‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन ! 

कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत  पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांचा आध्यात्मिक इतिहास पहाणार आहोत. या लेखात आपण भारतीय कलांच्या निर्मितीविषयी समजून घेऊ.  

(लेखांक ११)

लेखांक १० वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/985509.html

भारतीय कलांचा देवीदेवतांशी असलेला संबंध ! 

‘आतापर्यंतच्या लेखांत आपण संगीत आणि नाट्य या कलांच्या इतिहासाविषयी जाणून घेतले. आता यापुढील लेखांत आपण ‘भारतीय कलांचा देवतांशी असलेला संबंध आणि त्या माध्यमातून कलेला असलेले आध्यात्मिक अधिष्ठान’, यांविषयी जाणून घेणार आहोत.

(भाग १)

भारतीय संस्कृतीमध्ये संगीताची परंपरा ही केवळ कलात्मक नव्हे, तर आध्यात्मिक तत्त्वावर आधारित आहे. हिंदु धर्मातील देवीदेवतांच्या मूर्ती पाहिल्या असता त्यांच्या हातांत विविध वाद्ये असल्याचे आपल्या लक्षात येते. ती वाद्ये, म्हणजे दैवी शक्ती, सृष्टीचे नियमन, आनंद, सृष्टीचा विनाश, ज्ञान, भक्ती आणि प्रीती यांची प्रतिके आहेत. शिवाच्या डमरूच्या नादातून सृष्टीची निर्मिती झाली. श्रीविष्णूच्या शंखनादातून धर्मसंस्थापनेची घोषणा झाली. सरस्वतीच्या वीणेच्या सुरातून ज्ञान आणि कला प्रकटल्या, तर श्रीकृष्णाच्या बासरीने भक्तांना भक्ती, प्रीती अन् संगीतातून मोक्षमार्गाची दिशा दाखवली.

‘संगीतरत्नाकर’, या ग्रंथात संगीत आणि देवता यांचे पुढील वर्णन केले आहे.

‘सामवेदादिदं गीतं संजग्राह पितामहः ।।

गीतेन प्रीयते देवः सर्वज्ञः पार्वतीपतिः ।
गोपीपतिरनन्तोऽपि वंशध्वनिवशं गतः ।।

सामगीतिरतो ब्रह्मा वीणासक्ता सरस्वती ।
किमन्ये यक्षगन्धर्वदेवदानवमानवाः ।। 

– सङ्गीतरत्नाकर, अध्याय १, प्रकरण १, श्लोक २५,२६,२७

अर्थ : ब्रह्मदेवाने सामवेदातून गीतांचा संग्रह केला. सर्वज्ञ पार्वतीपती शंकर गीताने प्रसन्न होतो. वंशीध्वनी (बासरीचा मधुर आवाज) ऐकताच गोपीपती श्रीकृष्ण वशीभूत होतो. ब्रह्मा सामगीतीमध्ये रत आहे. सरस्वती वीणेमध्ये आसक्त आहे. अन्य देव, यक्ष, गंधर्व, दानव, तसेच मानव यांच्याविषयी काय बोलावे !’ (साभार : ‘संगीतरत्नाकर’, अनुवाद : श्री. लक्ष्मीनारायण गर्ग)

हिंदु देवतांच्या हातांतील वाद्ये दर्शवतात की, संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते भगवंताशी संवाद साधण्याचे माध्यम आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित देवता अनुक्रमे ब्रह्मदेव, श्रीविष्णु अन् शिव या आहेत; परंतु संगीत, नृत्य आणि नाट्य यांच्याशी संबंधित प्रमुख देवता ही भगवान शिव आहे. त्यामुळे या लेखमालेत हेतूपुरस्सर देवतांची कलेच्या संदर्भातील माहिती देतांना देवतांच्या वरील क्रमात पालट केला आहे. सर्वप्रथम आपण गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांचा अधिपती असलेला भगवान शिव अन् वेदधारी ब्रह्मदेव यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

सौ. रेणुका क्राक

१. भगवान शिव 

भारतीय परंपरेत भगवान शिवाला नाद, लय, तांडव, नृत्य आणि संगीत यांची ‘आद्य ऊर्जा’ मानतात. ‘ॐ’ हा विश्वाचा मूलध्वनी, म्हणजेच शिवस्वरूप नाद होय; म्हणून शिवनाद (‘ॐ’कारनाद) हा संगीताचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळेच भगवान शिवाला गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांची ‘अधिष्ठात्री देवता’ म्हणतात.

१ अ. भगवान शिव आणि संगीत 

१ अ १. ‘भगवान शिवाला संगीतकलेचे जनक मानतात.’ (साभार : भारतीय संस्कृतीकोश (आवृत्ती १), खंड ९, पृष्ठ ५१३))

१ अ २. भगवान शिवाने केलेली संगीतातील रागांची उत्पत्ती  

शिवशक्तेः समायोगाद्रागाणां सम्भवो भवेत् ।
पञ्चास्यात् पञ्च रागाः स्युः षठस्तु गिरिजामुखात् ।। – सङ्गीतदर्पण, अध्याय २, श्लोक ९

अर्थ : शिव आणि शक्ती यांच्या संयोगामुळे रागांची उत्पत्ती झाली. महादेवाच्या ५ मुखांतून ५ राग निर्माण झाले, तर सहावा राग हा पार्वतीच्या मुखातून निर्माण झाला.

१ आ. भगवान शिव आणि वाद्ये

१ आ १. डमरू : डमरू हे एक अत्यंत पवित्र आणि शक्तीशाली वाद्य आहे. ते भगवान शिवाशी संबंधित वाद्य म्हणून ओळखले जाते. शिवपुराणातील उल्लेखाप्रमाणे शिवाच्या डमरूच्या नादातूनच विश्वाची निर्मिती झाली. भगवान शिव जेव्हा तांडव नृत्य करतो, तेव्हा त्याच्या हातात डमरू असते. हे डमरू संपूर्ण ब्रह्मांडाच्या स्पंदनांचे प्रतिनिधित्व करते.

१ आ १ अ. डमरूचे आध्यात्मिक महत्त्व 

१. भगवान शिवाच्या तांडव नृत्याच्या वेळी डमरूचा नाद संपूर्ण ब्रह्मांडात ऊर्जा निर्माण करतो. डमरूचा नाद हा सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते संहारापर्यंतच्या प्रक्रियेस चालना देणारा प्रणव नाद आहे. हा नाद साधनेला पूरक आहे. डमरूचा ध्वनी मूलाधारचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंतच्या चक्रांवर कंपने निर्माण करून आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करतो.

२. डमरू हे केवळ वाद्य नसून ते एक दैवी साधन आहे. ते भक्ताला शिवतत्त्वाच्या अनुभूतीकडे नेणारे माध्यम ठरते.

१ आ २. रुद्रवीणा : काही कथांनुसार भगवान शिवाने पार्वतीसाठी रुद्रवीणेची निर्मिती केली होती. पार्वतीच्या सौंदर्याचे प्रतीक म्हणून रुद्रवीणेची निर्मिती केली गेली. रुद्रवीणा हे अत्यंत धीरगंभीर वाद्य आहे. प्राचीन काळी ऋषिमुनी आणि योगीजन रुद्रवीणेच्या वादनाच्या माध्यमातून संगीत-साधना करत असत.

१ इ. शिव आणि नृत्य : ‘नाट्यशास्त्र’, ‘अभिनयदर्पण’, अशा अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये शिवाच्या वैश्विक नृत्याचे वर्णन केले आहे. शिवाचे ‘नटराज’ हे रूप आणि नृत्य यांचा संबंध तांडव नृत्याशी आहे. शिवाचे नटराज हे रूप सृष्टी-स्थिती-लय यांच्या ब्रह्मांडीय चक्राचे प्रतीक आहे.

१ इ १. शिवाच्या ‘नटराज’ या रूपाची काही आध्यात्मिक वैशिष्ट्ये : नटराजाच्या चतुर्भुज मूर्तीच्या एका हातात डमरू आहे. ते सृजनाचे (उत्पत्तीचे) प्रतीक आहे. दुसर्‍या हातातील अग्नी हे संहाराचे प्रतीक आहे. हा संहार चराचराची शुद्धी करणारा आहे. शिवाचा तिसरा अभयहस्त आहे. त्याने त्याचा चौथा हात खाली सोडलेला आहे. तो शरणागतीचा मार्ग दाखवतो. नटराजाच्या पायाखाली असणारा ‘मैय्यालकाम’ (‘अपस्मार’ किंवा ‘मुयलक’) हा राक्षस, म्हणजे अहंकार आणि अज्ञान यांचे प्रतीक आहे.

१ इ २. शिवाचे तांडव नृत्य : शिवाच्या तांडवाचे एकूण ७ प्रकार आहेत. या ७ तांडव नृत्यप्रकारांमध्ये विशेषतः आनंद, अद्भुत आणि रौद्र या रसांची निर्मिती होते.

अ. आनंद तांडव : परमानंदाची अनुभूती देणार्‍या शिवाच्या तांडव नृत्याला ‘आनंद तांडव’, असे म्हणतात.

आ. संहार तांडव – प्रलय करणारे  : अनेक योगीजन शिवाच्या या आनंद रूपाची आराधना करतात. क्रोधात्मक, तसेच अधर्म, असुर आणि पाप यांचा नाश करणारे संहारक स्वरूप असलेल्या शिवाच्या तांडव नृत्याला ‘संहार तांडव’, असे म्हटले जाते. शिवाच्या या प्रकारच्या नृत्यामुळे प्रलय होतो.

१ इ ३. शिव आणि नृत्यातील ‘करण’: नृत्यात गतीमान नृत्त (टीप) आणि विलासपूर्ण पदन्यासादी हालचाली यांना ‘करण’, असे म्हणतात. ‘या करणांची निर्मिती साक्षात् शिवाच्या तांडव नृत्यापासून झाली आहे’, असे भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात सांगितले आहे.

टीप – नृत्त : नर्तनाचे ‘नृत्त, नाट्य आणि नृत्य’, असे तीन प्रकार आहेत. नृत्त म्हणजे भाव आणि अभिनय विरहित ताल-लय यांच्याशी समन्वय साधत आंगिक हालचाली अन् पदन्यास एकत्रितपणे करणे.

१ ई. शिव आणि नाट्य

१ ई १. आद्यनट शिव : ‘शिव हा आद्यनट आहे’, अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला ‘नटराज’ हे बिरुद लागले आहे. ब्रह्मांड ही नटराजाची नृत्यशाळा आहे. नटराज हा जसा नर्तक आहे, तसाच तो त्याचा साक्षीही आहे.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन’)

१ ई २. आदिशंकराचार्यांनी ‘शिव स्वर्णमाला स्तुती’मध्ये भगवान शिवाचा ‘महानट’ म्हणून उल्लेख केला आहे.

साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती

या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संपर्कासाठी पत्ता

श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८

ईमेल : [email protected]

२. ब्रह्मदेव संगीत, नृत्य, नाट्य, वास्तू, शिल्प इत्यादी कलांचा आणि पंचमवेदाची, म्हणजेच नाट्यवेदाची निर्मिती करणारा 

ब्रह्मदेवाला ‘वेदांचा स्रोत’ मानले जाते. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने आपल्या चार मुखांतून अपौरुषेय असे चार वेद (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद) प्रगट केले. त्यांत संगीतासंबंधीच्या सामवेदाचाही अंतर्भाव आहे. ब्रह्मदेवाशी संबंधित संगीतात्मक परंपरा वैदिक काळापासून चालू आहे. तिचा मंत्र, भजन आणि शास्त्रीय संगीत, असा विकास झाला. वेदांच्या माध्यमातून संगीत, नृत्य, नाट्य, वास्तू, शिल्प इत्यादी कलांचा उगम झाल्याने ब्रह्मदेवाला ‘कलांचा निर्माता’ मानतात. ब्रह्मदेवाने पंचमवेदाची, म्हणजेच नाट्यवेदाची निर्मितीही केली आहे.’

(‘भारतीय कलांचा देवीदेवतांशी असलेला संबंध’, या विषयाच्या पुढील भागात आपण कलेशी संबंधित अन्य देवतांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.- सौ. रेणुका क्राक)

(क्रमशः)

– सौ. रेणुका क्राक, संगीत आणि नाट्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.१२.२०२५)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/992810.html