‘सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पाने वर्ष १९९४ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये (पूर्वीचे नाव औरंगाबाद येथे) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’चे कार्य चालू झाले. देवाचे हे कार्य देवानेच करवून घेतले. देवाच्या या कार्यात मला सेवेची अमूल्य संधी मिळाली. त्या वेळचा माझा साधनाप्रवास आणि मला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.
११ नोव्हेंबर २०२५ यादिवशी यातील काही अनुभूती पाहिल्या. आज पुढील अनुभूती पाहू.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/975638.html

६. पाचवा अभ्यासवर्ग घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पू. वटकरकाका येणे आणि त्यांच्या समवेत प.पू. डॉक्टरांनी साधिकेला भेट देण्यासाठी स्वतःचे एक छायाचित्र पाठवणे
सप्टेंबरमध्ये पू. शिवाजी वटकरकाका पाचवा अभ्यासवर्ग घ्यायला छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला एक अलौकिक अनुभूती दिली.
पू. वटकरकाका मला म्हणाले, ‘‘मुळेवहिनी, तुम्ही पुष्कळ भाग्यवान आहात. प.पू. डॉक्टरांनी तुमच्यासाठी पहा काय भेट दिली आहे ! ते कधीच कुणाला स्वतःचे छायाचित्र देत नाहीत; पण तुम्हाला त्यांनी स्वतःचे छायाचित्र दिले आहे.’’ त्या वेळी मला स्वर्ग जणू ठेंगणा वाटला. गुरुदेवा, याविषयी कशी कृतज्ञता व्यक्त करू?

७. पहिल्या प्रवचनाचा श्री गणेशा !
सप्टेंबरमध्येच ‘जवाहर नेहरू इंजिनीयरिंग महाविद्यालया’त (माझ्या मोठ्या मुलाने, चि. सुजितने) तिसर्या वर्षाला प्रवेश घेतला. त्या विद्यालयाचे ‘इन्स्ट्रुमेंटेशन’ विभागाचे प्रमुख श्री. वसंतराव कदम हे सर होते. माझी त्यांच्या पत्नीशी, सौ. मंदाताई कदम यांच्याशी ओळख झाली होती. देवाचे तसे नियोजनच होते. ‘त्या सामाजिक कार्य करतात’, हे मला ठाऊक होते. प्रसाराच्या दृष्टीने मी त्यांना संपर्क केला. तेव्हा सौ. कदम यांनी मला एका भजनीमंडळाचे नाव सुचवले. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने तेथे जाऊन मला पहिले प्रवचन घ्यायला जमले.
८. सहाव्या अभ्यासवर्गात सांगितल्याप्रमाणे प्रथमच अर्पण मिळवण्याची सेवा करणे
त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सहावा अभ्यासवर्ग झाला. त्या वेळी साधकसंख्या थोडी वाढली होती. अभ्यासवर्गामध्ये एका साधकाने ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी अर्पण कसे गोळा करायचे ?’, याची माहिती सर्वांना दिली. या सेवेसाठी माझ्याकडे काही पावती पुस्तकेही दिली. ही सेवा मी प्रथमच करणार होते. एका साधकासमवेत मी अर्पण गोळा करण्याची सेवा केली.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा लाभलेला अलौकिक सहवास !
९ अ. सत्संग सोहळ्याला गेल्यावर मुंबई येथे प.पू. डॉक्टरांच्या घरी रहाण्याची संधी मिळणे आणि त्यांनी आपलेपणाने काळजी घेणे : नोव्हेंबरमध्ये १९९४ मध्ये पू. वटकरकाकांच्या घरी मानखुर्द येथे एक सत्संग सोहळा होता. देवाच्या कृपेने मला अन्य साधकांसह तिथे जायला मिळाले आणि हा सोहळा पहाण्याचे भाग्य लाभले. त्या व्यतिरिक्त अजून एक मोठा अलभ्य लाभ झाला, तो म्हणजे मुंबई येथे प.पू. डॉक्टरांच्या घरी त्यांनी आम्हाला २ – ३ दिवस रहायला बोलावले. त्यामुळे आम्हाला गुरुदेवांचा अलौकिक सहवास लाभला. तिथे प.पू. बाबांच्या अमृत महोत्सवाची पूर्वसिद्धता चालू होती. एवढ्या गडबडीतही गुरुदेवांनी आमची विचारपूस केली. गुरुदेवांचे गोड मधुर बोलणे अजूनही माझ्या लक्षात आहे. ते म्हणाले होते, ‘‘मुळेबाई, तुमच्याशी पुष्कळ बोलायचे आहे; पण पहा ना, सध्या वेळच नाही.’’ त्यांनी एका साधकाला सांगितले, ‘‘सत्संग कसे घ्यायचे ?’, ते मुळेबाईंना सांगा.’’ नंतर त्या साधकाने मला ‘नामजपाच्या आधी प्रार्थना कशी करायची ? नामजपाने कोणते लाभ होतात’, ते छान समजावून सांगितले. जणू गुरुदेवच त्याच्या मुखातून बोलत होते.
९ आ. प.पू. डॉक्टरांनी स्वतः बनवलेला चहा सद्गुरु सत्यवानदादांनी आणून देणे आणि गुरुदेवांनी प्रेमाने केलेले आदरातिथ्य पाहून भारावून जाणे : गुरुदेवांनी जेथे आमची झोपण्याची व्यवस्था केली होती, तेथील भिंतीवर बरेच तक्ते लावले होते. ते वाचून मी त्यातील काही सूत्रे लिहून घ्यायला लागले. तेवढ्यात तेथे प.पू. डॉक्टर आले आणि म्हणाले, ‘‘अरे वा, लिहून घेत आहात की !’’ पाचच मिनिटांत तेथे सद्गुरु सत्यवानदादाही आले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही भाग्यवान आहात.’’ मी विचारले, ‘‘काय झाले ?’’ ते म्हणाले, ‘‘हा चहा घ्या. हा गुरुदेवांनी बनवला आहे.’’ मला किती किती आनंद झाला, म्हणून सांगू ! माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला शब्दच नव्हते. नंतर गुरुदेवांनी छत्रपती संभाजीनगरपर्यंतचे आमच्या तिकिटांचे आरक्षण केले आणि स्थानकावर रेल्वेत बसवूनही दिले. गुरुदेवा, केवढी ही तुमची प्रीती !
आम्ही निघण्यापूर्वी प.पू. डॉक्टर तेथे असलेल्या एका साधकाला म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजीनगर येथील काही पत्ते असतील, तर ते यांना द्या. मुळेबाईंच्या तिथे ओळखी आहेत. आता आपल्याला काही काळजी नाही.’’ खरोखरंच जणू त्यांचा संकल्प झाला आणि प्रसारात माझ्या ओळखी निघू लागल्या.
१०. छत्रपती संभाजीनगर येथे परतल्यावर भविष्यात क्रियाशील झालेल्या जिज्ञासूंची प.पू. डॉक्टरांनी करून दिलेली भेट !
१० अ. प.पू. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यासवर्गाचा प्रसार करणे आणि एक जिज्ञासू नियमित अभ्यासवर्गाला येऊ लागणे : मुंबईहून मी छत्रपती संभाजीनगरला आले. डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात मला ‘अभ्यासवर्ग घेण्याविषयी साधकांचा निरोप आला. मी गुरुदेवांना ‘एस्.टी.डी.’वरून दूरभाष केला आणि सांगितले, ‘‘येथे कोणी साधक नाहीत.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही एक जागा निवडा आणि सुजितचे (मुलाचे) साहाय्य घेऊन आसपास फलक लावा.’’ त्यांनी सुचवल्यानुसार आम्ही दोघांनी सिद्धता केली. तेथील एका मंदिरातही फलक लावला. तो फलक वाचून श्रीमती विजयालक्ष्मी चव्हाण या जिज्ञासू अभ्यासवर्गाला उपस्थित राहिल्या. त्यानंतर त्या नियमित अभ्यासवर्गाला येऊ लागल्या. (सध्या त्या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतात. आता त्यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आणि वय ९० वर्षे आहे.)
१० आ. एका जिज्ञासूकडे (सौ. मंदाकिनी कदम यांच्याकडे) गेल्यावर त्यांनी कुलदेवतेच्या नामजपामुळे त्यांना आलेल्या अनुभूती सांगणे आणि नंतर त्या सक्रीय झाल्यावर ‘हे देवाचेच नियोजन आहे’, हे जाणवणे : नंतरच्या आठवड्यात मी सौ. मंदाकिनी कदम यांच्याकडे संपर्काला गेले; कारण अमृत महोत्सव जवळ आला होता. त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगून गेलात. तेव्हापासून मी नामजप करू लागले आणि लगेचच आम्हाला तुळजापूर येथे देवीच्या दर्शनाला जायला मिळाले. माझ्या मुलीला अभियांत्रिकी (‘इंजिनीयरिंग’) महाविद्यालयात मोफत प्रवेश मिळून तिचे शिक्षणही चालू झाले. देवाच्या कृपेने माझा पुष्कळ जुनाट असा पित्ताचा आजारही न्यून झाला. त्यामुळे आमच्या घरी सर्वांना आनंद झाला आहे.’’ नंतर मी त्यांना अमृत महोत्सवाचा विषय सांगून अर्पणाविषयी विचारले. तेव्हा त्यांनी लगेच अर्पण दिले आणि एक ग्रंथही विकत घेतला. गुरुदेवा, हे सर्व तुमचे नियोजन होते. नंतर सौ. मंदाकिनी कदम यासुद्धा सक्रीय झाल्या. (आता त्या पुणे येथे असून त्यांची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के आणि वय ७८ वर्षे आहे.)
११. ‘न भूतो न भविष्यति ।’ अशा प्रकारे साजरा झालेला प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव सोहळा !
११ अ. प.पू. डॉक्टरांमुळे अलौकिक सोहळा पहाण्याचे भाग्य लाभणे : प.पू. गुरुदेवांनी इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांचा (प.पू. बाबांचा) अमृत महोत्सव सोहळा ‘न भूतो न भविष्यति ।’, अशा प्रकारे आयोजित केला होता. ९ फेब्रुवारी १९९५ या दिवशी हा सोहळा होता. मला आणि मुलाला गुरुदेवांनी आठ दिवस आधीच तेथे बोलवले होते. पुष्कळ मोठ्या प्रमाणावर असलेला हा सोहळा पहाण्याचे भाग्य आम्हाला लाभले. सर्व साधकांनी केलेले आयोजन, तसेच तेथील पडदे, फलक इत्यादी सर्वच अलौकिक होते. संतांनी अन्य संतांचा केलेला सन्मानसोहळाही अलौकिक होता. त्या वेळी ‘असा सोहळा शतकातून एकदाच होतो’, असे गुरुदेव म्हणाले.
११ आ. कार्यक्रमाच्या नियोजनात व्यस्त असूनही प.पू. डॉक्टरांनी साधिकेची काळजी घेणे आणि तिला अन्य सुवासिनींसह ७५ दिव्यांनी प.पू. बाबांचे औक्षण करण्याची संधी मिळणे : एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात व्यस्त असूनही प.पू. डॉक्टर सर्वांची काळजी घेत होते. आम्ही छत्रपती संभाजीनगरहून रात्रीच्या बसने प्रवास करून सकाळी कार्यस्थळी पोचलो आणि आमच्या समोरच गुरुदेव उभे होते. आम्हाला पाहिल्यावर ते काळजीने म्हणाले, ‘‘आता थोडी विश्रांती घ्या.’’ केवढी ही त्यांची प्रीती !
देवाच्या कृपेने आम्हा ७५ सुवासिनींना प.पू. बाबांचे ७५ दिव्यांनी औक्षण करायला मिळाले. केवढा सौभाग्याचा क्षण गुरुदेवांनी अनुभवायला दिला. कार्यक्रम पार पडल्यावर नेहमीप्रमाणे आढावा बैठक होती. त्यामध्ये गुरुदेवांनी सर्व साधकांचे कौतुक करून सर्वांना भरभरून आशीर्वाद दिले.
११ इ. इंदूरमध्ये एका दुकानात अकस्मात् प.पू. डॉक्टरांची भेट होणे आणि त्यांनी जिज्ञासूंना संपर्काचा पत्ता लिहून शेवेची पाकिटे ‘प्रसाद’ म्हणून देण्याच्या कल्पनेचे कौतुक करणे : प.पू. बाबांच्या पंचाहत्तरीचा कार्यक्रम संपला. इंदूरमध्ये शेवेचे एक प्रसिद्ध दुकान होते. परत जातांना ‘तिथून शेव घेऊन जावे’, असा विचार करत मी त्या दुकानात गेले. मी शेवेची ५ – ६ पाकिटे घेणार होते. तेवढ्यात अकस्मात् प.पू. डॉक्टर मागे येऊन उभे राहिले. मी पैसे काढत होते, तेवढ्यात ते मला म्हणाले, ‘‘इतकी पाकिटे का घेत आहात ? काय करणार त्यांचे ?’’ मी म्हणाले, ‘‘ज्यांनी अमृत महोत्सवासाठी अर्पण दिले आहे, त्यांना या शेवेची छोटी पाकिटे करून त्यात सत्संगाच्या संपर्काचा पत्ता घालून ती ‘प्रसाद’ म्हणून द्यावे’, असा मी विचार केला आहे.’’ प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘अरे वा छान, तुम्ही याचे पैसे देऊ नका. तुम्ही आणखी चार पाकिटे घ्या.’’ नंतर ते म्हणाले, ‘‘आता प्रत्येक थांब्या थांब्यावर सत्संग चालू झाले पाहिजेत. संध्याकाळी सातचेसुद्धा सत्संग चालू करा; कारण सत्संगात पुरुषही यायला पाहिजेत !’’
त्या वेळी श्री. संतोष आळशी म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजीनगरला प्रतिसाद अल्प आहे.’’ त्यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘नाही हं, आता मुळेबाई येथील चैतन्य घेऊन चालल्या आहेत. आता फरक पडेल !’’
गुरुदेवांचे ते आश्वासक बोल, त्या बरोबर झालेला त्यांचा संकल्प आणि त्यांचा आशीर्वाद हे सर्व घेऊन आम्ही छत्रपती संभाजीनगरला परतलो. त्यानंतर खरेच मला पुष्कळ उत्साह आणि आनंद जाणवू लागला.
– श्रीमती जयश्री चंद्रकांत मुळे (वय ७९ वर्षे), फोंडा, गोवा. (२२.७.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/976624.html
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !