CM Siddharamaih : ‘गोहत्या प्रतिबंध कायदा’ आणि ‘धर्मांतर प्रतिबंध कायदा’ मागे घेण्यासाठी आगामी अधिवेशनात प्रक्रिया चालू करणार !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अल्पसंख्यांकांच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

मंगळुरू (कर्नाटक) – मागील भाजप सरकारने लागू केलेले ‘कर्नाटक जनावरे संरक्षण कायदा २०२१ (गोहत्या प्रतिबंध कायदा)’ तसेच ‘कर्नाटक धर्म स्वातंत्र्य संरक्षण कायदा २०२१ (धर्मांतरण प्रतिबंध कायदा)’ मागे घेण्याविषयी आगामी बेळगाव अधिवेशनात योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दक्षिण कन्नड जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्यांक शिष्टमंडळाला दिले.

१. अलीकडे दक्षिण कन्नड जिल्ह्यात जनावरांच्या वाहतुकीच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कन्नड जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्यांक शाखेचे नेते आणि जिल्हा काँग्रेस समितीचे शिष्टमंडळ यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘कावेरी’ येथे सिद्धरामय्या यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

२. वर्ष २०२३ च्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणापत्रात काँग्रेस पक्षाने सत्तेवर आल्यानंतर एका वर्षाच्या आत हे कायदे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाप्रमाणे हे दोन्ही कायदे मागे घेण्यासाठी पुढील बेळगाव अधिवेशनात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

३. या निवेदनात म्हटले होते की, भाजप सरकारच्या गोहत्या प्रतिबंध आणि गोहत्या प्रतिबंधक कायद्यामुळे दक्षिण कन्नड जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गोतस्करी करणार्‍यांवर पोलिसांनी गोळीबार करणे, त्यांची घरे-मालमत्ता जप्त करणे, अशा चिंताजनक घटना घडल्या आहेत. या ‘काळया कायद्या’मुळे शेतकर्‍यांना त्यांच्या जनावरांची विक्री करता येत नाही, असे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ‘कर्नाटक धर्म संरक्षण कायद्या’च्या नावाखाली रा.स्व. संघ परिवारातील लोक अल्पसंख्यांकांवर सतत अत्याचार करत आहेत. राज्यघटनेनुसार प्रत्येकाला कोणत्याही दबावाविना हवा तो धर्म पाळण्याचा अधिकार असतांना कर्नाटकात धर्मांतर प्रतिबंधक कायदा लागू असणे राज्यघटनाविरोधी आहे, अशी तक्रार त्यांनी निवेदनात केली आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेस सरकारला पाकिस्तानी राजवट का म्हटले जाते, हे यावरून स्पष्ट होते ! अशा सरकारला कर्नाटकातील हिंदूंनी मत देऊन सत्तेवर बसवले आणि आत्मघात करून घेतला आहे, हे त्यांच्या आतातरी लक्षात आले आहे का ?