‘सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पाने वर्ष १९९४ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये (पूर्वीचे नाव औरंगाबाद येथे) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’चे कार्य चालू झाले. देवाचे हे कार्य देवानेच करवून घेतले. देवाच्या या कार्यात मला सेवेची अमूल्य संधी मिळाली. त्या वेळचा माझा साधनाप्रवास आणि मला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. साधनेत येण्यापूर्वीची स्थिती
१ अ. लहानपणापासून अन्याय सहन न होणे : लहानपणी माझ्या मनाची स्थिती पुष्कळ नकारात्मक होती. तेव्हापासून मला काही चुकीच्या गोष्टी आवडायच्या नाहीत. त्या वेळी ‘अन्याय’ हा शब्द मला ठाऊक नव्हता; पण घरातील लोकांनी इतरांची त्यांच्या पाठीमागे निंदा केली, तर ते मला आवडत नसे. मी शाळेत जायला लागले. तेथे काही मुले ब्राह्मण मुलांना चिडवत आणि मुंज झालेल्या मुलांची चेष्टा करत. त्यांचे ते तुच्छतेचे बोलणे मला आवडत नसे.

१ आ. विवाहानंतर घरातील, तसेच समाजात वाढू लागलेल्या रज-तमात्मक वातावरणामुळे ‘स्वतःचे जीवन वाया जाणार का ?’, असे विचार येऊ लागणे : माझे यजमान (कै. चंद्रकांत मुळे) सरकारी नोकरीत वैद्यकीय अधिकारी होते. त्या वेळची परिस्थिती बघून मला ‘समाज कुठेतरी भरकटत आहे’, असे वाटू लागले. मला जातीद्वेष आणि भ्रष्टाचार दिसत होता. सरकारी कर्मचारी पार्ट्या करत. त्यात मांसाहार, मद्यपान इत्यादी गोष्टी सर्रास चालू झाल्या होत्या. आमच्या घरात भाऊबंदकी चालू झाली आणि परिस्थिती विकोपाला जाऊ लागली. त्या वेळी माझ्या मनात सारखे विचार यायचे की, ‘हे सर्व कसे पालटणार ? आपले जीवन कुत्र्या-मांजरांसारखेच जाणार का ?’
२. ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’शी संपर्क होऊन जीवनाला मिळालेली कलाटणी
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातनरूपी सूर्य जीवनात येणे : अशा परिस्थितीत सनातनरूपी सूर्य माझ्या जीवनात प्रकाश घेऊन आला. वर्ष १९९४ मध्ये देवाने माझ्या जीवनाला कलाटणी दिली. ‘माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे, त्यावरील तोडगे आणि मार्गदर्शन हे सर्व ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’त आहे’, याची मला निश्चिती झाली. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी) किती पद्धतशीरपणे आणि शांतपणे हे कार्य आरंभले ! ‘बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ।।’ (तुकाराम गाथा, अभंग ५४७, ओवी २) म्हणजे ‘जन संसारामध्ये बुडत आहेत’, हे आमच्याने पहावेना; म्हणून त्यांचा कळवळा आमच्या हृदयात येऊ लागला’, असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. त्यांच्या या उक्तीप्रमाणे ग्लानी आलेल्या धर्माला पुनर्जीवन देण्यासाठी देवाने ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’ची स्थापना करून हे कार्य आरंभले.
२ आ. प.पू. डॉक्टरांनी मे १९९४ मध्ये संभाजीनगर येथे अभ्यासवर्गाचे नियोजन करण्यास सांगून प्रचार-प्रसार करण्याचे सर्व तंत्र शिकवणे आणि सेवा करतांना पुष्कळ आनंद जाणवू लागणे : मार्च १९९४ मध्ये संभाजीनगर येथील आमच्या घरी एका साधकाने सत्संग घेतला. तेथे सनातनच्या कार्याची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर प.पू. डॉक्टरांनी मे १९९४ मध्ये अभ्यासवर्गाचे नियोजन करण्यास सांगितले. ‘प्रवचन ठरवणे, त्याविषयीचे फलक लावणे, जिज्ञासूंना संपर्क करणे आणि वर्तमानपत्रांत वृत्त देणे’, अशा प्रकारे पहिल्या अभ्यासवर्गाचे नियोजन मी अन् एका साधकाने केले. गुरुदेवांनी आम्हाला ‘साधकांनी स्वतःच्या घरी अन्य साधकांचा निवास आणि भोजन यांची व्यवस्था कशी करायची ? जिज्ञासूंना संपर्क कसा करायचा ? हस्तपत्रकांमधून माहिती कशी द्यायची ?’, असे सर्व प्रचार-प्रसार तंत्र शिकवले. हे सर्व करतांना पुष्कळ आनंद जाणवू लागला. त्या वेळी वेगळेच दिव्य वातावरण मला अनुभवायला मिळाले.
२ इ. अविस्मरणीय आणि परिणामकारक ठरलेल्या पहिल्या अभ्यासवर्गामुळे मन भारावून जाणे अन् पुढील अभ्यासवर्गाची उत्सुकता लागणे : प.पू. डॉक्टरांची कृपा आणि संकल्प यांमुळे ८ मे १९९४ या दिवशी संभाजीनगरला सनातन भारतीय संस्थेचा पहिला अभ्यासवर्ग पार पडला. पू. संदीप आळशी यांचे भाऊ श्री. संतोष आळशी यांनी हा अभ्यासवर्ग घेतला. त्यांनी पुष्कळ सोप्या शब्दांत साधनेविषयी सांगितले. ‘मनाचे कार्य, त्याची आकृती, पंचज्ञानेंद्रियांचा आलेख इत्यादींविषयी सांगितले. ‘अध्यात्म, प्रारब्ध, तसेच संचित’ या शब्दांच्या व्याख्या ऐकून माझे मन भारावून गेले. मला हा अभ्यासवर्ग पुष्कळ आवडला आणि तो ऐकून माझे मन पुष्कळ प्रभावित झाले. अकस्मात् देवाने मला एका वेगळ्याच विश्वात आणले. त्या दिवसापासून मला पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवू लागला. त्यानंतर पुढच्या अभ्यासवर्गांबद्दल माझ्या मनात पुष्कळ आतुरता निर्माण झाली. त्यानंतर पुढील प्रत्येक मासात अभ्यासवर्ग झाले.
२ ई. ठराविक ग्रंथांचा अभ्यास करून संपर्क करतांना लोकांना सोप्या आणि शास्त्रशुद्ध भाषेत सांगितलेले अध्यात्माचे महत्त्व पटू लागणे अन् प.पू. डॉक्टरांच्या संकल्पाचा परिणाम जनमानसांत दिसू लागणे : प.पू. डॉक्टरांनी ‘धर्मप्रसार कसा करायचा आणि प्रवचन कसे घ्यायचे ?’, हे सर्व सहजतेने साधकांना शिकवले ! धर्मप्रसार करण्याची त्यांची अद्भुत लीला त्यांनी मला अनुभवण्यास दिली. त्या वेळी केवळ चारच ग्रंथ प्रकाशित झाले होते. प.पू. डॉक्टरांनी ‘अध्यात्मशास्त्रावर लिहिलेला चक्रमुद्रांकित (सायक्लोस्टाईल) ग्रंथ, संत भक्तराज विरचित भजनामृत, प.पू. श्रीमत् सद्गुरु भक्तराज महाराज यांची शिकवण, तसेच ‘विष्णु व विष्णूची रूपे (मारुति व दत्त यांसह) हे ग्रंथ अन् काही लेख यांचा अभ्यास करून मी संपर्काला जात असे. त्यानंतर कुलदेवतेच्या नामाचा प्रसार करणे, हेही कार्य चालू झाले आणि मला ते आवडले. देवाने त्यासाठी मला शक्तीही दिली. ही सर्व सेवा करतांना मला पुष्कळ आनंद होत होता. त्या वेळी गुरुदेवांचा संकल्पच कार्य करत होता. लोकांना हळूहळू कुलदेवतेच्या नामाचे महत्त्व कळू लागले. त्यांना सोप्या आणि शास्त्रशुद्ध भाषेत सांगितलेले अध्यात्माचे, तसेच धार्मिक विधींचे महत्त्वही पटू लागले. नंतर आपोआपच गुरुदेवांच्या संकल्पाचा परिणाम जनमानसांत दिसू लागला.
२ उ. गुरुदेवांनी समाजाला पारंपरिक कर्मकांडाच्या पलीकडचा मोक्षाचा मार्ग दाखवणे : प.पू. डॉक्टरांनी साधकांना मोक्षाचा मार्ग दाखवला. ‘धर्मप्रसार कार्यातून काय साध्य होणार आहे ?’, याचे मर्म त्यांनी सांगितले. ‘अध्यात्मशास्त्र हे एक शास्त्र आहे’, या वाक्याचा अर्थ प.पू. डॉक्टर वैज्ञानिक भाषेत समजावून सांगायचे. हे मला पुष्कळ आवडायचे. प.पू. डॉक्टरांचे एकेक वाक्य आणि वचने अजूनही माझ्या स्मरणात आहेत. खरेतर मी गुरुदेवांचे एकही प्रवचन ऐकले नव्हते, तसेच यापूर्वी मला अध्यात्माचा गंधही नव्हता. ‘काहीतरी व्रत किंवा उपवास करणे आणि एखादी पोथी वाचणे’, याच्या पलीकडे आणखी काही असते’, हेच मला ठाऊक नव्हते.
‘शारीरिक आणि मानसिक उपचारांसमवेत आध्यात्मिक स्तरावरील उपायही करायला हवेत’, या प.पू. डॉक्टरांच्या वाक्याची आलेली प्रचीती !

१. इमारतीत रहाणार्या एका जिज्ञासू स्त्रीच्या बहिणींच्या मुलींचे अपघाती निधन झाल्याने बहीण दुःखी आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होणे
आमच्या इमारतीत सौ. उषा राठोड नावाच्या एक जिज्ञासू रहात. मे मासामध्ये झालेल्या अभ्यासवर्गात त्यांनी साधकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. सौ. राठोड यांच्या घरी जून मासात एक दुर्घटना घडली. त्यांची भाची (बहीण सौ. रिटा सावरिया यांची १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली मुलगी) आणि त्यांच्या आतेबहिणीची मुलगी इतर कुटुंबियांसह पैठण येथील नाथसागर धरण पहायला गेल्या होत्या. ते धरण तुडुंब भरले होते आणि त्या ठिकाणी त्या दोघी वाहून गेल्या. या प्रसंगानंतर सौ. रिटाताई मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्या.
२. ‘अध्यात्मशास्त्र’ हा ग्रंथ वाचल्यावर ‘मनाच्या उपचारासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आवश्यक आहे’, हे लक्षात येणे आणि जिज्ञासू स्त्रीच्या बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेल्यावर तिला हा ग्रंथ देणे
त्या वेळी अभ्यासवर्गात प.पू. डॉक्टरांच्या ‘अध्यात्मशास्त्र’ या चक्रमुद्रांकित ग्रंथाचा, तसेच अन्य ग्रंथांचा अभ्यास केला जात असे. त्या वेळी मी प्रथमच ‘अध्यात्मशास्त्र’ हा ग्रंथ वाचला. त्या ग्रंथातील ‘अध्यात्मशास्त्र’ हे परिपूर्ण शास्त्र आहे. शारीरिक आणि मानसिक उपचारांसमवेत व्यक्तीवर आध्यात्मिक उपायही करायला हवेत.’ ही प.पू. डॉक्टरांची वाक्ये माझ्या मनावर पुष्कळ बिंबली होती. मी सौ. उषा राठोड यांनी सुचवल्याप्रमाणे त्यांच्या समवेत त्यांच्या बहिणीला, म्हणजे सौ. रिटा सावरिया यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांच्याकडे जातांना मी ‘अध्यात्मशास्त्र’ हा ग्रंथ घेऊन गेले होते. त्यांच्याशी बोलून झाल्यावर मी त्यांच्या हातात ग्रंथ दिला आणि आम्ही परत आलो.
३. अभ्यासवर्गात सांगितलेले विषय सौ. रिटा सावरिया यांना आवडणे आणि नंतर त्यांच्यात हळूहळू पालट होऊन त्यांनी साधनेला आरंभ करणे
हळूहळू सौ. रिटाताईंमध्ये सुधारणा होऊ लागली. त्यानंतर मी त्यांना अभ्यासवर्गाला येण्याचा निरोप दिला आणि त्या अभ्यासवर्गाला आल्या. गुरुदेवा, तुमची लीला तुम्हीच जाणे ! या अभ्यासवर्गात सौ. रिटाताईंचे लक्ष लागले. त्यांना आणि त्यांच्या नातेवाइकांना विषय आवडला. नंतर आम्ही त्यांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला सांगितला. त्यानंतर त्यांच्यात हळूहळू पालट होऊन त्यांनी परिस्थितीचा स्वीकार केला. (आता सौ. रिटा सावरिया देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. त्यांची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के असून वय ७६ वर्षे आहे.)
– श्रीमती जयश्री चंद्रकांत मुळे
३. अनुभूती
पूर्वी मला अती विचारांमुळे रात्री झोप लागत नसे; पण मी सनातनची साधना करू लागल्यावर मला व्यवस्थित झोप येऊ लागली.
४. प.पू. डॉक्टरांचे प्रत्यक्ष दर्शन !
२२ जुलै १९९४ या दिवशी धुळे येथे प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा होती. माझ्या जीवनातील ही पहिलीच गुरुपौर्णिमा होती. आम्ही काही साधक धुळ्याला गेलो होतो. तिथे मला प्रथमच प.पू. डॉक्टरांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तेथे मला गुरुदेवांची अपार प्रीती अनुभवायला मिळाली. ती मी शब्दांत सांगू शकत नाही. तो अनुपम सोहळा अविस्मरणीय आहे.
५. साधिका स्वतः सत्संग घेतांना तिला ‘प.पू. डॉक्टर स्वतःच्या मुखातून बोलत आहेत’, असे जाणवणे आणि जिज्ञासूंना सत्संग आवडू लागणे
आरंभी साधकांकडून सत्संगाविषयीचे लिखाण यायचे. त्याचा मी अभ्यास करायचे. मी लेख लिहून ते पाठ केले आणि नंतर सत्संग घेऊ लागले. गुरुदेव सूक्ष्मातून मला झोपेतच नवीन गोष्टी शिकवायचे. त्यामुळे नंतर सत्संग घ्यायला पुष्कळ आनंद वाटू लागला. ‘गुरुदेवच माझ्या मुखातून बोलत आहेत’, असे माझ्या लक्षात यायचे. प्रारंभी काही दिवस ‘मनःस्वास्थ्य शिबिर’ म्हणून सत्संग घेण्यात आले. सत्संगात फलकावर लिहून माहिती सांगितल्याने लोकांना ते पुष्कळ आवडले. ‘शंकानिरसन’ हा भागसुद्धा पुष्कळ जणांना आवडला. अशा प्रकारे आमची अध्यात्माची शाळाच चालू झाली. शाळा आणि महाविद्यालये येथे शिकतांना जेवढ्या वह्या भरल्या नसतील, तेवढ्या वह्या अध्यात्माच्या लेखनाने भरू लागल्या.
(क्रमशः)
– श्रीमती जयश्री चंद्रकांत मुळे (वय ७८ वर्षे), फोंडा, गोवा. (२२.७.२०२५)
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/976008.html
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान