कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांचा आध्यात्मिक इतिहास पहाणार आहोत. या लेखात आज आपण भारतीय कलांच्या निर्मितीविषयी समजून घेऊ.
(लेखांक १०)
लेखांक ९ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/978611.html
नाट्यकलेचा आध्यात्मिक इतिहास !
‘भारतीय इतिहासात, तसेच ४ वेद, उपनिषदे अन् पुराणे यांत नाट्यतत्त्व आहे; कारण त्यात खिळवून ठेवणार्या कथा, प्रसंग आणि घटना आहेत. लिखित स्वरूपातील कथा आणि काव्ये यांतही नाट्यमयता असते; पण जेव्हा आपण ती घटना प्रत्यक्ष घडतांना पहातो आणि ऐकतो, तेव्हा आपण नाट्यतत्त्वाचे प्रत्यक्ष कृतीरूप अनुभवतो. श्रीविष्णूने घेतलेली दशावतारातील सर्व रूपे हीसुद्धा भगवंताची विश्वकल्याणार्थ केलेली नाट्यलीलाच आहे. या लेखात आपण ‘नाट्यकलेचा आध्यात्मिक इतिहास, वेदकालीन नाट्यकलेचे स्वरूप, अतिप्राचीन काळापासून मंदिरव्यवस्थांमध्ये असलेले नाट्यकलेचे महत्त्व, ४ युगांमधील नाट्यकला’ इत्यादी जाणून घेणार आहोत.
भारतीय नाट्यकला ही प्राचीन काळापासून ईश्वराची साधना, धर्मोपदेश आणि आध्यात्मिक जागृती यांचे साधन म्हणून वापरली गेली आहे. नाट्यकलेचा आध्यात्मिक प्रवास सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या चारही युगांत स्पष्ट दिसतो.
१. सत्ययुगातील नाट्यकला
सत्ययुगात नाट्य प्रकारांचा प्रत्यक्ष उल्लेख अल्प असला, तरी सृष्टीनिर्मितीची ब्रह्मदेवाची लीला ही नाट्यतत्त्व दर्शवते. सत्ययुगातील सर्व घटनांमध्ये नाट्यमयता असल्याने त्या नाट्यतत्त्वाच्या बीजस्वरूप आहेत, उदा. श्री विष्णूचे मत्स्यावतार, कूर्मावतार, वराह अवतार इत्यादी.
२. त्रेतायुगातील नाट्यकला
त्रेतायुगात नाट्यतत्त्वाचा उपयोग आध्यात्मिक उपासना म्हणून केला गेला. त्या काळात ‘नाट्य’ ही केवळ कला नसून ते देवाने मानवाला केलेले धर्माविषयीचे मार्गदर्शन होते.

२ अ. वेदकालीन यज्ञांतील नाट्यमयता : ‘त्या काळात ऋषी वेदांतील संवादसूक्त म्हणतांना त्या त्या व्यक्तीचा अभिनय करून म्हणत असावेत’, असे संशोधकांचे मत आहे.’ (साभार : ‘भारतीय कला : उद्गम आणि विकास’, लेखक : श्री. वि.य. कुलकर्णी)
वेदांतील संवादसूक्त म्हणतांना ऋषी त्या त्या पात्राशी एकरूपता साधत असत, म्हणजेच ‘अभिनय हा प्रस्तुतीसाठी नसून ईश्वरप्राप्तीसाठीच होता’, हे लक्षात येते.
२ आ. नाट्यशास्त्राची उत्पत्ती (पंचमवेद) : त्रेतायुगात लोक धर्मापासून दूर जाऊ लागले. तेव्हा इंद्रादी देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला यावरील उपाय विचारला. तेव्हा ब्रह्मदेवाने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांतील तत्त्वे एकत्र करून ‘नाट्य’, हा पंचमवेद निर्माण केला. ब्रह्मदेवाने ऋग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गीत, यजुर्वेदातून अभिनय आणि अथर्ववेदातून रस घेऊन ‘नाट्यशास्त्र’, या पाचव्या वेदाची निर्मिती केली. ब्रह्मदेवाने भरतमुनींना नाट्याविषयीचे शिक्षण देऊन स्वतःच्या पुत्रांसह नाट्यप्रयोग करण्याची आज्ञा दिली.
२ आ १. नाट्याचा आध्यात्मिक अर्थ : नाट्यशास्त्रामध्ये ‘नाट्य हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ साधण्याचे माध्यम आहे’, असा नाट्याचा आध्यात्मिक अर्थ सांगितलेला आहे.
२ आ २. ‘समुद्रमंथन’ आणि ‘त्रिपुरदाह’, या नाटकांचा प्रयोग : ‘ब्रह्मदेवाच्या आज्ञेने भरतमुनींनी आपल्या शंभर पुत्रांना (शिष्यांना) नाट्यशास्त्राचे शिक्षण दिले. ब्रह्मदेवाने स्त्रीपात्रासाठी अप्सरांची निर्मिती केली. भरतमुनींनी आपल्या १०० पुत्रांसह ‘इंद्रध्वज महोत्सवा’त दानवांच्या नाशाचे एक नाट्य प्रस्तुत केले. ते पाहून दैत्यांना राग आला. त्यांनी या नाट्यप्रयोगात विघ्ने आणली. त्या वेळी ब्रह्मदेवाने देवशिल्पी विश्वकर्मा याच्याकडून भव्य नाट्यमंडपाची रचना केली, तसेच असुरांपासून नाट्यमंडपाच्या रक्षणासाठी विविध देवतांची नियुक्ती केली.
२ आ २ अ. समुद्रमंथन : ईश्वरी संकल्पाने निर्माण झालेल्या नाट्यमंडपात भरतमुनींनी ‘समुद्रमंथन’ हे पहिले नाटक प्रस्तुत केले. त्या वेळी सर्व देवीदेवता उपस्थित होत्या.
२ आ २ आ. त्रिपुरदाह : भगवान शिवाच्या समक्ष भरतमुनींनी ‘त्रिपुरदाह’, या नाटकाचा प्रयोग केला. तो पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाला. त्याने भरतमुनींना नाट्यप्रयोगाच्या संदर्भात मार्गदर्शनही केले. या मार्गदर्शनानुसार नाट्यामध्ये नृत्य, गायन आणि वादन यांचा समावेश झाला.’
(साभार : भरतमुनिविरचित ‘नाट्यशास्त्र’, अध्याय पहिला, अनुवादक – डॉ. संध्या पुरेचा आणि श्रीहरि गोकर्णकर)
३. द्वापरयुगातील नाट्यकला
द्वापरयुगातील नाट्य हे भक्ती, उपासना, धर्मशिक्षण आणि आध्यात्मिक उपासना यांचे साधन होते.
अ. ‘महाभारत’ या धर्मग्रंथामध्ये ‘नट’, ‘सूत्रधार’, ‘रंगशाळा’, यांचे उल्लेख आढळतात. ‘श्रीकृष्णाच्या पुत्रांच्या विवाहाच्या वेळी ‘रामायण’, हे नाटक सादर केले गेले. कृष्ण-रुक्मिणी यांनीही त्यात भूमिका केल्या’, असा उल्लेख आढळतो.’ (साभार : संस्कृतनाट्यकोश)
आ. युद्धापूर्वी मानसिक बळ मिळवण्यासाठी रामायण आणि महाभारत यांतील प्रसंगांच्या नाट्याचे सादरीकरण केले जाई.
इ. ‘हरिवंशातील विष्णुपर्वात प्रद्मुम्न, सांब आणि गद या यदुपुत्रांनी ‘रंभा-नलकुबर’, हे नाटक प्रस्तुत केले होते.’ (साभार : ‘भारतीय कला : उद्गम आणि विकास’, लेखक : श्री. वि.य. कुलकर्णी) मतांतरे
ई. ‘पतंजलि यांच्या ‘महाभाष्य’मध्ये ‘कंसवध’ आणि ‘वलिबंध’, या नाटकांचा उल्लेख आहे.’ (साभार : संस्कृतनाट्यकोश)
३. कलियुगातील नाट्यकला
३ अ. प्राचीन संस्कृत रंगभूमी : हा भारतीय नाट्यकलेतील एक अनमोल आध्यात्मिक ठेवा आहे.
३ अ १. नाटककार भास यांनी ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या धर्मग्रंथांतून प्रेरणा घेऊन नाट्यकला करणे : पहिला प्राचीन नाटककार भास यांची १३ नाटके उपलब्ध आहेत. त्यांतील ६ नाटके महाभारतातील आणि २ नाटके रामायणातील प्रसंगांवर आहेत. ‘भास यांनी या दोन्ही धर्मग्रंथांतून प्रेरणा घेऊन नाट्यकला केली’, हे यातून स्पष्ट होते.
‘भास यांच्याविषयी कानडीतील विख्यात नाटककार आद्य रंगाचार्य म्हणतात, ‘‘महाभारताने ज्या वैदिक हिंदु संस्कृतीचा पुरस्कार केला होता, त्या संस्कृतीचे नाट्यरूपाने गुणगान करण्याचा भासाचा उत्कृष्ट हेतू होता’, हे स्पष्ट आहे.’’
(साभार : ‘भारतीय कला : उद्गम आणि विकास’, लेखक : श्री. वि.य. कुलकर्णी)
३ अ २. कालिदासांनी आपल्या नाटकांतून भारतीय संस्कृतीतील नीतीमूल्यांचे दर्शन घडवणे : संस्कृत रंगभूमीवरील श्रेष्ठ नाटककार कालिदास यांनी त्यांच्या ‘विक्रमोर्वशीय’, ‘मालविकाग्निमित्र’, ‘अभिज्ञान शाकुंतल’, या नाटकांतून भारतीय संस्कृतीतील नीतीमूल्यांचे दर्शन घडवले; म्हणूनच भारतातच नाही, तर जगभरात आजही त्यांची नाटके सादर केली जातात. त्यांच्या ‘अभिज्ञान शाकुंतल’, या लोकप्रिय झालेल्या नाटकाने जागतिक पातळीवर स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला. कालिदासांच्या नाटकांची महती सांगतांना पं. महादेव शास्त्री जोशी म्हणतात, ‘‘तप, तपोवन आणि त्याग’, ही जणू कालिदासांची आदर्शत्रयी आहे. त्यांनी आपल्या नाटकांतून दिव्य जीवनाविषयीचे संदेश देऊन ठेवले आहेत.’’
३ आ. भक्तीसंप्रदाय आणि नाट्यकला : जरी पुढील काळात भारतात संस्कृत नाटक लोप पावले, तरी नाटक मात्र जिवंत राहिले. दहाव्या शतकानंतर संत संप्रदाय वाढीस लागला. अनेक संतांनी भागवत पुराणातील भक्तीरसपूर्ण कथांवर कीर्तन, हरिकथा कथन, भारूड यांसारख्या कलाप्रकारांतून ‘लेखन, गायन, वादन, नृत्य, निवेदन, निरुपण, अभिनय आणि वेशभूषा’, या नाट्याच्या सर्व घटकांचा कौशल्याने वापर केला अन् नाट्यमय पद्धतीने समाजाचे आध्यात्मिक उद्बोधन केले. विशेषकरून महाराष्ट्राने ही धुरा अत्यंत प्रभावीपणे पुढे नेली.
३ इ. मंदिरांतील नाट्यप्रस्तुती ! : वैदिक काळात यज्ञाच्या वेळी जशी नाट्यकलेची प्रस्तुती होत होती, तशाच पुढे मंदिरांमध्ये नाट्यप्रस्तुती होऊ लागल्या. ‘मंदिरांमधून नाट्याच्या माध्यमातून ईश्वराची स्तुती करणे आणि भक्ती करणे’, ही प्राचीन काळापासून आपली परंपरा होती. रामायण आणि महाभारत यांतील कथांचे नाट्यातून सादरीकरण होऊ लागले. प्राचीन काळी मंदिरांच्या रचनाच अशा होत्या की, तेथे रंगमंच, रंगमंडप असे आणि तेथे नाट्याच्या माध्यमातून धार्मिक आख्यायिकांचे खेळ होत असत. अजूनही महाराष्ट्रात ‘दशावतार (विष्णूच्या दहा अवतारांचे नाट्य)’, तर कर्नाटकात ‘यक्षगान’, केरळच्या मंदिरांतून ‘कुडीअट्टम’, तर आसाममध्ये ‘अंकिया नाट’, ही लोकनाट्ये सादर केली जातात. भारतातील विविध राज्यांमध्ये अशा प्रकारच्या लोकनाट्यांतून पौराणिक कथांची प्रस्तुती होते.
साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती
या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
संपर्कासाठी पत्ता –
श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८
ईमेल : [email protected]
४. सारांश
विश्वातील सर्वांत प्राचीन अशा भारतीय नाट्यकलेच्या इतिहासातून हेच लक्षात येते की, भारतातील नाट्यकलेची परंपरा ही केवळ रंजनासाठी नसून तिला सखोल आणि व्यापक आध्यात्मिक बैठक आहे. सध्याच्या कलियुगामध्ये नाट्यकलेची स्थिती पहाता ‘समाज नाट्यकलेच्या मूळ उद्देशापासून पुष्कळ दूर गेला आहे’, हे दिसून येते. नाट्यकलेचा मूळ आध्यात्मिक उद्देश जाणून त्या माध्यमातून साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना झाली आहे.’
– सौ. शुभांगी शेळके (एम्.ए. नाट्यशास्त्र), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.११.२०२५)
लेखांक ११ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/990406.html

अनैतिकतेचा बाजार !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !