बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा

१. लहानपणापासून साधनेची आवड असणे 

‘मला लहानपणापासून साधना करण्याची आवड होती. माझे आई-वडील अध्यात्मप्रसारासाठी बाहेर जात असतांना ‘मलाही त्यांच्या समवेत जावे’, असे वाटत होते. तेव्हा माझे आई-वडील मला सांगत असत, ‘‘तू अजून पुष्कळ लहान आहेस.’’ मला अध्यात्मप्रसार करायला पुष्कळ आवडत होते. मी इयत्ता पाचवीत असल्यापासून आई-वडिलांच्या समवेत प्रसाराला जाऊ लागले. तेव्हा मला ‘लोकांशी कसे बोलायला हवे ? त्यांना साधनेविषयी कसे सांगायचे ?’, यांविषयी शिकायला मिळाले.

२. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती 

कु. सरोजा मन्नोळकर

अ. मी बेळगावहून साधना करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प्रथमच आले असतांना मला पुष्कळ चांगले वाटले.

आ. मी स्वतःहून आश्रमातील अन्य साधकांशी ओळख करून घेतली.

इ. मी आश्रमात राहून साधना करत असतांना आरंभी माझ्याकडून पुष्कळ चांगले प्रयत्न झाले; मात्र नंतर माझे साधनेचे प्रयत्न अल्प होऊ लागले. माझ्या मनात अयोग्य विचार येऊ लागले; मात्र मी साधनेचे प्रयत्न करत राहिले. मी साधना करत गेले आणि मला चांगले वाटू लागले. ‘साधनेचे प्रयत्न चांगल्या प्रकारे करायला हवेत’, हे मला शिकायला मिळाले.

ई. ‘स्वच्छता कशी ठेवली पाहिजे ? इतरांशी कसे बोलायला हवे ? आपल्यात देव किंवा गुरु यांच्याप्रती भाव कशा पद्धतीने निर्माण करायला हवा ?’, हे मला शिकायला मिळाले.

उ. रामनाथी येथील सनातनचा आश्रम, हा केवळ आश्रम नाही, तर हा स्वर्ग आहे. या स्वर्गात जो आनंद मिळतो, तो इतर ठिकाणी मिळत नाही.

३. भावजागृतीचा प्रयोग करणे  

मी नामजप करण्यापूर्वी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्यासमोर बसले आहेत. ते मला श्रीकृष्णाच्या रूपात दिसत आहेत. त्यांच्या हातात सुदर्शनचक्र आणि डोक्यावरील मुकुटात मोरपीस आहे. त्यांनी भगवी वस्त्रे घातली आहेत. ते मुरली वाजवत आहेत. मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या चरणांवर नतमस्तक झाले. मला त्यांच्या चरणांतून अधिक प्रमाणात चैतन्य मिळाले. ते वाजवत असलेल्या मुरलीच्या आवाजात मी रमून गेले. तेव्हा माझ्या मनात कोणतेच वाईट विचार आले नाहीत’, असा भावजागृतीचा प्रयोग केला.

मी गुरुदेवांच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे), बेळगाव  (२७.४.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक