रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या नुकत्याच झालेल्या २ दिवसांच्या भारत दौर्यात विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्याचे आश्वासन देणार्या महत्त्वपूर्ण चर्चा आणि करार झाले. या क्षेत्रांमध्ये संरक्षण, व्यापार, आर्थिक सहकार्य, सायबर सुरक्षा, तंत्रज्ञान हस्तांतरण, अणू सहकार्य, ऊर्जा सुरक्षा आणि शस्त्रास्त्रांचा व्यापार यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दृढ होत चाललेल्या संबंधांमुळे चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारत-रशियाचे बळकट झालेले संबंध स्वतःचे प्रादेशिक वर्चस्व आणि धोरणात्मक हितसंबंध यांना संभाव्य धोका असल्याचे चीन मानतो. हा लेख भारत-रशिया सहकार्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतो. या लेखात आशियातील भू-राजकीय परिस्थितीवरील परिणामांचा शोध घेत परिणामी चीनच्या प्रतिक्रियेचे विश्लेषण येथे दिले आहे.

१. भारत-रशिया परस्पर संरक्षण सहकार्य
ऐतिहासिकदृष्ट्या भारत-रशिया संबंधांचा पाया संरक्षण हा राहिला आहे. अलीकडील करारांमुळे भारताने लढाऊ विमाने, लढाऊ नौका आणि क्षेपणास्त्र प्रणाली यांसह रशियाच्या सैन्य उपकरणांमध्ये लक्षणीय गुंतवणूक केल्याचे दिसून आले आहे. हे सहकार्य केवळ भारताची संरक्षण क्षमताच वाढवत नाही, तर या प्रदेशात चीनच्या वाढत्या सैन्य आक्रमकतेविरुद्ध प्रतिकार म्हणूनही काम करते.

२. आर्थिक आणि व्यापारी संबंध
पारंपरिक क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन कृषी, तंत्रज्ञान आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील व्यापाराचा समावेश करून भारत अन् रशिया हे त्यांच्या आर्थिक संबंधांमध्ये विविधता आणण्याच्या दिशेने काम करत आहेत. या संबंधांमुळे व्यापारातील अडथळे दूर करणे आणि गुंतवणुकीची सुलभता यांमुळे परस्पर व्यापाराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. चिनी आयातीवरील अवलंबित्व न्यून करतांना देशाची अर्थव्यवस्था वाढवण्याकडे भारताचा भर आहे.
३. भारत आणि रशिया यांचा मुत्सद्दी आघाडीवर एकमेकांना पाठिंबा
मुत्सद्दीच्या आघाडीवर दोन्ही देश आंतरराष्ट्रीय मंचांवर एकमेकांना पाठिंबा देत आहेत. प्रादेशिक स्थिरतेतील त्यांचे सामायिक हितसंबंध आणि पाश्चिमात्य शक्तींच्या एकतर्फी कृतींचा प्रतिकार त्यांच्या धोरणात्मक भागीदारीसाठी एक भक्कम पाया प्रदान करतात. या सहकार्यामुळे भारताला गुंतागुंतीच्या भू-राजकीय आव्हानांचा अधिक प्रभावीपणे सामना करता येतो.
४. सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यांमुळे भारताचे चीनवरील अवलंबत्व न्यून होणे
सायबर धोके सर्वत्र पसरलेल्या युगात भारत आणि रशिया यांनी सायबर सुरक्षेमध्ये सहकार्याची आवश्यकता मान्य केली आहे. तंत्रज्ञान हस्तांतरणातील संयुक्त उपक्रमांमुळे केवळ सायबर सुरक्षेतील भारताच्या क्षमतांनाच चालना मिळत नाही, तर भारत स्वतंत्रपणे अत्याधुनिक तंत्रज्ञान चालवण्यासह विकसित करू शकेल, हेही सुनिश्चित होते आणि त्यामुळे चिनी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व न्यून होईल.
५. ऊर्जासुरक्षेसाठी भारताकडून ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न
अणू सहकार्य हा भारत-रशिया संबंधांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. कुडनकुलम् अणूऊर्जा प्रकल्पासह सध्या चालू असलेल्या प्रकल्पांवरून भारत रशियाशी दृढ संबंध वाढवत आहे. यावरून भारत स्वतःसाठीच्या विविध ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता कशी आणत आहे, हे स्पष्ट होते. या व्यतिरिक्त दोन्ही देशांसाठी ऊर्जा सुरक्षा ही एक प्रमुख चिंता आहे; कारण ते चीनशी करत असलेल्या स्पर्धेमुळे प्रभावित झालेल्या जागतिक ऊर्जा चढउतारांचे परिणाम न्यून करण्याचा प्रयत्न करतात.
६. शस्त्रास्त्रविषयक करार करून भारताच्या सैन्य क्षमतांचे आधुनिकीकरण
भारत हा जगातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र आयातदारांपैकी एक आहे आणि रशिया हा ऐतिहासिकदृष्ट्या त्याचा मुख्य पुरवठादार राहिला आहे. अलीकडील करार भारताच्या सैन्य क्षमतांच्या आधुनिकीकरणासाठी चालू असलेली वचनबद्धता दिसून येते आणि त्याच वेळी रशियाला त्याच्या भौगोलिक-राजकीय अलिप्ततेच्या वेळी एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ प्रदान होत आहे. शस्त्रास्त्रांचा व्यापार केवळ भारताची सुरक्षा वाढवण्याचे काम करत नाही, तर भारत-रशिया भागीदारीवरील सखोल विश्वासही दर्शवतो.
७. भारत-रशिया यांच्या वाढत्या संबंधांविषयी चिंता करणारे चीनच्या प्रसारमाध्यमांचे कथन
चीनची अधिकृत माध्यमे, विशेषतः ‘ग्लोबल टाइम्स’ हे भारत-रशियाच्या वाढलेल्या संबंधांविषयी चिंता व्यक्त करण्यासाठी आवाज उठवत आले आहे. आशियातील चीनच्या प्रभावाला आव्हान म्हणून या दोन्ही देशांच्या सहकार्य कराराविषयीचे चित्रण विविध लेखांद्वारे कथानकाच्या रूपात सिद्ध करण्यात आले. या लेखांमधून ‘अनेकदा दक्षिण आशियातील शस्त्रास्त्र सहरीतीच्या शर्यतीच्या संभाव्यतेवर आणि भारताच्या सैन्य आधुनिकीकरणाला प्रादेशिक स्थिरतेसाठी थेट धोका आहे’, असे चीन दर्शवतो.
८. सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया
चिनी इंटरनेट वापरणार्यांनी सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याखेरीज सामाजिक माध्यमांवर सैनिकीदृष्ट्या सक्षम भारताच्या परिणामांविषयी असुरक्षितता आणि सावधगिरी या विषयांवर अनेकदा चर्चा होतात. याच वेळी चिनी विश्लेषक आणि भाष्यकार विकसित होत असलेल्या ‘इंडो-रशियन एक्सेस’चा सामना करण्यासाठी चीनने स्वतःची सैन्य आणि मुत्सद्दी धोरणे बळकट करण्याची आवश्यकता असल्याच्या सूत्रावर भर देत आहेत.
भारत-रशिया वाढत्या भागीदारीचे धोरणात्मक परिणाम
भारत-रशिया यांच्यातील वाढत्या भागीदारीकडे चीन केवळ द्विपक्षीय सूत्र म्हणून पहात नाही, तर आशियातील शक्ती गतीशीलतेची संभाव्य पुनर्रचना म्हणून पहात आहे. धोरणात्मक परिणाम बहुआयामी आहेत.

१. चीनच्या प्रभावाचा प्रतिकार
मजबूत भारत दक्षिण आशिया आणि त्यापलीकडे विशेषतः ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बी.आर्.आय. – व्यापार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा यांच्याद्वारे आशिया, आफ्रिका आणि युरोप या खंडातील विविध देशांना चीनशी जोडणारा प्रकल्प)’सारख्या प्रकल्पांच्या संदर्भात चीनच्या प्रभावाचा प्रतिकार करू शकतो.
२. भारतात वाढलेली सैन्य सज्जता
भारत रशियन तंत्रज्ञानाद्वारे स्वतःची सैन्य क्षमता वाढवत आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील चिनी विस्तारवादी प्रवृत्तीला आळा बसू शकतो आणि चीनला भारताच्या सैन्य स्थितीचे पुनर्मूल्यांकन करण्यास भाग पाडले जाऊ शकते.
३. भू-राजकीय संरेखन
या भागीदारीमुळे भारत, अमेरिका आणि त्याचे सहयोगी यांच्यात अधिक स्पष्ट सुरक्षा संरेखन होऊ शकते. यामध्ये चीनला राजनैतिकदृष्ट्या आणखी वेगळे केले जाऊ शकते.
४. आर्थिक स्पर्धा
भारत आणि रशिया यांच्यातील बळकट आर्थिक संबंधांमुळे तंत्रज्ञान अन् ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये स्पर्धा वाढू शकते, जिथे दोन्ही देश पूर्वी चीनशी भिडले होते.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
९. भारत रशिया यांच्या वाढत्या सहकार्यावर चीनची धोरणात्मक प्रति-उपाययोजना
भारत-रशियाच्या वाढत्या सहकार्याचा सामना करण्यासाठी चीन दक्षिण आशियामध्ये स्वतःची राजनैतिक व्याप्ती वाढवू शकतो आणि शेजारील देशांना आर्थिक प्रोत्साहन किंवा सुरक्षा हमी देऊ शकतो. यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ यांसारख्या देशांशी संबंध दृढ करणे आदी सूत्रांचा समावेश असू शकतो.
१०. सैन्य पवित्रा
सीमावर्ती भागांत सैन्याची वाढती तैनाती आणि पायाभूत सुविधांचा विकास यांमुळे हिमालयात चीनची सैन्य स्थिती अधिक आक्रमक होऊ शकते. अधिक आक्रमक भारतामुळे उद्भवणार्या संभाव्य आकस्मिक परिस्थितीसाठीचे नियोजन बहुधा चीनच्या सैन्य धोरणावर वर्चस्व गाजवेल.
११. भारत-रशिया प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी चीनचा आर्थिक उपक्रमांद्वारे प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न
पाकिस्तान आणि श्रीलंका येथे चीनने आधीच लक्षणीय गुंतवणूक केली आहे. यामुळे वाढत्या भारत-रशिया प्रभावाचा प्रतिकार करणार्या आर्थिक उपक्रमांद्वारे चीन स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. तो चिनी गुंतवणुकीचे लाभ दर्शवण्यासाठी लक्ष्यित गुंतवणुकीसह ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ यांसारखे अधिक आकर्षक पर्याय जगासमार सादर करील.
१२. सायबर सुरक्षेतील भारताची प्रगती न्यून करण्यासाठी गुप्त कारवाया
सायबर क्षमतेतील चीनच्या वाढत्या गुंतवणुकीमुळे तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेतील भारताच्या प्रगतीला न्यून लेखण्याच्या उद्देशाने चीनच्या सायबर कारवाया तीव्र होऊ शकतात. या प्रदेशातील मित्र राष्ट्रांमध्ये गुप्त माहितीची देवाणघेवाण वाढू शकते; कारण चीन त्याच्या प्रतिआक्रमणांना चालना देत आहे.

१३. निष्कर्ष
भारत आणि रशिया यांच्यातील दृढ सहकार्य चीनसाठी महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण करत आहे, ज्यामुळे प्रादेशिक शक्ती संतुलन मूलभूतपणे पालटू शकते. भारत स्वतःची संरक्षण, आर्थिक आणि मुत्सद्दीपणा यांविषयीची क्षमता बळकट करत असून चीनचा प्रभाव न्यून करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे चीनची चिंता वाढण्याची शक्यता आहे. विकसित होत असलेल्या भारत-रशिया युतीचा प्रतिकार करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक भूमिका आणि राजनैतिक उपक्रम या दोन्हींमध्ये चीनकडून प्रतिसाद दिसून येईल.
१४. भारत-रशिया भागीदारी धोरणात्मक विश्लेषणाचा केंद्रबिंदू ठरेल !
आशियातील भू-राजकीय परिस्थिती एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे, ज्यामध्ये युती आणि भागीदारी यांच्या गतीशीलतेची बारकाईने छाननी केली जाईल. भारताला या घडामोडींमुळे स्वतःचे सार्वभौमत्व सिद्ध करण्याची आणि जागतिक पटलावर स्वतःचे स्थान भक्कम करण्याची संधी मिळत आहे; परंतु वेगाने वाढणार्या चीनच्या वाढत्या तणावाचा भारही तो पेलत आहे. नातेसंबंधांच्या या गुंतागुंतीच्या जाळ्यामध्ये प्रत्येक देश स्वतःची धोरणे किती प्रभावीपणे व्यवस्थापित करतो, यावर भविष्य अवलंबून असेल. जागतिक व्यवस्था पालटत असतांना प्रमुख शक्तींच्या प्रतिक्रिया या प्रदेशातील आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मार्गाला आकार देत रहातील. भारत-रशिया भागीदारी येत्या काही वर्षांत धोरणात्मक विश्लेषणाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून उदयास येईल.
लेखक : ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !