वर्ष १९९४ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये (पूर्वीचे नाव औरंगाबाद येथे) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’चे कार्य चालू झाले. देवाच्या या कार्यात मला सेवेची अमूल्य संधी मिळाली. त्या वेळचा माझा साधनाप्रवास आणि मला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत. १२ नोव्हेंबर २०२५ या दिवशी यातील काही अनुभूती पाहिल्या. आज पुढील अनुभूती पाहू.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/976008.html

१३. प.पू. डॉक्टरांनी अध्यात्मप्रसारासाठी प्रवृत्त केल्यावर वाढू लागलेले प्रसारकार्य
१३ अ. गुरुदेवांनी मराठवाड्याच्या प्रसाराचे दायित्व देणे आणि त्यांच्या वचनानुसार ओळखीचे लोक भेटू लागणे : प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवानंतर गुरुदेवांनी मला सांगितले, ‘‘आता तुम्हीच सगळे सांभाळायचे आहे. तुमच्यासारखे १० साधक तुम्ही सिद्ध करा. मराठवाड्यात तुमच्या ओळखी आहेत. त्यामुळे आपल्याला काळजी नाही.’’ खरोखरंच मला त्याची प्रचीती आली; कारण यजमानांच्या सरकारी नोकरीमुळे बर्याच ठिकाणी आमचे स्थानांतर झाले होते. मराठवाड्यातील ‘संभाजीनगर’ हे महत्त्वाचे शहर असल्याने बरेच जण तेथे रहायला आले होते. त्यामुळे प्रसार करतांना ओळखीचे अनेक लोक भेटत. अशा प्रकारे देवाने माझ्याकडून प्रसारकार्य करून घेतले.

१३ आ. प.पू. डॉक्टरांनी घरी दूरभाष घेण्यास सांगणे, दूरभाषसाठी नंबर लावल्यावर तो ४ – ५ वर्षांनंतर मिळत असतांना गुरुकृपेमुळे तो १५ दिवसांतच मिळणे : एकदा माझ्याशी बोलतांना गुरुदेव म्हणाले, ‘‘मुळेबाई, आता तुम्हाला दूरभाष घ्यावा लागेल.’’ त्या वेळी आमच्या घरी दूरभाष संच घेतलेला नव्हता. ‘मी घरी दूरभाष संच घेऊया’, असे म्हणाले की, सर्वजण म्हणत, ‘दूरभाष कशाला पाहिजे ? आपल्याला काय आवश्यकता आहे ?’ त्यांचे हे बोलणे मला रुचत नसे. ‘दूरभाष ही चैनीची वस्तू नसून ती गरजेची वस्तू आहे’, हे त्यांना सांगून पटत नसे. त्या वेळी दूरभाषसाठी नंबर लावल्यावर ४ – ५ वर्षांनंतर तो मिळत असे. त्यामुळे आता केवळ नंबर लावून ठेवायचा आणि वाट पहात रहायचे, अशी माझी स्थिती झाली होती. त्यामुळे मी ‘त्वरित दूरभाष मिळण्यासाठी काय करावे लागेल ?’ याविषयी अनेकांना विचारू लागले. नंतर एका व्यक्तीच्या साहाय्याने १५ दिवसांतच आमच्या घरी दूरभाष आला. केवढी ही देवाची लीला !
१३ इ. गुरुदेवांच्या कृपेने हळूहळू ओळखी वाढून अनेक ठिकाणी सत्संग चालू होणे : आता संभाजीनगरमध्ये ६ – ७ जण साधक झाले होते. देवाने सौ. रिटा सावरिया (आताची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७६ वर्षे) यांच्या घरी सत्संग घ्यायचे सुचवले. रिटाताईंना नामजपामुळे बरे वाटल्यामुळे त्यांच्या घरातील व्यक्तींनी सत्संग घ्यायला अनुमती दिली. त्यामुळे तेथे आम्ही एक सत्संग चालू केला. त्यांच्या घरातील काही जण सत्संगाला बसू लागले. नंतर रिटाताई माझ्यासमवेत जिज्ञासूंना संपर्क करण्याच्या सेवेलाही येऊ लागल्या. त्यामुळे मलाही उत्साह आला. साधक श्री. शिवाजीराव कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीही शनिवारी अन् रविवारी येऊ लागले. अशा प्रकारे आम्ही संपर्क सेवा करू लागलो. हळूहळू आमच्या ओळखी वाढू लागल्या आणि गुरुदेवांच्या कृपेने अनेक ठिकाणी सत्संग चालू झाले. आठवड्यातील सातही दिवस मी सत्संग घेण्यासाठी जात असे. रिटाताईही माझ्या समवेत काही ठिकाणी येत असत.
१३ ई. अन्य संप्रदायांच्या कार्यक्रमांना जाऊन तेथील साधकांच्या ओळखी करून घेणे : नंतर मी प.पू. डॉक्टरांना विचारून इतर संप्रदायांचे कार्यक्रम जेथे होतात, तिथे जाऊन संपर्क करू लागले. आम्ही ‘रामकृष्ण मिशन’ यांच्या आणि अन्य एका सत्संगातील साधकांच्या ओळखी करून घेतल्या. पुढे त्यातील बरेच जण साप्ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले. पुढे पुढे विज्ञापने, अर्पण मिळवणे इत्यादींसाठी त्यांच्याकडे जाता येऊ लागले.
१४. अनुभूती : धाकट्या मुलाला पकडायला माणसे आल्याचे स्वप्न पडणे आणि खरोखरंच त्याला पकडायला माणसे येऊन जाणे अन् प.पू. डॉक्टरांच्या कृपेने त्याचे रक्षण होणे
१४ अ. स्वप्नात मुलाला मारायला बुरखाधारी नक्षलवादी माणसे आल्याचे दिसणे, त्यांनी झोपलेल्या मुलाच्या चेहर्यावर विजेरीचा प्रकाश टाकल्यावर साधिकेला तिथे प.पू. बाबांचा चेहरा दिसणे : वर्ष १९९५ मध्ये मला एक स्वप्न पडले. ‘माझा धाकटा मुलगा रजत कुठल्यातरी आश्रमात झोपला आहे. त्याच्या आसपास बरेच जण झोपले आहेत. इतक्यात २ – ४ बुरखाधारी नक्षलवादी माणसे विजेरी (बॅटरी) घेऊन रजतला शोधत तेथे आली आणि त्याच्या चेहर्यावर विजेरीचा प्रकाश टाकू लागली. त्यांनी रजतच्या चेहर्यावर विजेरीचा प्रकाश टाकला की, मला तिथे प.पू. बाबांचा चेहरा दिसायचा आणि नंतर रजतचा चेहरा दिसायचा.’ त्यानंतर मला जाग आली. तेव्हा माझ्या मनात आले, ‘रजतला पकडायला कुणी आले असेल का ?’
१४ आ. साधकांसमवेत प्रवचनासाठी जालना येथे जातांना मुलाने ‘मीसुद्धा येतो’, असे म्हणून सोबत येणे : दुसरे दिवशी सकाळी नऊ वाजता आमच्या घरी श्री. शिवाजीराव कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी आल्या. ते मला म्हणाले, ‘‘जालन्याला माझी बहीण रहाते. दुपारी तिच्या घराजवळ प्रसार करून आपण तिकडे प्रवचन घेऊ.’’ आम्ही सर्वजण जालन्याला जाण्यास निघालो. रेल्वेस्थानकावर पोचल्यावर रजतही पळत पळत आला आणि ‘मीसुद्धा येतो’, असे म्हणाला. नंतर जालन्याला प्रवचन घेऊन आम्ही रात्री परत आलो.
१४ इ. मुलाच्या मित्राच्या आईने मुलाला मारायला ४ – ५ माणसे येऊन गेल्याचे सांगणे आणि मुलाने ‘माझी मित्राशी मारामारी झाल्याने तो काही जणांना घेऊन मला मारायला येणार होता’, असे सांगणे : दुसर्या दिवशी रजतच्या मित्राच्या आई मला भेटल्या आणि म्हणाल्या, ‘‘तुम्ही सगळे आणि रजत कुठे गेला होतात ? रजतला मारायला ४ – ५ माणसे आमच्याकडे आली होती. माझ्या मुलाने त्या माणसांना ‘रजत येथे नाही’, असे सांगितल्यावर ते लोक निघून गेले.’’ तेव्हा रजत मला म्हणाला, ‘‘माझी एका मित्राशी मारामारी झाली होती. तो माझ्यावर चिडला होता आणि काही जणांना घेऊन मला मारायला येणार होता; म्हणून मी काल पळत पळत तुमच्या समवेत आलो होतो.’’
१४ ई. मित्रानेच मुलाची क्षमा मागितल्याचे कळल्यावर स्वप्नाची आठवण येऊन कृतज्ञता वाटणे : नंतर दुसर्या दिवशी रजत म्हणाला, ‘‘ज्याला मी मारले होते, तो मित्र मला अकस्मात् भेटला आणि त्याने माझी क्षमा मागितली.’’ त्याचे बोलणे ऐकल्यावर मला पडलेल्या स्वप्नाची आठवण आली. प.पू. बाबा आणि
प.पू. डॉक्टर यांनीच रजतला या प्रसंगातून अलगद वाचवले. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
१५. ‘प.पू. डॉक्टरच श्रीकृष्ण आहेत’, अशी निश्चिती होऊन ‘सर्वांना त्यांचे दर्शन व्हावे’, या ओढीने प्रसार करणे
वर्ष १९९६ मध्ये दूरचित्रवाहिनीवर प्रत्येक रविवारी ‘श्रीकृष्ण’ ही मालिका चालू झाली. ती पहायला लागल्यापासून मला ‘प.पू. डॉक्टर श्रीकृष्णच आहेत’, असे वाटू लागले. ज्या अभिनेत्याने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती, तो अभिनेता गुरुदेवांसारखाच दिसायचा. तेव्हापासून मला निश्चिती वाटू लागली की, ‘गुरुदेव श्रीकृष्णच आहेत.’ त्यामुळे माझी भावजागृती होऊ लागली. प्रसार करतांना ‘सर्व साधकांनी गुरुदेवांना पहावे’, अशी मला सारखी तळमळ लागली.
१६. वर्ष १९९७ मध्ये प.पू. डॉक्टरांनी करून घेतलेला अध्यात्मप्रसार !
१६ अ. वर्ष १९९७ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या सार्वजनिक सभा गावोगावी चालू होणे आणि त्यातून ‘सभेचा प्रसार कसा करायचा ?’ हे शिकता येणे : वर्ष १९९७ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या सभा गावोगावी चालू झाल्या होत्या. नाशिकला गुरुदेवांची सभा होती. त्यासाठी आम्हा साधकांना बोलावले होते. संभाजीनगरहून आम्ही १२ साधक २ – ३ दिवस आधी तेथे गेलो होतो. मुले कापडी फलक बांधण्याची सेवा करत होती आणि आम्ही प्रसार करत होतो, तसेच सभेच्या ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाची सेवाही करत होतो. अशा प्रकारे गुरुदेव नवीन सेवा शिकवत होते. सभेनंतर गुरुदेव सर्व साधकांना भेटले. ती भेटही अविस्मरणीय होती. सर्व साधकांना गुरुदेवांचे दर्शन झाले; म्हणून पुष्कळ आनंद झाला. तेव्हा साधकांना वेगवेगळ्या अनुभूती आल्या. सर्वांचा साधनेचा उत्साहही वाढला. मे १९९७ मध्ये गुरुदेवांची सोलापूर येथे सभा झाली, तेव्हा आम्ही ५ – ६ दिवस तिथे राहिलो. अशा प्रकारे गुरुदेवांनी ‘सार्वजनिक सभांच्या निमित्ताने प्रसार कसा करायचा ? मोठ्या प्रमाणावर ग्रंथप्रदर्शन कसे लावायचे ?’ या सर्व गोष्टी शिकवल्या. त्यातून पुष्कळ आनंद मिळू लागला.
१६ आ. गुरुदेवांनी ‘या वर्षी प्रत्येक जिल्ह्यात गुरुपौर्णिमा करायची आहे’, असे सांगणे : वर्ष १९९७ मध्ये प.पू. गुरुदेवांनी ‘आता प्रत्येक जिल्ह्यात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करायचा आहे’, असे सांगितले. तोपर्यंत संभाजीनगर येथील साधक संख्याही वाढली होती. नवीन नवीन ठिकाणी साधक सत्संग घेत होते. सत्संगातील काही साधक गुरुपौर्णिमेला आले होते. देवानेच आम्हा सर्वांकडून गुरुपौर्णिमा महोत्सवाची सेवा करून घेतली. या गुरुपौर्णिमेनंतर सत्संगाचा प्रसार आणखी वाढू लागला.
१६ इ. सनातनचा सत्संग ऐकून एक जिज्ञासू थेट प.पू. डॉक्टरांकडे मुंबई येथे जाणे, संभाजीनगरला परतल्यावर त्यांनी प्रवचनाचा प्रसार करण्यास उत्सुकता दाखवणे आणि नंतर ते सक्रीय होणे : वर्ष १९९७ च्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर मासामध्ये संभाजीनगर येथील एक जिज्ञासू (कै.) शिरीष देशमुख यांना कोल्हापूरला त्यांच्या एका मित्राकडे सनातनचा सत्संग ऐकायला मिळाला. तो ऐकल्यावर ते तेथून थेट प.पू. डॉक्टरांकडे मुंबई येथे गेले. मुंबई येथे त्यांना संभाजीनगरचा माझा पत्ता आणि दूरभाष क्रमांक मिळाला. ते संभाजीनगरला आल्यावर मी स्वतःच त्यांच्या घरी गेले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मी काय करायचे, ते मला सांगा.’’ त्यांच्या पत्नी सौ. अरुणाताईही प्रसार करण्यास सिद्ध झाल्या. त्यांच्या घराजवळच मला एका व्यक्तीचा पत्ता मिळाला होता आणि त्यांनी त्यांच्या घरी प्रवचन घेण्यास सांगितले होते. ते प्रवचन जणू देशमुख काकांसाठीच होते. काकांनी मनापासून प्रसार करण्यास उत्सुकता दाखवली आणि नंतर ते सक्रीय झाले. (कै. सौ. अरुणा देशमुख यांची मृत्यूसमयी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती आणि वय ७१ वर्षे होते. (कै.) शिरीष देशमुख नंतर रामनाथी, गोवा येथे राहून पूर्णवेळ साधना करत होते. त्यांची मृत्यूसमयी आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती आणि वय ७६ वर्षे होते.)
१७. छत्रपती संभाजीनगर येथे वर्ष १९९८ मध्ये झालेली प.पू. डॉक्टरांची पहिली सार्वजनिक सभा
१७ अ. सर्वत्रच्या साधकांच्या साहाय्याने संभाजीनगर येथील सार्वजनिक सभा आध्यात्मिक स्तरावर होणे : गुरुदेवांनी ‘२८ मार्च १९९८ या दिवशी संभाजीनगर येथे सार्वजनिक सभा घ्यायची आहे’, असे सांगून त्याच्या नियोजनाविषयी सांगितले. फेब्रुवारीपासूनच आम्ही सर्वजण सभेच्या सिद्धतेला लागलो. आम्ही सर्वजण अगदी भारावून गेलो होतो. सभेचे सर्व नियोजन केले गेले आणि आम्ही साधक त्या नियोजनात दंग झालो. नाशिक, विदर्भ, तसेच मुंबई येथून बरेच साधक सेवेसाठी आले होते. सगळ्यांमध्ये पुष्कळ उत्साह आणि चैतन्य आले होते. सभेसाठीची प्रसारसेवा पुष्कळ चांगली झाली. जवळजवळ सगळे शहर पिंजून काढले होते. मी प्रतिदिन सकाळपासून रात्रीपर्यंत प्रसाराला जात होते. माझ्या अंगात पुष्कळ उत्साह संचारला होता. ‘गुरुदेवांनी सर्वांना दर्शन द्यावे आणि संभाजीनगरला पावन करावे’, अशी तीव्र इच्छा माझ्या मनात होती. ही सार्वजनिक सभा आध्यात्मिक स्तरावर पार पडली.
१७ आ. सभेच्या १५ – २० दिवस आधी साधिकेला प.पू. डॉक्टरांची पाद्यपूजा करत असल्याचे स्वप्न पडणे आणि प्रत्यक्षातही पहिले नियोजन रहित करून गुरुदेवांनी ‘मुळेबाई पाद्यपूजा करतील’, असा निरोप पाठवणे : त्या वेळी गुरुदेवांची पाद्यपूजा एका साधक दांपत्याने करायची आहे’, असे नियोजन झाले होते. सभेच्या १५ – २० दिवस आधी, म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात मला एक स्वप्न पडले, ‘माझ्यासमोर गुरुदेव शेषनागावर बसले आहेत आणि मी त्यांची पाद्यपूजा करत आहे.’ हे स्वप्न मी कुणालाही सांगितले नव्हते. त्या वेळी अकस्मात् गुरुदेवांचा निरोप आला की, ‘पाद्यपूजा मुळेबाई करतील !’ सर्व साधकांना वाटले, ‘असे कसे होईल ? पाद्यपूजा दोघांनी करावी लागते आणि मुळेबाईंचे यजमान सनातनमध्ये नाहीत, मग कसे करणार ?’ तेव्हा गुरुदेवांनी कळवले, ‘‘मुळेबाईंनी एकटीनेच पाद्यपूजा केली, तरी चालेल !’’ अशा प्रकारे साक्षात् गुरुमाऊलींनी मला पाद्यपूजा करण्याची अमूल्य संधी देऊन माझ्यावर कृपा केली. त्यांनी या शूद्र जिवाचा उद्धारच केला. गुरुदेवा, आपण माझ्यावर किती कृपा केली !
१८. प.पू. डॉक्टरांचा संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्याविषयी भ्रमणभाष येणे आणि त्या प्रसारातून अनेक साधक सिद्ध होणे
एके दिवशी मला एक स्वप्न पडले, ‘स्वप्नात गुरुदेवांची ‘पोस्टर’सारखी पुष्कळ मोठी छायाचित्रे आमच्या घरात ठेवली आहेत आणि सर्वत्र गुरुदेवांचे ‘पोस्टर’ लावले आहेत.’ दिवाळीनंतर गुरुदेवांचा मला भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ‘‘आता आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रसार करायचा आहे. आता संभाजीनगर येथे काही साधक येतील. तुम्ही प्रवचने, ग्रंथप्रदर्शने, तसेच साधकांची निवास आणि भोजन यांची व्यवस्था करायची आहे.’’ त्या वेळी झालेल्या प्रसारातून अनेक साधक मिळाले आणि १५ ते २० साधक क्रियाशील झाले. अनेक मंदिरांतून ग्रंथप्रदर्शनांचे नियोजन करायला सांगितले. अशा प्रकारे वेगाने प्रसारकार्य चालू झाले. सर्व साधक मनापासून सेवेत सहभागी होऊ लागले. गुरुदेवांचे एक वाक्य माझ्या मनावर कोरले गेले, ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ आपली आहे ! तिचा प्रसार होण्यासाठी झोकून देऊन सेवा करता आली पाहिजे. ‘हे माझेच कार्य आहे’, असे साधकांना वाटले पाहिजे !’
‘हे गुरुदेवा, आपल्या या अलौकिक कार्यामध्ये माझ्यासारख्या क्षुद्र जिवाला अनेक अनुभूती देऊन आपण सहभागी करून घेतलेत’, यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते !’
(समाप्त)
– श्रीमती जयश्री चंद्रकांत मुळे (वय ७८ वर्षे), फोंडा, गोवा. (२२.७.२०२५)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
अन्य धर्मियांचे ध्येय आणि हिंदूंचे ध्येय यांतील भेद !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ