Bihar Sanatan Dharma : बिहार सरकार सनातन धर्मप्रचार करणार !

राज्य धार्मिक विश्वस्त परिषद सर्व ३८ जिल्ह्यांमध्ये संयोजकांची नियुक्ती करणार

धार्मिक विश्वस्त परिषदेचे अध्यक्ष रणबीर नंदन

पाटलीपुत्र (बिहार) – बिहार सरकारच्या राज्य धार्मिक विश्वस्त परिषदेकडून राज्यभरात सनातन धर्माच्या प्रचारासाठी राज्यातील सर्व ३८ जिल्ह्यांमध्ये संयोजकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या परिषदेकडे नोंद असलेल्या मंदिर आणि मठ यांची संख्या २ सहस्र ४९९ इतकी आहे. ही परिषद राज्यातील नोंदणीकृत मंदिरे, मठ आणि न्यास यांच्या मालमत्तांची नोंद ठेवण्याबरोबरच कामकाजावर देखरेखही करते. येथील मुख्य पुजार्‍यांशी समन्वय साधून या संयोजकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही परिषद बिहार सरकारच्या कायदा विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे.

या परिषदेचे अध्यक्ष रणबीर नंदन यांनी सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात एक संयोजक निवडण्याच्या प्रक्रियेला येत्या २ दिवसांत प्रारंभ होईल. केवळ महंतांमधून (मुख्य पुजारी) या संयोजकांची निवड केली जाईल. आपले सण देशाची संस्कृती जिवंत ठेवतात. तसेच ते पर्यावरणीय सौहार्द, भक्ती आणि सामुदायिक सहभाग यांचा एक जिवंत आविष्कार आहे. सण, पूजा, त्यांतील मूल्ये आणि सनातन धर्म यांचे महत्त्व प्रसारित करण्याची आवश्यकता आहे’, असे नंदन यांनी अधोरेखित केले.

संयोजक काय काम करणार ?

१. संबंधित जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत मंदिरे आणि मठ प्रत्येक महिन्याला अनुक्रमे पौर्णिमा आणि अमावास्या यांच्या दिवशी ‘सत्यनारायण कथा’ आणि ‘भगवती पूजा’ करतात का ?, याची निश्चिती करणे.

२. सर्व नोंदणीकृत मंदिरे आणि मठ या दोन्ही पूजांचे महत्त्व जनतेला पटवून देत आहेत कि नाही, याचीही निश्चिती करणे, तसेच लोकांना त्यांच्या घरात प्रत्येक महिन्याला अशा पूजा आयोजित करण्यास प्रोत्साहित करणे.

३. मंदिरे आणि मठ यांनी सामाजिक सुधारणांचे उपक्रम राबवावेत, यासाठी प्रयत्न करणे.

आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार !

रणबीर नंदन यांनी पुढे सांगितले की, ‘सनातन धर्मा’च्या प्रचारासाठी येत्या काही महिन्यांत राज्यातील प्राचीन शहर राजगीर (जि. नालंदा) येथे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याची सिद्धता आम्ही करत आहे. आम्ही एक धार्मिक दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये सनातन धर्मातील सर्व सण, पूजा आणि इतर धार्मिक उपक्रमांवर प्रकाश टाकला जाईल.

संपादकीय भूमिका

भाजप-जनता दल (संयुक्त) सरकारचा हा अभिनंदनीय निर्णय आहे. याचा आदर्श घेत देशातील प्रत्येक राज्यांनी असा प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !