व संगीत’, असेही म्हणतात.

१० आ १. चित्रसेन गंधर्व : चित्रसेन गंधर्व हा नृत्य आणि गायन यांत निपुण आहे. त्याने अर्जुनाला संगीतकला शिकवल्याचा उल्लेख महाभारतात आहे.

१० आ २. हाहा आणि हूहू गंधर्व : आदि शंकराचार्य रचित ‘स्वर्णमालास्तुती’मध्ये पुढील ओळींत ‘हाहा’ आणि ‘हूहू’, या दोन गंधर्वांचा उल्लेख आढळतो.

हाहा-हूहू मुख सुरगायक गीता-पदान पद्य विभो ।
साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् ।। – स्वर्णमालास्तुति, श्लोक १५

अर्थ : ज्याच्या महानतेचे गुणगान ‘हाहा’ आणि ‘हूहू’ आदी गंधर्व आपल्या मुखाने स्वरांमधून करतात, जो शब्द अन् गीते यांचा स्वामी आहे, अशा हे सर्वशक्तीमान भगवान शंकरा, मी तुझ्या चरणी शरण आलो आहे.

१० आ ३. तुंबरु : तुंबरु हे नारदऋषींचे शिष्य असून त्यांना गंधर्वांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. तुंबरु यांनी ‘कलावती’ वीणेची निर्मिती केली. त्यांना ‘भक्तीसंगीताचे आद्य प्रचारक’ मानतात.

१० इ. किन्नर : किन्नर हे अर्धमानव आणि अर्धदेव स्वरूपाचे दिव्य संगीतकार मानले जातात. किन्नरांना उत्कृष्ट गायक, वादक आणि नर्तक मानले गेले आहे. ते देवांच्या स्तुतीसाठी संगीत सादर करतात. किन्नरांचे संगीत हे केवळ मनोरंजन नसून भक्ती आणि स्तुती यांचे माध्यम आहे. ते संगीत वीणा, मृदंग आणि वंशी (बासरी), अशा वाद्यांशीही संबंधित आहे.

१० ई. अप्सरा : अप्सरा या नृत्य, संगीत आणि अभिनय यांत पारंगत असतात. त्या स्वर्गातील देवसभा आणि इंद्राचा दरबार यांठिकाणी दैवी नृत्यप्रस्तुती करतात. अप्सरांचे स्वरूप अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि मोहक असते. उर्वशी, मेनका, रंभा, तिलोत्तमा ही काही अप्सरांची नावे आहेत. अज्ञातवासाच्या काळात उर्वशी अप्सरेने अर्जुनाला नृत्य शिकवल्याचा उल्लेख महाभारतात आढळतो.

या लेखातून आपल्या लक्षात येते की, भारतीय कलांना देवतांचे अधिष्ठान आहे. त्यामुळेच भारतीय कला या सत्त्वगुणप्रधान आहेत. कलाकाराने ईश्वरप्राप्तीसाठी कलेची आराधना भक्तीभावे केल्यास त्याला देवीदेवतांचे आशीर्वाद निश्चितच मिळतील.’

(समाप्त)

– श्री. मनोज सहस्रबुद्धे (सतारवादक), वाद्य-अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२९.१२.२०२५)


साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती


या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संपर्कासाठी पत्ता

श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८

ईमेल : [email protected]