महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियोजनाचा अभाव कि इतर अर्थकारण ?

आपल्यापैकी सर्वांनी दिवाळीच्या सुटीच्या कालावधीत आपल्या नातेवाइकांची भेट घेतली असणार आणि त्यासाठी अनेक ठिकाणी प्रवासही केला असणार. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण नेहमीप्रमाणे ‘रिग्रेट’, म्हणजे उपलब्ध नाही, असे दाखवत होते. सर्व खासगी बसगाड्या, म्हणजे लक्झरी गाड्या यांचेही आरक्षणाचे रकाने भरलेले दाखवत होते. जोडीला खासगी गाड्यांच्या तिकिटांचे दर प्रचंड वाढलेले होते. हा सर्व अनुभव आपण गेली अनेक वर्षे घेत आहोत, तसा तो यंदाही आपण सर्वांनी घेतला. या पार्श्‍वभूमीवर ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’ने (‘एस्.टी.’ने) या दिवाळीत ३०१ कोटींहून अधिक रुपयांचा लाभ झाल्याचे घोषित केले. एका दिवाळीच्या कालावधीत जर महामंडळाला इतका लाभ होत असेल, तर मग ‘महामंडळ वर्षभरासाठीच असे नियोजन का ठेवू शकत नाही ?’, असा प्रश्‍न मला पडला.

१. हिंदूंना त्यांच्या सणावारी येणारी नेहमीची अडचण

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करतात आणि त्यासाठी रेल्वेचे आरक्षण २ मास आगाऊच करावे लागते. याखेरीज ते मिळत नाही. ते न मिळाल्यास खासगी बसने प्रवास करणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे खासगी बसवाले प्रवासाचे दर मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि सामान्य जनतेची लुबाडणूक करतात. अशा वेळी मात्र सामान्य प्रवाशाला राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे हवे तसे साहाय्य होत नाही. वास्तविक पहाता अशा कालावधीत महामंडळाने अधिकच्या गाड्या सोडण्याचे नियोजन २-३ मास आधीच करून लोकांना आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. त्यासह लांब पल्ल्याचा प्रवास करणार्‍या लोकांना आरामदायी बसमध्ये प्रवास करायला आवडतो, हे लक्षात घेऊन तशा प्रकारच्या बसेस उपलब्ध करून द्यायला हव्यात. असे केल्याने महामंडळाचे उत्पन्न याहीपेक्षा वाढेल आणि खासगी वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून होणार्‍या लुबाडणुकीला आळा बसेल; परंतु दुर्दैवाने असे होतांना दिसत नाही. त्यामुळे लोकांना नाईलाजाने खासगी बसमधून प्रवास करावा लागतो आणि ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

श्री. योगेश जलतारे

२. नियोजनाचा नेहमीच बोजवारा !

सणासुदीच्या काळातच नव्हे, तर एरव्हीही ‘एस्.टी.’च्या गाड्यांचे नियोजन बर्‍याच वेळा कोलमडलेले असते. मध्यंतरी मी अकलूज ते पुणे, नंतर अकोला ते अमरावती, अकोला ते आकोट अशा विविध ठिकाणी प्रवास केला. तेव्हा लक्षात आले की, जेथे जाण्यासाठी लोकांची गर्दी असते, तेथे जायला बस उपलब्ध नसते आणि एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी लागोपाठ ३-४ गाड्या रिकाम्या जातात. आकोट येथून अकोला येथे जाण्यासाठी गाडीची वाट पहाणारे माझ्यासह अनेक जण होते; परंतु ३०-४० मिनिटे उलटली, तरीही ‘एस्.टी.’ची एकही बस उपलब्ध होऊ शकली नाही. असे असतांना त्याच कालावधीत अमरावती आणि परतवाडा येथे जाणार्‍या ४ ते ५ गाड्या आल्या अन् त्या चक्क रिकाम्या होत्या. त्या गावी प्रवास करणारे प्रवासी पहिल्याच गाडीने गेल्याने पुढच्या आलेल्या त्या गाड्या रिकाम्या गेल्या. असे इतर गावांमध्येही प्रवासाच्या कालावधीत लक्षात आले. ही परिस्थिती तेथील बसस्थानकाच्या व्यवस्थापकांच्या लक्षात येत नाही का ? ते त्याच वेळी नियोजनात पालट करून विशिष्ट गावी जाणार्‍या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन त्या वेळी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन करू शकत नाहीत का ? कि ते त्यांच्या हातात नसते ? असे सर्वसामान्य प्रश्‍न आमच्यासारख्या प्रवाशांना पडतात; परंतु दुर्दैवाने त्या अधिकार्‍यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ‘हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा नियोजनाचा अभाव आहे कि त्यामागे काही अन्य अर्थकारण आहे ?’ असा प्रश्‍न पडल्यावाचून रहात नाही.

३. नियमांविषयी हटवादीपणा

‘एस्.टी.’च्या गाड्या ठरलेल्या थांब्याखेरीज अन्यत्र वाटेत थांबत नाहीत, ही एक समाधानाची गोष्ट; परंतु काही वेळा गाडी रिकामी असतांनाही ‘एस्.टी.’चे चालक स्थानकाच्या बाहेर अगदी निकटच्या परिसरात प्रवाशांना गाडीत प्रवेश देत नाहीत. काही वेळा प्रवाशांना बसस्थानकापर्यंत पोचण्यासाठी वाहतुकीमुळे वेळ लागतो आणि गाडी रिकामी जात असते. अशा वेळी काही प्रवासी समवेत जड सामान घेऊन रिकाम्या गाडीला हात दाखवतात; परंतु तेथे थांबा नसल्याने चालक गाडी थांबवत नाहीत. खासगी गाड्यांचे वाहन चालक मात्र प्रत्येक ठिकाणच्या प्रवाशांना घेत घेत पुढे जातात. त्यामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला जातो. याविषयी महामंडळाच्या एका चालकाला विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘त्यामुळे लोकांना वाटेत हात दाखवून गाडी थांबवण्याची वाईट सवय लागते.’’ हे जरी योग्य असले, तरी प्रत्येक वेळी प्रवासी आळसामुळे वाटेत थांबून गाडीला हात दाखवेल, असे नसते, तसेच गाडीत आधीच पुष्कळ प्रवासी असल्यास त्यांचा वेळ जाईल, हेही समजण्यासारखे असते; परंतु गाडी रिकामी नेण्यात काय हशील ? त्यामुळे चालकांनी तारतम्याने निर्णय घ्यायला हवा, जेणेकरून लोकांना ‘एस्.टी.’चा आधार वाटेल आणि त्यांचा प्रवासही सुरळीत होईल.

४. सुट्या पैशांचे त्रांगडे

‘एस्.टी.’च्या गाड्यांनी प्रवास करत असतांना लोकांना आणखी एका समस्येला सामोरे जावे लागते, ते म्हणजे सुटे पैसे ! काही वेळेला या गाड्यांचे प्रवासी तिकीट २१ रुपये, २३ रुपये …. अशा व्यस्त स्वरूपाचे असते. त्या वेळी वाहक प्रवाशांना गाडीत चढत असतांनाच ‘सुटे पैसे असतील, तरच गाडीत चढा’; ‘सुटे पैसे द्या’, असे ओरडत सतत सांगत असतो. काही वेळेला प्रवाशांकडे सुटे पैसे नसतात. त्यामुळे प्रवासाच्या कालावधीत वाहक आणि प्रवासी यांच्यातील वाद हा नित्याचा झाला आहे. प्रवाशांचे गंतव्य स्थळ आल्यानंतर तेथे थांबून वाहक त्यांना सुटे पैसे देतो किंवा त्यांना तेथील छोट्या पानटपरीवरून किंवा उपाहारगृहातून सुटे पैसे आणायला सांगतो. त्यामुळे स्वाभाविकपणे अन्य प्रवाशांना तितका वेळ थांबावे लागते. वास्तविक पहाता तिकिटाचे दर २० रुपये, २५ रुपये किंवा ३० रुपये असे ठेवणे, हे ‘एस्.टी.’च्या आवाक्यातील आहे. तरीही ही उपाययोजना का काढली जात नाही ? किंवा काही कारणास्तव तसे शक्य नसल्यास वाहकाला पुरेसे सुटे पैसे देऊन गाडी स्थानकातून न्यायला का सांगितली जात नाही ?, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित रहातो.

५. जुन्या गाड्यांची बकाल स्थिती !

‘एस्.टी.’च्या काही गाड्यांची स्थिती अगदी बकाल झालेली दिसून येते. पावसाळ्यात अनेक वेळा बसेसना गळती लागल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात आणि वाचनात येतात. यासंबंधीचे गमतीदार व्हिडिओही सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत असतात. काही गाड्यांच्या खिडकीच्या काचा नीट नसतात, त्यामुळे पावसाळ्यात त्यातून पाणी आत येत असते. गाडीतील आसन व्यवस्था मोकळी असली, तरी ती प्रत्येक वेळी आरामदायी असेलच, असे नाही. गाडीच्या आतील भागाचा पत्रा निघालेला असतो. त्यात कपडे अडकून फाटतात, स्त्रियांचे पदर अडकतात. महामंडळाच्या ‘शिवशाही’ नामक गाड्यांना झालेल्या आपघातांची शृंखला सर्वश्रुत आहे. अपघात झाल्यानंतर त्या गाड्यांची अवस्था अगदी बिकट झालेली दिसून येते. मध्यंतरी मी अमरावती येथून अकोला येथे प्रवास करत असतांना एक ‘शिवशाही’ गाडी माझ्या गाडीसमवेत धावत होती. त्या गाडीच्या २ मोठ्या काचा जिथे तुटलेल्या होत्या, तेथे फ्लेक्सप्रमाणे कापड किंवा प्लास्टिक असे काहीतरी चिकटवलेले होते. हे पाहून मन उद्विग्न झाले. असे असूनही लोकांना अजून ‘एस्.टी.’च्या वाहतूक व्यवस्थेचा आधार वाटतो, या गाड्यांनी प्रवास करणे सुरक्षित वाटत असते. असे असतांना ‘एस्.टी.’ प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा न देऊन त्यांना निराश करते. त्यामुळे महामंडळाने याचा गांभीर्याने विचार करून लोकांना चांगली वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यायला हवी.

उघड्यावर टाकलेल्या कचर्‍यामुळे बसस्थानकावर झालेला उकिरडा
सातारा बसस्थानकात बसगाड्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात टाकलेला कचरा

६. लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रत्येक गावात अनावश्यक थांबा !

मला अकोल्याहून पुणे येथे प्रवास करायचा असल्याने मी एका नातेवाईकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा पर्याय विचारला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘या गाडीने जायला हरकत नाही; परंतु प्रवास १४ घंट्यांचा होतो. मी त्यांना त्याविषयी कारण विचारल्यावर ते म्हणाले की, ‘एस्.टी.’ची आरामगाडी अकोला येथून निघाल्यावर पुण्यापर्यंत लागणार्‍या प्रत्येक स्थानकावर थांबा घेते. त्यामुळे या गाडीला पुणे येथे पोचायला विलंब होतो. मी त्यांना विचारले, ‘‘प्रत्येक थांब्यावरचे प्रवासी असल्यामुळे तसे असेल’’; परंतु नातेवाईक म्हणाले, ‘‘सर्व प्रवासी पुणे येथील असले, तरी परिवहन मंडळाच्या गाड्या प्रत्येक स्थानकावर थांबतात. त्यामुळे गाडीला विलंब होतो.’’ ‘जर मधल्या स्थानकावरचे प्रवासी गाडीत नाहीत, तर गाडी थेट पुणे येथे का नेली जात नाही ?’, असा प्रश्‍न मला पडला. महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्यांना छोट्या छोट्या स्थानकांवर थांबा अनिवार्य न करता प्रवाशांना जलद वाहतूक उपलब्ध करून द्यायला हवी.

सुराज्य अभियान

वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, अर्पणदाते, हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रप्रेमी आणि साधक यांना आवाहन !

या लेखात नमूद केल्याप्रमाणे ‘एस्.टी.’ची दुरवस्था, बसस्थानकांची दयनीय स्थिती यांविषयीच्या काही समस्या आढळल्यास वा आपण स्वतःहून याविषयी काही तक्रार केली असल्यास पुढील पत्त्यावर अवश्य कळवा.

टपालाचा पत्ता : श्री. अभिषेक मुरकटे,

‘सुखठणकर रिट्रिट’, फ्लॅट क्र. एजी-४, चित्तार भाट, नागेशी, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संपर्क भ्र. क्र. : ९८६७५५८३८४
संगणकीय पत्ता : [email protected]
‘एक्स’ खाते : @surajyacampaign

७. बसस्थानकांची दुरवस्था

वरील नियोजनाच्या व्यतिरिक्त बस स्थानक परिसरातील खोल खड्डे, त्यांत साचलेले पावसाचे घाणेरडे पाणी, परिसरात कमालीची अस्वच्छता, गाड्यांमध्ये पान किंवा गुटखा यांच्या पिचकार्‍यांचे डाग या काही सामायिक समस्या आहेत.

पावसाळ्यात बसस्थानकातून वाट काढत असतांना एखादी बस बाजूने गेल्यास चिखल अंगावर उडेल कि काय ? अशी भीती मनात निर्माण होते. ग्रामीण भागातच नव्हे, तर आता शहरी भागातही गुटखा, पान खाऊन थुंकणे, सिगारेटची थोटकं बस स्थानकाच्या परिसरात टाकणे, हेही नेहमी पहायला मिळते. यावरही महामंडळ गांभीर्याने विचार करत नाही आणि प्रवासीही या समस्यांना ‘आता हे नेहमीचेच झाले आहे’, या विचाराने सामोरे जातात.

बस स्थानक स्वच्छ रहावे, यादृष्टीने उपाययोजना करायला हवी. किमान बस स्थानक परिसरातील खड्डे तरी बुजवायला हवे, हेही का सांगावे लागते ? या साध्या गोष्टींचा विचार राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी करतांना दिसत नाहीत. त्यामुळे सर्वत्र बकाल अवस्था झाली आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी सात्त्विक आणि सदाचरणी लोकांचे हिंदु राष्ट्र आणण्याविना पर्याय नाही !’

– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसिद्धीमाध्यम. (७.११.२०२५)