कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांचा आध्यात्मिक इतिहास पहाणार आहोत. या लेखात आज आपण भारतीय कलांच्या निर्मितीविषयी समजून घेऊ.
(लेखांक ९)
लेखांक ८ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/976325.html

नृत्यकलेचा आध्यात्मिक इतिहास !
‘१४ विद्या आणि ६४ कला यांची निर्मिती हे एक ‘दैवी प्रयोजन’ आहे. ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या चारही कला एकमेकांशी संलग्न असल्याने त्यांची निर्मितीही एकमेकींसह झाली आहे’, असे आपण म्हणू शकतो. शास्त्रकार, तसेच इतिहासकार यांनी अनेक पैलूंचा सखोल अभ्यास करून या कलांचा इतिहास मांडला आहे. या लेखातून आपण ‘नृत्यकलेच्या निर्मितीचा संक्षिप्त इतिहास’ जाणून घेणार आहोत.
१. सत्ययुगाच्या आरंभीचे नृत्य
१ अ. उत्पत्ती (सृष्टी), स्थिती आणि लय यांचे प्रतीक असलेले भगवान नटराजाचे (शिवाचे) तांडव नृत्य ! : ‘नृत्यकला’ ही भगवान शिवापासून निर्माण झाली आहे. भगवान शिवाने जे परम दैवी, गतीमान आणि आवेशपूर्ण नृत्य केले, त्यास ‘तांडव’, असे म्हणतात. भगवान शिवाच्या या अद्भुत नृत्याचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे. सृष्टीची निर्मिती भगवान शिवाच्या ‘तांडव’ नृत्यातून झाली आहे. सृष्टीचा तोल हा भगवान शंकराच्या तांडव नृत्यानेच राखला जातो, तसेच सृष्टीच्या अंतिम समयीही (प्रलयकाळातही) भगवान शिवाचे तांडव नृत्य होते. याचाच अर्थ सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि लय हे तांडव नृत्यात दडले आहे.’ (साभार : श्री आद्य शंकाराचार्य रचित ‘सौन्दर्यलहरी’ आणि ‘अर्धनारीश्वरस्तोत्र’, तसेच ‘ललितासहस्रनाम स्तोत्र’)
१ आ. सौंदर्य आणि लालित्य यांचे प्रतीक असलेले देवी पार्वतीचे लास्य नृत्य ! : ‘भगवान शिवाच्या रौद्ररसयुक्त आणि प्रलयकारी तांडव नृत्यामुळे संपूर्ण पृथ्वी थरथरू लागली. त्यामुळे तिचे संतुलन होण्यासाठी तांडव नृत्याच्या गुणांच्या विरुद्ध असणारे कोमल, नाजूक हालचाली आणि लालित्यपूर्ण पदन्यास यांनी युक्त, असे नृत्य देवी पार्वतीने केले. त्यास ‘लास्य’ नृत्य म्हणतात. या नृत्यामुळे पृथ्वीचा समतोल राखला गेला. लास्य नृत्य हे पृथ्वीच्या सृजनाशी (उत्पत्तीशी) संबंधित आहे.’ (साभार : अर्धनारीश्वरस्तोत्र आणि भरतमुनीरचित ‘नाट्यशास्त्र’)

१ इ. श्रीविष्णूच्या ‘मोहिनी अवतारा’चे नृत्य : ‘अमृतमंथनानंतर ‘भस्मासुर’ नावाचा दैत्य उन्मत्त झाला होता. त्याला ‘तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील, तो भस्मसात् होईल’, असे वरदान होते. त्याच्यामुळे पृथ्वीवर निर्माण झालेला हाहाःकार पाहून देवतांनी श्रीविष्णूची करुणा भाकली. त्यानंतर भगवान श्रीविष्णूने परम सुंदर स्त्रीचे ‘मोहिनी रूप’ धारण करून भस्मासुराला मोहित केले. भस्मासुराने तिच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी जसे नृत्य करीन, त्याप्रमाणे तंतोतंत तूही नृत्य करावेस. असे केले, तरच मी तुझ्याशी विवाह करीन.’’ भस्मासुराने तो प्रस्ताव मान्य केला. मोहिनी आणि भस्मासुर हे दोघे नृत्य करत असतांना मोहिनीने त्याला नृत्यात दंग केले आणि तिने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. तिच्याप्रमाणे नृत्य करणार्या भस्मासुरानेही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवण्याची मुद्रा केल्याने तो भस्मसात् झाला. अशा प्रकारे नृत्याच्या माध्यमातून भगवान श्रीविष्णूने (मोहिनीने) सृष्टीचे भस्मासुराच्या संकटापासून रक्षण केले.’ (साभार : भागवतपुराण आणि श्रीविष्णुपुराण)
१ ई. वेदकालीन नृत्य : नृत्याचे उल्लेख वेदांमध्येही आढळतात. यावरून दिसून येते की, नृत्याचा शोध प्रागैतिहासिक काळात (मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या प्रथम कालखंडात) लागला होता. यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांतही नृत्याचे विस्तृत वर्णन आढळते.
१ उ. श्रीमद्भागवत महापुराण, शिवपुराण, तसेच कूर्मपुराण यांतील बर्याच विवरणांमध्ये नृत्याचा उल्लेख केलेला आहे.
२. त्रेतायुगातील नृत्य
२ अ. त्रेतायुगात ब्रह्मदेवाने नाट्यशास्त्राची निर्मिती करणे : सत्ययुगात मनुष्य ‘सोऽहम्’भावात होता. जेव्हा सत्ययुग संपून त्रेतायुगाचा आरंभ झाला, तेव्हा मानवाची सात्त्विकता काही प्रमाणात न्यून झाली. त्याचा अधर्म काही प्रमाणात वाढला. वेदांचे अध्ययन अथवा ज्ञान हे मानवाला त्याच्या बुद्धीपलीकडचे वाटू लागले. पृथ्वीवरील ही स्थिती पाहून देवलोकातील इंद्रादी देव ‘मानवाची ईश्वराप्रती भाव-भक्ती पुन्हा वाढावी आणि त्याला ईश्वरप्राप्ती सुलभ व्हावी’, यांसाठी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने चारही वेदांमधून विविध घटक घेऊन ‘नाट्यशास्त्र’ हा पंचम वेद निर्माण केला आणि तो भरतमुनींना प्रदान केला.
भरतमुनींद्वारे नाट्यशास्त्र सिद्ध होऊन त्यांनी ते तण्डुमुनींना शिकवले. त्यानंतर भरतमुनींचे १०० पुत्र आणि अप्सरा यांनी मिळून ब्रह्मा, विष्णु अन् महेश, तसेच इंद्रादी देवता यांच्या समक्ष ‘त्रिपुरदाह’ आणि ‘अमृतमंथन’, ही नृत्यनाट्ये सादर केली. भगवान शिव यावर अत्यंत प्रसन्न झाला अन् त्याला त्याच्याच अद्भुत नृत्याचे स्मरण झाले. नंतर भगवान शिवाने स्वतः तण्डुमुनींना नृत्याचे धडे दिले. तेच ‘तांडव’ या नावाने प्रसिद्ध आहे. भरतमुनींच्या नाट्यशास्त्राच्या काळापर्यंत भारतीय समाजात अनेक प्रकारच्या कलांचा पूर्ण विकास झाला होता.
२ आ. रामायणातही नृत्याचा उल्लेख आढळतो.
३. द्वापरयुगातील नृत्य
३ अ. पार्वतीदेवीने द्वापरयुगात बाणासुराची कन्या ‘उषा’ हिला लास्य नृत्य शिकवले आणि तिने सौराष्ट्रातील स्त्रियांना त्याचे ज्ञान दिले.
३ आ. दैवी रासलीला : भगवान श्रीकृष्णाने गोपिका आणि राधा यांच्या समवेत कोजागरी पौर्णिमेच्या रात्री अद्वैताची अनुभूती देणारी रासलीला केली.
३ इ. उर्वशी अप्सरेने अर्जुनाला नृत्याचे शिक्षण देणे : द्वापरयुगामध्ये पांडव वनवासात असतांना दिव्यास्त्र प्राप्त होण्यासाठी अर्जुनाने इंद्रदेवाची तपश्चर्या केली. इंद्रलोकात गेल्यावर त्याची भेट ‘उर्वशी’नामक अप्सरेशी झाली. तिने अर्जुनाला नृत्याचे शिक्षण दिले. ते अर्जुनाला अज्ञातवासात असतांना उपयोगी ठरले. अर्जुनाने ‘बृहन्नले’च्या रूपात अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिला नृत्याचे शिक्षण दिले.
३ ई. महाभारताच्या काळापर्यंत ‘नृत्त, नृत्य आणि नाट्य’ (टीप), हे तिन्हीही विकसित झालेले होते.
टीप – नर्तनाचे नृत्त, नाट्य आणि नृत्य असे तीन प्रकार आहेत.
नृत्त : भाव आणि अभिनय विरहित ताल-लय यांच्याशी समन्वय साधत आंगिक हालचाली अन् पदन्यास एकत्रितपणे करणे.
नृत्य : रस, भाव आणि ताल यांनी युक्त असलेले नर्तन.
नाट्य : जे पूर्वकथांवर आधारित असून रसप्रधान आहे, ते नाट्य होय. नर्तनाच्या या प्रकारात अभिनयाला प्राधान्य आहे आणि यात रसोत्कर्ष साधणे महत्त्वाचे मानले आहे.
४. कलियुगातील नृत्य
४ अ. कालिदासाचे ‘शाकुंतल’ आणि ‘मेघदूत’, तसेच वात्स्यायनाचे ‘कामसूत्र’ अन् ‘मृच्छकटिकम्’ इत्यादी प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये नृत्याचे वर्णन आढळते.
४ आ. शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य यांची निर्मिती : पृथ्वीलोकात नृत्य आल्यानंतर त्या त्या प्रदेशांनुसार त्याची जडण-घडण होत गेली आणि ते विकसित झाले. काही नृत्यांना शास्त्राचा आधार लाभला आणि ती नृत्ये शास्त्राच्या नियमांमध्ये बांधली गेली. त्यांचे रूपांतर शास्त्रीय नृत्यांत झाले.
काही प्रदेशांमध्ये तेथील प्रादेशिक परंपरांनुसार लोकनृत्यांची निर्मिती झाली.
४ इ. यवनी आक्रमणांमुळे नृत्यकलेचे पावित्र्य नष्ट होणे आणि राजे अन् संत यांच्या योगदानामुळे नृत्याला ऊर्जितावस्था प्राप्त होणे : या काळात मंदिरे ही नृत्याची प्रमुख केंद्रे बनली होती. देवदासी परंपरेत नृत्य हे देवाची सेवा आणि भक्तीभाव व्यक्त करण्याचे माध्यम होते; परंतु उत्तर भारत, तसेच गुजरात इत्यादी क्षेत्रांमध्ये यवनी आक्रमणांमुळे नृत्यकला ही तिच्या आध्यात्मिक उद्देशापासून पराङ्मुख झाली आणि तिला मनोरंजन, दरबारी कला अन् अर्थाजनाचे साधन म्हणून पाहिले जाऊ लागले. त्याच काळातील दक्षिण भारतातील अनेक महान राजे (राजा कृष्णदेवराय, चोल, पांड्य), तसेच काही सज्जन लोक यांनी कलेचा आध्यात्मिक वारसा सांभाळला आणि कलांच्या शास्त्रीय पद्धतीच्या प्रस्तुतीकरणाला प्रोत्साहन दिले. संगीतादी कलांकडे आदराने पाहिले जाऊ लागले. याच कालावधीत शास्त्रीय नृत्याला पूरक अशा अनेक रचना, काव्य, पदे यांचे लिखाण महान संत आणि कवी यांनी केले, उदा. संत पुरंदरदास, संत मीराबाई इत्यादी.
साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती
या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
संपर्कासाठी पत्ता
श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८
ईमेल : [email protected]
५. नृत्य आणि साधना
नृत्याला प्राचीन काळी योगसाधनेचा एक प्रकार मानले जात होते. त्यातून देह, मन आणि आत्मा यांचा संगम साधला जातो. भारतीय नृत्य ही केवळ कला नसून ते भक्ती, ध्यान आणि आत्मसाधना यांचा मार्ग आहे. त्याचा प्रवास देवांच्या नृत्यापासून वेदकालीन यज्ञमंडप, नाट्यशास्त्राच्या सिद्धांतांपासून मध्ययुगीन मंदिरपरंपरेपर्यंत आणि तेथून आजच्या जागतिक मंचापर्यंत पोचला आहे. नृत्यातील प्रत्येक मुद्रा, हावभाव आणि ठेका हे ईश्वराप्रतीच्या समर्पणाचा भाव व्यक्त करतात.
आजही भारतीय समाजात नृत्य आणि संगीत यांना पुष्कळ महत्त्व दिले जाते. नृत्यकलेचा प्रवास हा काळासह पालटत गेला, तरी तिचा मूळ गाभा आजही ‘ईश्वराची आराधना’ हाच आहे. प्राचीन काळातील देवपूजेतून आरंभ झालेली ही कला आजच्या आधुनिक मंचावरही अंतर्मनातील दिव्यत्व जागवणारी ठरते. जेथे शब्द थांबतात, तेथे नृत्य बोलते. आजही नृत्य आपल्याला अंतर्मनाशी आणि अनंताशी (ईश्वराशी) जोडते.’
– सौ. सावित्री इचलकरंजीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.११.२०२५)
लेखांक १० वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/985509.html
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !