१७.९.२०२५  या दिवशी झालेल्या धन्वन्तरि यागाच्या वेळी लक्षात आलेली सूक्ष्मातील सूत्रे

‘१७.९.२०२५ या दिवशी सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात धन्वन्तरि याग करण्यात आला. धन्वन्तरिदेवाचा कृपाशीर्वाद मिळून साधक आणि संत यांना चांगले आरोग्य लाभण्यासाठी तो करण्यात आला.

१. धन्वन्तरिदेवाचे आवाहन करणे

१ अ. पुरोहितांनी धन्वन्तरिदेवाचे आवाहन करतांना उपस्थितांना धन्वन्तरिदेवाचे स्मरण करण्यास सांगितल्यावर एक दिव्य शक्ती वरून खाली आल्याचे आणि ती श्वासातून आत गेल्याचे जाणवणे : या यागासाठी पुरोहितांनी यज्ञकुंडाच्या बाजूला रांगोळीने ‘अष्टदलकमळ यंत्र’ काढले आणि त्यावर जल भरलेला एक कलश ठेवला. त्यामध्ये धन्वन्तरिदेवाचे आवाहन करण्यात आले. धन्वन्तरिदेवाचे आवाहन करतांना पुरोहितांनी यज्ञाला उपस्थित असलेल्या आम्हालाही धन्वन्तरिदेवाचे स्मरण करण्यास सांगितले. तेव्हा मला जाणवले, ‘एक दिव्य शक्ती वरून खाली आली आहे. ती दिव्य शक्ती मला माझ्या श्वासात गेल्याचे जाणवले.’ धन्वन्तरिदेव हा चांगले आरोग्य देणारा आहे. आपला श्वासच आपल्यासाठी मुख्य जीवन असतो. त्यामुळे धन्वन्तरिदेवाचे तत्त्व मला माझ्या श्वासातून आत गेल्याची अनुभूती आली.

१ आ. धन्वन्तरिदेवतेचे आवाहन केल्यावर त्या देवतेचे तत्त्व १० टक्के प्रमाणात कलशामध्ये आल्याचे जाणवले.

१ इ. धन्वन्तरिदेवतेचे तत्त्व १० टक्के सगुण आणि ९० टक्के निर्गुण स्वरूपात होते.

हिंदूंनो, तिसर्‍या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘यज्ञ हे आध्यात्मिक बळ निर्मितीचे सोपे माध्यम आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून ‘यज्ञ करणे’ हे इप्सित फलप्राप्ती आणि आपत्ती-निवारण यांसाठीचा सहज मार्ग आहे. त्यामुळे यज्ञाला अधिक महत्त्व आहे. येणारा आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांना सामोरे जाण्यासाठी शारीरिक अन् मानसिक बळ निर्माण करण्याचे विविध मार्ग उपलब्ध होऊ शकतात; पण आध्यात्मिक बळ हे केवळ साधना आणि यज्ञ यांच्याद्वारेच निर्माण होऊ शकते. आवश्यक त्या तीव्रतेने साधना करणे सर्वांना शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये यज्ञ करणे, हा सर्वांत सोपा आणि सर्वांसाठी पूरक असा मार्ग आहे. यज्ञाचा वातावरणावरही पुष्कळ जलद आणि अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होतो, हे विविध वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध झाले आहे. यासाठी हिंदूंनो, आगामी तिसर्‍या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि त्यापुढे रामराज्य स्थापनेसाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !’ 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२. धन्वन्तरिदेवाला नैवेद्य दाखवणे

पुरोहितांनी धन्वन्तरिदेवाला नैवेद्य दाखवला. तेव्हा नैवेद्यातून सूक्ष्म स्पंदने देवाकडे जलद गतीने गेली.

२ अ. नैवेद्य दाखवल्यावर धन्वन्तरिदेवाचे सगुण तत्त्व वाढणे : नैवेद्यातील सूक्ष्म स्पंदने धन्वन्तरिदेवाने ग्रहण केली. त्यामुळे आवाहन करून स्थापन केलेल्या धन्वन्तरिदेवाचे सगुण तत्त्व आरंभी १० टक्के जाणवले होते, ते नैवेद्य दाखवल्यावर वाढून २५ टक्के झाले. यावरून ‘देवाला नैवेद्य दाखवल्यावर देवतेचे तत्त्व जागृत होते’, हे लक्षात येते. हेच देवाला नैवेद्य दाखवण्याचे, म्हणजे त्याची पूजा करण्याचे महत्त्व आहे.

२ आ. नैवेद्य दाखवल्यामुळे स्थापन केलेल्या धन्वन्तरिदेवाच्या अनुभूतीजन्य स्पंदनांमध्येही पालट होणे

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

नैवेद्य दाखवल्यानंतर स्थापना केलेल्या धन्वन्तरिदेवाकडे बघून जड वाटू लागले; कारण त्यातील शक्तीच्या स्पंदनांमध्ये वाढ झाली. ते वरील सारणीतून लक्षात येते. तसेच देवतेतील चैतन्य आणि आनंद यांच्या स्पंदनांमध्येही वाढ झाली. धन्वन्तरिदेवाचे सगुण तत्त्व वाढल्याने त्याच्या संदर्भातील शांतीची स्पंदने अल्प झाली; कारण शांतीची स्पंदने निर्गुण तत्त्वाशी संबंधित आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

३. धन्वन्तरि याग चालू झाल्यावर जाणवलेली स्पंदने

यज्ञामध्ये प्रत्येक आहुती देतांना पिंपळाच्या पानावर गुळवेलची एक समिधा ठेवून आणि पायस (तांदुळाची खीर) घालून त्यांची आहुती दिली जात होती.

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

अ. यज्ञ २५ टक्के झाल्यावर मला माझ्या सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवू लागली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. तेव्हा मला हलके वाटू लागले आणि आनंदही जाणवू लागला.

आ. यज्ञ ५० टक्के पूर्ण झाल्यावर मला शक्तीचे प्रमाण वाढल्याचे जाणवले. वरील सारणीतूनही हेच लक्षात येते. तेव्हा मला त्या शक्तीमुळे माझ्या डोक्यावर जडत्व जाणवू लागले.

इ. यज्ञ ७५ टक्के पूर्ण झाल्यावर मला शक्तीची स्पंदने आणखी वाढल्याचे जाणवले, तसेच आध्यात्मिक भावाची स्पंदनेही अधिक वाटू लागली. वरील सारणीतूनही हेच लक्षात येते. ५० टक्के यज्ञ पूर्ण झाल्यावर मला शक्तीची स्पंदने माझ्या डोक्यावर जाणवत होती. ७५ टक्के यज्ञ पूर्ण झाल्यावर मला शक्तीची स्पंदने यज्ञकुंडावर जाणवू लागली. याचा अर्थ शक्तीची स्पंदने वरून खाली यज्ञकुंडाकडे सरकली होती.

ई. धन्वन्तरि याग हा धन्वन्तरिदेवतेचे तत्त्व मिळवण्यासाठी केला जातो. यज्ञाद्वारे देवतातत्त्व मिळवले जाते. यज्ञ पूर्ण होत असतांना शक्तीची स्पंदने वाढत जाणे आणि ती वरून खाली यज्ञकुंडाकडे आल्याचे जाणवणे, हे या यज्ञाद्वारे धन्वन्तरिदेवतेचे तत्त्व मिळत असल्याचेच द्योतक आहे.

उ. धन्वन्तरि यागामधून धन्वन्तरिदेवतेचे तत्त्व मिळवले जात असल्याने या यागामध्ये ९० टक्के आकर्षण शक्ती असल्याचे आणि केवळ १० टक्के प्रक्षेपण शक्ती असल्याचे जाणवले. आकर्षण शक्तीमुळे देवतेचे तत्त्व खेचून घेतले जाते आणि ते यज्ञातील विभूतीतून आपल्याला मिळते.

ऊ. यज्ञाच्या आरंभापासून ७५ टक्के यज्ञ पूर्ण होईपर्यंत यज्ञाची स्पंदने निर्गुणाकडून सगुणाकडे आल्याचे जाणवले. त्यामुळे तेव्हा यज्ञामध्ये शक्ती आणि भाव यांची स्पंदने सर्वाधिक होती. ७५ टक्के यज्ञ पूर्ण झाल्यावर आवाहन करून कलशामध्ये स्थापन केलेले धन्वन्तरिदेवाच्या तत्त्वामध्ये ३५ टक्के सगुण तत्त्व आणि ६५ टक्के निर्गुण तत्त्व असल्याचे जाणवले. आरंभी धन्वन्तरिदेवतेचे सगुण तत्त्व केवळ १० टक्के होते.

ए. यज्ञ ७५ टक्के पूर्ण झाल्यावर मला माझ्या मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवू लागली. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत होती. हेही धन्वन्तरिदेवतेचे सगुण तत्त्व वाढल्याचे द्योतक आहे. याउलट सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवणे, हे निर्गुण तत्त्वाचे द्योतक आहे.

ऐ. ‘यज्ञ ७५ टक्के पूर्ण होईपर्यंत धन्वन्तरिदेवतेचे तत्त्व यज्ञाद्वारे ग्रहण करण्याचे कार्य पूर्ण होत आले होते’, असे जाणवले; कारण यज्ञ १०० टक्के पूर्ण झाल्यावर त्यातील शक्ती आणि भाव यांची स्पंदने पुष्कळ न्यून झाली अन् चैतन्य, आनंद, तसेच शांती यांची स्पंदने वाढली.

ओ. यावरून ‘यज्ञाच्या कालावधीत यज्ञाद्वारे अनुभवता येणार्‍या स्पंदनांमध्ये कसा पालट होतो आणि यज्ञाद्वारे सूक्ष्मातील पालट कसे घडवले जातात’, हे लक्षात येते. यज्ञाच्या परिणामांचे संशोधन करण्यासाठी या सूक्ष्म घडामोडी अनुभवणे महत्त्वाचे असते.

गुरु आणि यज्ञाची देवता यांच्या कृपेमुळे मला हे सूक्ष्मजगत अनुभवता आले, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रातील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.१०.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या /संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक