अयोध्येच्या पवित्र तीर्थक्षेत्रातील श्रीरामजन्मभूमी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजाचे ध्वजारोहण झाले. या वेळी शुभ मुहूर्तावर पार पडलेला ‘हा विधी हिंदूंचा सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रीय एकता यांच्यामध्ये एक नवीन अध्याय चालू होतो. श्रीराममंदिराचा गौरवशाली ध्वज हा विकसित भारतातील पुनर्जागरणाचा पाया आहे. हा ध्वज धोरण आणि न्याय यांचे प्रतीक बनो, सुशासनाद्वारे समृद्धीचा मार्गदर्शक बनो. हा ध्वज विकसित भारताची ऊर्जा बनून याच रूपात सदैव आरूढ राहो’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यानंतर लगेचच काही दिवसांत ‘श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठा’च्या ५५० व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या ७७ फूट उंच कांस्य धातूच्या भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यात्म, इतिहास, संस्कृती आणि विकास यांविषयी मत व्यक्त केले. ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार करण्यासाठी अध्यात्म, राष्ट्रसेवा आणि विकास या तिन्ही गोष्टींचा समन्वय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

ही वृत्ते वाचत असतांना रामायणातील प्रभु श्रीराम आणि महाराज सुग्रीव यांच्यात झालेल्या संभाषणाचे स्मरण होत होते. ते येथे देत आहे.

१. सुराज्य म्हणजे काय ? याविषयी सुग्रीवाला प्रश्न पडणे आणि प्रभु श्रीरामाने दिलेले उत्तर
प्रभु श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या आधी अयोध्येतील हा प्रसंग आहे. महाराज सुग्रीव यांना ज्ञात होते की, प्रभु श्रीरामाला अयोध्येत सुराज्य स्थापन करायचे आहे; पण सुराज्य म्हणजे नेमके काय ? सुराज्याचा अर्थ काय ? ते स्वतः किष्किंधाचे राजे होते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी त्यांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. त्यांनी प्रभु श्रीरामाला विचारले, ‘प्रभु, सुराज्य म्हणजे नेमके काय ? त्याचा अर्थ काय ? मी एक वानर आहे; पण एक राजाही आहे. त्यामुळे सुराज्याचा अर्थ मला सांगावा.’
एकदा प्रभु श्रीराम हे महाराज सुग्रीव आणि त्यांच्या मंत्रीमंडळाला घेऊन अयोध्या नगरी पहाण्यास गेले. वाटेत अयोध्येतील नागरिकांनी त्यांना पाहिले. आपल्या होणार्या राजाला पाहून अयोध्येतील नागरिकांना अत्यानंद झाला. त्यांनी आनंदाने, हसतमुखाने आणि फुलांची उधळण करून प्रभु श्रीराम यांचे स्वागत केले.

प्रभु श्रीराम : मित्रा, तुला सुराज्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता ना, सांगतो. सुख, समृद्धी, रक्षण आणि न्याय हे सुराज्यासाठी आवश्यक आहेत. हे सुराज्याचे ४ स्तंभ आहेत. सुराज्याचा अर्थ तुमच्यासमोर आहे मित्रा.
महाराज सुग्रीव : प्रजेच्या मुखावरील आनंद, हेच सुराज्य आहे का ?
प्रभु श्रीराम : जिथे राजाला पाहून प्रजा आनंदी होत असेल, ते सामान्य राज्य आहे. प्रजेच्या मुखावरील जे हास्य आहे, ते सुखद भविष्य आणि समृद्धी यांच्या अपेक्षेचे प्रतीक आहे. प्रजेला आशा असते की, राजा त्यांचे दुःख ऐकणार आणि त्यांचे निवारण करणार; पण सुराज्य तर ते आहे, जिथे प्रजेला पाहून राजाला प्रसन्नता मिळेल. राजाला संतुष्टता वाटेल की, प्रजेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यात तो समर्थ झाला आहे. सुराज्य ते आहे, जिथे राजाला हा विश्वास असेल की, तो प्रजेच्या जीवनात पालट आणायला सक्षम आहे. प्रजेला पाहून राजा तेव्हाच प्रसन्न होतो, जेव्हा राजाच्या आणि प्रजेच्या दोन्हींच्या मनात काही प्रश्न, ग्लानी किंवा पीडा नसतात.
आज माझ्या प्रजेच्या मुखावर स्मित आहे. आता मला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून अयोध्येत सुराज्य आणायचे आहे. मित्रा, तो क्षण जेव्हा येणार, तेव्हा माझ्या मुखावर हास्य असेल.

२. प्रभु श्रीरामाने सुग्रीवाला प्रजेच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे
महाराज सुग्रीव : प्रभु, तुम्ही राज्याभिषेकाच्या आधी सैन्याचे नियोजन करत आहात. प्रजेच्या मनात भय निर्माण होणार नाही का की, होणारा राजा राज्याभिषेकाच्या आधीच सुरक्षेची व्यवस्था करत आहे ? जेणेकरून काही अघटित होऊ नये ?
प्रभु श्रीराम : सुग्रीव, प्रजा आणि राज्य यांचे रक्षण करणे, हे राजाचे प्रथम कर्तव्य असते. राज्याची सुरक्षा केवळ आक्रमणानंतरच नाही, तर त्याच्या आधीपासूनच करायची असते. राज्याचे सज्ज सैन्य एका न्यायशासक राज्यात प्रजेला विश्वास, धैर्य आणि सुखाची निद्रा देते. सुराज्यात प्रजा आणि राज्य यांच्या रक्षणासाठी सतर्क असणे आवश्यक असते. प्रजेला संरक्षणाविषयी भय नसेल, तर प्रत्येक नागरिक त्याच्या कार्याचे निर्वाहन अधिक कार्यक्षमतेने करू शकणार. याने राज्य सुख आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणार मित्रा !
३. राजा संपत्तीविषयी निर्लाेभी असेल, तरच राज्य सुराज्याकडे जाऊ शकते !
हे संभाषण चालू असतांनाच प्रभु श्रीरामाच्या पायाला एक खेळणे येऊन धडकले. तिथे खेळणार्या लहान मुलांचे ते खेळणे होते. ‘होणार्या राजाला आपले खेळणे जाऊन लागले’, हे कळल्यावर ती लहान मुले जाऊन लपून बसली; परंतु महाराज सुग्रीवांनी त्यांना समोर बोलावल्यावर ती लहान मुले समोर आली आणि प्रभु श्रीरामाची क्षमा मागू लागली. प्रभु श्रीरामाने त्यांना ‘आपल्या खेळण्यातून कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी’, असे समजावले. यावर ती लहान मुले श्रीरामाला ‘आम्हाला शिक्षा द्या, आम्ही ती भोगण्यास सिद्ध आहोत’, असे म्हणाली. प्रभु श्रीरामाने त्यांच्या प्रामाणिकतेविषयी त्यांना बक्षीस म्हणून सोन्याची माळ दिली. हे पाहून महाराज सुग्रीव यांना अजून एक प्रश्न पडला.
महाराज सुग्रीव : राजाचा धर्म तर सेवा आहे. तुम्ही बालकांना आता धन दिले, त्यावरून कुणी असे नको म्हणायला की, तुम्ही धनाचे प्रदर्शन करत आहात.
प्रभु श्रीराम : जेव्हा राजा आपल्या धनाचे प्रदर्शन करतो, तेव्हा प्रजेचे राज्याप्रती शक्ती आणि सामर्थ्य वाढते, राजाला धनाचे प्रदर्शन जितके घातक आहे, तितकाच धनाचा मोह घातक आहे. जेव्हा राजा स्वतःच्या संपत्तीविषयी निर्लोभी असेल, तेव्हाच तो राज्याला सुराज्याकडे घेऊन जाऊ शकतो. राजाच्या संपत्तीवर प्रजेला अभिमान असेल आणि राजा आपल्या राज्याच्या कामात त्याचा वापर करत असेल, तरच त्यास सुराज्य म्हणता येईल.

४. प्रभु श्रीरामाने योग्य न्यायाच्या माध्यमातून सुराज्य दाखवून देणे
त्याच वेळी त्यांना ३ व्यक्ती एकमेकांशी भांडतांना दिसल्या. प्रभु श्रीरामाने त्यांना त्याचे कारण विचारले. त्या व्यक्ती त्यांना आलेली अडचण सांगण्यास टाळाटाळ करू लागली. तेव्हा प्रभु श्रीरामाने त्यांना समजावले की, प्रजेने राजापासून समस्या लपवणे, हा राजाचा पराजय आणि राज्याच्या पतनाचे सूचक आहे. त्यामुळे जे काही असेल, निःसंकोचपणे सांगा. तेव्हा श्रीरामाला कळले की, त्यातील एक ब्राह्मण, एक लाकूडतोड्या आणि एक वैद्य आहे. लाकूडतोड्या आपल्या पत्नीच्या उपचारांसाठी लाकूड तोडून ते विकून वैद्यांना देण्यासाठी धन कमावणार होता; पण त्याची कुर्हाड मध्येच तुटली. ती दुरुस्त करून आणेपर्यंत ब्राह्मणाने ती लाकडे त्यांच्या यज्ञासाठी वापरली. त्यामुळे लाकूडतोड्याची हानी होऊन त्याला धन मिळाले नाही आणि ते न मिळाल्याने वैद्यांनी लाकूडतोड्याच्या पत्नीच्या उपचारांसाठी नकार दिला. यात ब्राह्मणाने सांगितले, ‘यज्ञाला आम्ही भूमीवर पडलेली लाकडेच वापरू शकतो. शास्त्रात दिल्याप्रमाणे त्यासाठी आम्ही वृक्ष तोडू शकत नाही. म्हणून ती लाकडे भूमीवर पडली असावीत, असे समजून आम्ही ती घेतली.’ यावर महाराज सुग्रीवाने प्रभु श्रीरामाला विचारले, ‘हे तिघे त्यांच्या जागी योग्य आहेत. यामध्ये न्याय कसा करावा ?’ प्रभु श्रीरामाने यावर सांगितले, ‘सुराज्याचा चौथा स्तंभ आहे न्याय !’
त्या वेळी प्रभु श्रीरामाने ब्राह्मणाला समजावून सांगितले, ‘लाकूडतोड्याची लाकडे घेतल्याने त्याची हानी झाली, त्यामुळे त्याला धन मिळाले नाही आणि त्याला धन न मिळाल्याने वैद्याला त्याची उपजीविका मिळाली नाही. मग ही अडचण ज्याच्यामुळे आली, त्या परिस्थितीला कुणी सुधारायला पाहिजे ?’ ब्राह्मणाला त्याची चूक उमजली आणि त्याने लाकडे घेतली होती त्याची भरपाई लाकूडतोड्याला दिली. प्रभु श्रीरामाने त्विरत वैद्यांना लाकूडतोड्याच्या पत्नीच्या उपचारांना आरंभ करण्यास सांगितले आणि ते स्वतः वैद्यांच्या साहाय्याला गेले.
यानंतर प्रभु श्रीरामाने महाराज सुग्रीवाला सांगितले, ‘राज्यातील कुणीही व्यक्ती संकटात असू दे, त्याला साहाय्य करायला जेव्हा समाज धावून जातो, त्याला ‘सुराज्य’ म्हणतात. राजा जेव्हा त्याच्या क्षमतेचा वापर पूर्णपणे प्रजेसाठी करतो, त्याला सुराज्य म्हणतात.’ अशा प्रकारे प्रभु श्रीरामाने महाराज सुग्रीवाचे शंकानिरसन केले.
५. भारतात पुन्हा एकदा रामराज्य स्थापित होणार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुराज्य आणण्यात सक्षम आहेत आणि आपण वेळोवेळी तसे पाहिले आहे. मोदी यांच्या हस्ते झालेल्या धर्मध्वजाचे ध्वजारोहण आणि गोवा येथील प्रभु श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे अनावरण भारतात येणारे सुराज्य अन् रामराज्य यांची पायाभरणीच आहे. यातून ‘भारतात पुन्हा एकदा रामराज्य स्थापित होणार’, याविषयी ईश्वराने आश्वस्त केले आहे.
– कु. वेदिका भागवत (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२९.११.२०२५)
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !