भारतीय शिक्षणपद्धत देशात रुजवण्यासाठी मेकॉले शिक्षणपद्धतीचा अंत करण्याचा सुयोग्य निर्णय !

मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीला नष्ट करून भारतीय शिक्षणपद्धत आपल्या देशात रुजवण्यासाठी प्रयत्न करणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर दोषी असतील, तर तशाच प्रकारचा दोष म. गांधींनासुद्धा द्यावा लागेल; कारण… गांधी हे हिंदुस्थानातील इंग्रजांच्या शिक्षणनीतीचे प्रखर विरोधक होते. इंग्रजांनी हिंदुस्थानात सत्ता स्थापन केल्यानंतर भारतीय शिक्षणपद्धतीचा विध्वंस केला. इंग्रजांनी हिंदुस्थानच्या शिक्षणाचा प्रचार करण्याचा आव आणून ‘आपणच हिंदुस्थानात शिक्षणाचे सार्वत्रिकरण करत आहोत’, असा खोटा प्रचार केला. ‘हिंदुस्थानात शिक्षण केवळ काही थोड्यांनाच खुले होते आणि बाकी तमाम जनता शिक्षणापासून वंचित होती’, असे सांगून प्रजेच्या डोळ्यात धूळ फेकली. ‘ब्रिटिशांचे म्हणणे चुकीचे आहे’, हे म. गांधी यांनी वर्ष १९३१ मध्ये इंग्लंडच्या एका सभेत सांगितले. त्यांच्या या विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली.

१. म. गांधींनी भारतातील शिक्षणव्यवस्थेविषयी गोलमेज परिषदेत मांडलेले विचार

म. गांधी वर्ष १९३१ मध्ये ‘गोलमेज परिषदे’च्या निमित्ताने लंडनला गेले होते. तेथील त्यांच्या मुक्कामात त्यांना व्याख्यान देण्यासाठी ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्स’ या संस्थेने निमंत्रित केले होते. २० ऑक्टोबर १९३१ या दिवशी चॅटेम हाऊसमध्ये झालेल्या व्याख्यानात त्यांनी ‘भारताचे भवितव्य’ या विषयावर विचार मांडले. या भाषणासाठी इंग्लंडमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. ब्रिटिशांच्या शासन काळात हिंदुस्थानातील न्यून होत चाललेल्या साक्षरतेच्या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले. त्या वेळच्या भाषणात गांधी म्हणाले, ‘‘५० किंवा १०० वर्षांपूर्वीपेक्षा भारतात निरक्षरता आज अधिक आहे. त्याचे कारण असे की, भारतात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या शिक्षण आणि इतर गोष्टींची जपणूक करण्याऐवजी ब्रिटीश शासनाने त्याचे उच्चाटन करण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी भूमी खोदून सर्वांग सुंदर विशाल वृक्षाची मुळे पहायला आरंभ केला आणि ती मुळे तशीच उघडी ठेवून दिली. पहाता पहाता भारतीय शिक्षण परंपरेचा तो सुंदर वृक्ष उन्मळून पडला.’’

लॉर्ड मेकॉले

म. गांधींचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे धर्मपाल यांनी त्यांच्या या भाषणाचा संपूर्ण अभ्यास केला आणि ‘द ब्युटीफुल ट्री’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात गांधींच्या वरील भाषणाचा उल्लेख पृष्ठ ५६ वर करण्यात आला आहे.

२. मॅक्समुल्लरचे वेदाध्ययनामागील कारण आणि पाश्चात्त्य शैक्षणिक धोरण राबवण्यामागील हेतू

मॅक्समुल्लर

‘हिंदुस्थानातील वेदविद्या नष्ट करणे’, हेच नवे शैक्षणिक धोरण राबवण्यामागचा मेकॉलेचा प्रधान हेतू होता. भारतीय संस्कृतीला हानी पोचवण्यासाठी आणि ख्रिस्ती धर्माचा प्रचार होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे; म्हणून वेदांच्या अभ्यासामागील उद्दिष्ट नेमके काय आहे, ते बायकोला आणि मुलांना मॅक्समुल्लरने पत्रातून लिहून कळवले.

वर्ष १९०२ मध्ये मॅक्समुल्लरच्या बायकोने त्यांचे चरित्र प्रकाशित केले, तसेच त्याच्या पत्रांचे २ खंडात प्रकाशन केले. त्यातील काही पत्रातून वेदांचा अनुवाद करून त्यांचा अभ्यास करण्यामागील हेतूवर प्रकाश पडतो. ‘लाईफ अँड लेटर्स ऑफ फ्रेडरिक मॅक्समुल्लर’ या पुस्तकात काही पत्रे मूळ स्वरूपात प्रसिद्ध झाली आहेत. ९ डिसेंबर १८६६ या दिवशी मॅक्समुल्लर याने पत्नीला जे पत्र दिले त्यात म्हटले आहे…

‘माझा वेदांचा हा अनुवाद आणि माझे सायनभाष्यसहित ऋग्वेदाचे जे संस्करण आहे ते उत्तरकाळात भारतावर फार दूरगामी परिणाम करील. हिंदुस्थानातील हिंदु धर्माचे मूळ आणि मागे ३ सहस्र वर्षांपासून निर्माण झालेल्या वेदांसंबंधीच्या श्रद्धा याला मुळापासूनच उपटण्याचा हा एक उपाय आहे. त्याचे मूळ दाखवण्याच्या वरकरणी केलेल्या प्रयत्नातून मुळापासून त्यांना तोडण्याची क्रिया घडेल.’

मॅक्समुल्लर यांनी त्यांच्या मुलालाही पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी लिहिले… ‘संपूर्ण विश्वात जे धर्मग्रंथ आहेत त्यात पहिला क्रमांक ‘न्यू टेस्टामेन्ट बायबल’चा आहे. नीतीच्या दृष्टीने दुसरा क्रमांक ‘कुराणा’चा आहे आणि तिसर्‍या क्रमांकावर ‘ओल्ड टेस्टामेंट’ आहे. बौद्ध ‘त्रिपिटकां’चा चौथा क्रमांक लागतो, तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर अनुक्रमे ‘ला आतसे’ अन् ‘कन्फ्युशिअस’ येतात अन् शेवटच्या क्रमांकावर ‘वेद’, ‘अवेस्ता’ येतात.’

श्री. दुर्गेश परुळकर

१६ डिसेंबर १८६८ या दिवशी मॅक्समुल्लर यांनी ड्युक ऑफ ऑरगाईल यांना एक पत्र लिहिले. त्यात ते लिहितात… ‘हिंदुस्थानातील प्राचीन धर्माचे पतन झाले आहे, तरीसुद्धा तेथे ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला नाही, यात माझा काय दोष ?’

एन्.के. मुजुमदार यांना मॅक्समुल्लर यांनी मृत्यूपूर्वी एक वर्ष आधी, म्हणजे ३० ऑक्टोबर १८९९ या दिवशी एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी स्पष्ट लिहिले… ‘मी हिंदु धर्माला शुद्ध करून ख्रिस्तीकरणाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि केशवचंद्रांसारखे लोक प्रकटपणे ख्रिस्ती धर्माचा प्रचार का करत नाहीत ? जसे जर्मन चर्च इंग्रजी चर्च आहे, त्याप्रमाणे हिंदु चर्च होईल. नदीवर पूल सिद्ध आहे. केवळ तुम्ही त्यावरून चालत येणे शेष आहे. पुलाच्या पलीकडे लोक तुम्हा सर्वांच्या स्वागतासाठी तुमची वाट पहात आहेत.’

याच पत्रात मॅक्समुल्लर मुजुमदार यांना विचारतात… ‘तुम्हाला तुमच्या धर्मात काही सुधारणा करण्यात, त्याचप्रमाणे आपल्या देशातील लोकांना खुलेपणाने ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासंबंधी सांगण्यात आणि त्यांच्या संबंधित कार्य करण्यात काही अडचणी असल्यास आपण स्पष्टपणे आम्हास सांगावे.’

३. ब्रिटिशांची कुबुद्धी

मेकॉलेने हिंदुस्थानच्या प्रजेतील काहींना त्यांच्या संस्कृती प्रवाहापासून तोडले. त्यांची अभिरूची पालटली. म. गांधींनी त्यांच्या ‘हिंदु स्वराज्य’ या ग्रंथात याविषयी स्पष्टपणे लिहिले आहे, ‘मेकॉलेने हिंदुस्थानातील शिक्षणाचा पायाच नष्ट केला. इंग्रजी शिक्षणपद्धतीतून सिद्ध झालेल्या, देशापासून तुटलेल्या आणि उपर्‍या झालेल्या लोकांच्या हातात या देशाचे स्वराज्य गेले, तर अनावस्था प्रसंग ओढवेल अन् विपरीत स्थिती निर्माण होईल.’

मेकॉले आणि त्याच्यासारख्या अनेक इंग्रजी अधिकारी यांना जगात सर्वांत श्रेष्ठ असलेली भारतीय संस्कृती, भारतातील सर्वोत्तम शिक्षणपद्धत, विविध विषयांवरील लक्षावधी ग्रंथांनी सजलेली ग्रंथालये ही हिंदुस्थानची ज्ञानलालसा आणि सभ्यता जगाला मूकपणे त्याचा अनुभव देत होती; पण हे सर्व नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांची कुबुद्धी पुढे सरसावली. विकृत मनोवृत्तीच्या इंग्रज अधिकार्‍यांना मात्र हिंदुस्थानचे हे शैक्षणिक आणि ज्ञानवैभव सहन झाले नाही. ते नष्ट करण्यासाठी त्यांनी विडा उचलला आणि स्वतःच्या असंस्कृत विकृतींचे प्रदर्शन मांडले.

४. जहाजे बनवण्यात भारतीय अग्रेसर

भारत ज्ञानाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये जगात सर्वोच्च स्थानावर विराजमान झालेला परकीय आक्रमकांना सहन झाला नाही. त्यांच्यातील राक्षसी वृत्ती कशी प्रकट झाली आणि तिने हिंदुस्थानातील ज्ञानाचे वैभव कसे नष्ट केले, त्याचा हा दाखला आहे. याचा सविस्तर तपशील देणे नितांत आवश्यक आहे.

पाश्चात्त्यांचा जेव्हा हिंदुस्थानशी संपर्क आला, तेव्हा त्यांनी हिंदुस्थानातील जहाजे पाहिली आणि ते आश्चर्यचकित झाले. १७ व्या शतकात युरोपीय जहाजे अधिकाधिक ६०० टनांची होती. भारतातील ‘गोधा’ नावाची १५०० टनापेक्षा अधिक मोठी जहाजे या पाश्चात्त्य लोकांनी पाहिली. युरोपीय कंपन्यांनी ही जहाजे वापरायला आरंभ केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर हिंदुस्थानी कारागिराकडून जहाजे बनवून घेण्यासाठी अनेक कारखाने चालू केले.

वर्ष १८११ मध्ये लेफ्टनंट वॉकर यांनी ब्रिटीश सरकारला कळवले, ‘ब्रिटिशांच्या ताफ्यातील जहाजांच्या दुरुस्त्या प्रत्येक १२ वर्षांनी कराव्या लागतात. सागवानी लाकडाच्या भारतीय जहाजांचा वापर २५ वर्षांपेक्षा अधिक काळ कोणत्याही दुरुस्तीविना करता येतो. ईस्ट इंडिया कंपनीजवळ ‘दर्या दौलत’ नावाचे एक जहाज होते, ते सलग ८७ वर्षे कोणत्याही दुरुस्तीविना वापरले गेले. जहाजे बनवण्यासाठी शिसव, साल आणि सागवान या वृक्षांच्या लाकडांचा वापर केला जात आहे.’

वर्ष १८११ मध्ये एक फ्रेंच प्रवासी वाल्झर सॉलविन्स याने त्याच्या ‘ल हिंदू’ नावाच्या पुस्तकात लिहिले, ‘प्राचीन काळापासून नौका निर्माण करण्याच्या कलेत हिंदु सर्वांत अग्रेसर होते. आजही ते युरोपीय लोकांना धडा शिकवू शकतील. कला शिकण्यात तरबेज असलेल्या इंग्रजांनी हिंदूंकडून जहाज निर्मितीच्या कित्येक गोष्टी शिकून घेतल्या. भारतीय जहाजांमध्ये सौंदर्य आणि उपयुक्तता यांचा पुष्कळ सुंदर मेळ घातला जातो. ती जहाजे भारतीय कारागिरी आणि धैर्य यांचे उत्तम नमुने आहेत. मुंबई येथील कारखान्यात वर्ष १७३६ ते १८६३ या कालखंडात ३०० जहाजे सिद्ध झाली. त्यातील बरीचशी इंग्लंडच्या शाही ताफ्यात भरती केली गेली. त्यात ‘एशिया’ नावाचे जहाज २२८९ टनांचे होते, त्यात ८४ तोफा बसवल्या होत्या. बंगाल प्रांतात हुगळी, सिल्हट, चटगाव, ढाका इत्यादी ठिकाणी जहाजाचे कारखाने होते. वर्ष १७८१ ते १८२१ या कालखंडात १ लाख २२ सहस्र ६९३ टनांची २७२ जहाजे फक्त हुगळीमध्येच सिद्ध झाली.

५. इंग्रजांची कुटीलता

ब्रिटीश जहाज कंपन्यांना हिंदुस्थानच्या जहाज निर्मितीच्या कलेचा उत्कर्ष सहन झाला नाही. त्यांनी भारतीय जहाजांचा वापर होऊ नये, याच हेतूने ईस्ट इंडिया कंपनीवर दबाव आणला. त्यांनी अनेक वेळा चौकशी केली. वर्ष १८११ मध्ये कर्नल वॉकर यांनी आकडेवारी देऊन सिद्ध केले, ‘भारतीय जहाजांच्या निर्मितीसाठी पुष्कळ अल्प व्यय येतो आणि ती तितकीच मजबूत असतात. जर ब्रिटीश ताफ्यामध्ये केवळ भारतीय जहाजेच वापरली, तर व्ययात पुष्कळच मोठी बचत होऊ शकेल.’

जहाज निर्माते इंग्रज कारागीर आणि व्यापारी यांना ही गोष्ट खटकली. डॉ. टेलर यांनी लिहिले, ‘जेव्हा हिंदुस्थानी मालाने लादलेले भारतीय जहाज लंडन बंदरात पोचले, तेव्हा जहाजांच्या इंग्रज व्यापार्‍यांमध्ये घबराट उत्पन्न झाली. थेम्स नदीतून शत्रूपक्षाच्या जहाजांनी आक्रमण केल्यावर जेवढी घाबरगुंडी उडाली असती, त्यापेक्षा अधिक घाबरगुंडी उडाली होती.’ लंडन बंदरातील कारागिरांनी त्याही आधी आरडाओरड करण्यास आरंभ केला होता. आमच्या सर्व कामाची विल्हेवाट लागून आमची कुटुंबे उपासमारीने मरून जातील. ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने लिहिले आहे, ‘हिंदुस्थानी खलाशांनी तेथे आल्यावर आमचे जे सामाजिक जीवन पाहिले, त्यामुळे भारतात युरोपीय आचारविचारांविषयी त्यांना आधी असलेला आदर अन् भय नष्ट झाले. आपल्या देशात परत जातील, तेव्हा आमच्याविषयी वाईट गोष्टींचा प्रसार ते करतील. त्यामुळे आशियातील नागरिकांमध्ये आज आमच्या आचरणाविषयी जो आदरभाव आहे, ज्याच्या जोरावर आम्ही आमचे प्रभुत्व टिकवले आहे, ते नष्ट होईल. त्याचा परिणाम पुष्कळ हानीकारक ठरेल.’

याचा विचार करण्यासाठी ब्रिटीश संसदेने सर रॉबर्ट पील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या समितीमध्ये असलेल्या सभासदांच्या मतात आणि विचारात तफावत असूनसुद्धा वर्ष १८१४ मध्ये त्यांनी सादर केलेल्या अहवालावर आधारित एक कायदा पारित केला गेला. त्यानुसार भारतीय खलाशांना ब्रिटीश नाविक बनवण्याचा अधिकार राहिला नाही. ‘ब्रिटीश जहाजांवर तीन चतुर्थांश खलाशी इंग्रजी असले पाहिजेत’, असाही कडक नियम करण्यात आला. ‘ब्रिटीश मालकांच्या जहाजाव्यतिरिक्त अन्य कोणतेही जहाज लंडन बंदरात प्रवेश करू शकणार नाही’, असाही कायदा करण्यात आला. ‘इंग्रजांव्यतिरिक्त अन्य कुणीही बनवलेल्या जहाजातून बाहेरून माल इंग्लंडमध्ये येणार नाही’, असाही कायदा पारित करण्यात आला. काही कारणामुळे या नियमांच्या कार्यवाहीत ढिलाई झाली; पण वर्ष १८६३ पासून त्याची कार्यवाही काटेकोरपणे करण्यात आली. भारतातसुद्धा प्राचीन नौका निर्मिती कलेचा अंत होईल, असे कायदे करण्यात आले. भारतीय जहाजांवर लाभलेल्या मालावरचा कर वाढवला गेला. अशा प्रकारे भारतातील जनतेवर जहाज निर्मिती करण्यासाठी आणि त्यांचा व्यापार वाढवण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली. यावर प्रतिक्रिया देतांना सर विल्यम डिग्विन यांनी लिहिले, ‘पाश्चात्त्य जगाच्या राणीने अशा प्रकारे पूर्वेकडील सागराच्या राणीचा वध केला.’

६. ‘आचारविचारस्वातंत्र्या’ला किंमत देण्याची आवश्यकता नाही !

ज्यांच्या शिक्षणपद्धतीने आणि ज्यांच्या कायद्यामुळे हिंदुस्थानची सर्व क्षेत्रांतील प्रगती जाणीवपूर्वक रोखण्याचा प्रयत्न करून, तसेच हिंदु धर्म, संस्कृती अन् शिक्षणव्यवस्था या सर्वांचे मुळासह उच्चाटन करणार्‍या खलप्रवृत्तीला नष्ट करून स्वतःचे अस्तित्व, श्रद्धा, परंपरा टिकवण्याचा अधिकार जगातील सर्व मानवी समाजाला असला, तरीसुद्धा हिंदु समाजाला तो देण्यासाठी आम्ही सिद्ध नाही, अशी विचारसरणी जगात रुजवण्यात आली. त्यामुळे हिंदुस्थान हे स्वतंत्र राष्ट्र झाले, तरी त्याने त्याच्या हितासाठी, त्याच्या संवर्धनासाठी कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्रपणे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला, तर मात्र भारतात थयथयाट चालतो. यालाच ‘आचारविचारस्वातंत्र्य’ असे म्हणतात. याला कवडीचीही किंमत देण्याची आता आवश्यकता नाही.

(साभार : १. ‘शिक्षण नीतीचे राजकारण’, लेखक : प्रभाकर मांडे, गोदावरी प्रकाशन, आवृत्ती दुसरी

२. ‘भारताची उज्ज्वल विज्ञान परंपरा’, लेखक : सुरेश सोनी, अनुवाद : डॉ. क.कृ. क्षीरसागर, प्रकाशन : भारतीय विचार साधना, पुणे; प्रथम आवृत्ती)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (१२.१२.२०२५)