‘२३ ऑक्टोबर २०२५ या दिवशी सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई (वय ८४ वर्षे) यांनी देहत्याग केला. देवाच्या कृपेने त्यांचा देहत्याग आणि त्यानंतर त्यांचा सूक्ष्मातील प्रवास यांच्या संदर्भात माझ्याकडून झालेल्या सूक्ष्म परीक्षणाची सूत्रे येथे लेखबद्ध केली आहेत. ४.११.२०२५ या दिवशी यातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहू.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/973390.html

९. पू. (कै.) देसाईआजोबांमधील विविध गुणांमुळे सूक्ष्म स्तरावर परिणाम झाल्याने साधकांना पू. आजोबांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
९ अ. पू. देसाईआजोबांना पाहिल्यावर साधकांचा निरागसभाव जागृत होणे : पू. देसाईआजोबांनी अनेक जन्मांत भगवंताची भावपूर्ण उपासना केली. त्यामुळे त्यांच्या चित्तातील संस्कार पुसले जाऊन त्यांचे चित्त शुद्ध झाले होते. त्यांचे बाह्यमन बाळाप्रमाणे निर्मळ झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहून साधकांचा निरागसभाव जागृत होत होता.
९ आ. साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधना अधिकाधिक तळमळीने अन् भावपूर्ण करण्याची प्रेरणा मिळणे : पू. देसाईआजोबा उतारवयातही तळमळीने आणि भावपूर्ण साधना करत होते. ते पाहून साधकांना पू. आजोबांप्रमाणेच व्यष्टी आणि समष्टी साधना अधिकाधिक तळमळीने अन् भावपूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली.
९ इ. पू. देसाईआजोबांचा अहं अत्यल्प असल्यामुळे त्यांची विनम्रता जाणवून साधकांचा विनम्रभाव जागृत होणे : पू. देसाईआजोबांमध्ये अहं अत्यल्प होता. त्यामुळे त्यांना पाहून साधकांना विनम्रता जाणवत होती आणि साधकांचा श्री गुरु अन् देवता यांच्या प्रती विनम्रभाव जागृत होत होता.

९ ई. पू. देसाईआजोबा यांच्या मनाच्या पावित्र्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चितेत पेटलेल्या ‘क्रव्याद’ नावाच्या अग्नीचे पावित्र्य वाढणे : पू. देसाईआजोबांचे मन पवित्र होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या चितेत पेटलेल्या ‘क्रव्याद’ नावाच्या अग्नीला पू. आजोबांच्या अस्थींचा स्पर्श झाल्याने अग्नीची अशुद्धता दूर होऊन त्याचेही पावित्र्य वाढले. मी सूक्ष्मातून पू. आजोबांची पेटलेली चिता पहात असतांना ‘हा त्यांचा अंत्यसंस्कार विधी नसून सोमयागाप्रमाणे एक पवित्र समष्टीयाग चालू आहे’, असे मला जाणवले. ‘त्यांच्या अस्थी आणि चिताभस्म यांना कापराप्रमाणे सुगंध येत आहे’, असे मला जाणवत होते. त्यामुळे त्यांच्या स्थूलदेहाची राख ही रज-तमप्रधान राख नसून त्यात शिवतत्त्व कार्यरत झाल्याने ती भस्माप्रमाणे पवित्र आहे. शिवाला पवित्र जिवांच्या स्थूलदेहाच्या चिताभस्माचे लेपन करण्यास आवडतेे. त्यामुळे पू. आजोबांच्या अग्नीसंस्कार विधीनंतर शिवगण त्यांचे चिताभस्म घेऊन कैलासावरील शिवाच्या सगुण रूपाच्या देहाला लावणार आहेत.
९ उ. पू. देसाईआजोबांच्या अंत्यविधीतून निर्माण झालेली सात्त्विक ऊर्जा समष्टीच्या कल्याणासाठी वापरली जाणार असणे : पू. देसाईआजोबा संत होते. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहाला सद्गती मिळाली. त्यांच्या अंत्यविधीमधून निर्माण झालेली सात्त्विक ऊर्जा समष्टीच्या कल्याणासाठी वापरली जाणार आहे. ज्या दिवंगत साधकांचे लिंगदेह अनिष्ट शक्तींच्या नियंत्रणात आहेत, त्या लिंगदेहांची सुटका होण्यासाठी ही सात्त्विक ऊर्जा वापरली जाणार आहे. ‘संत केवळ जिवंतपणीच नव्हे, तर त्यांच्या देहत्यागानंतरही समष्टीचे किती कल्याण करतात !’, हे या सूत्रावरून अनुभवण्यास मिळाले.
९ ऊ. पू. देसाईआजोबांमध्ये निर्गुण चैतन्य कार्यरत असणे : पू. देसाईआजोबांमध्ये कार्यरत असणार्या निर्गुण चैतन्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर जेव्हा त्यांचे पुत्र आणि साधक त्यांच्या अस्थी गोळा करायला जातील, तेव्हा त्यांना त्या अस्थी शीतल जाणवणार आहेत. (‘पू. (कै.) देसाईआजोबा यांचे मोठे सुपुत्र श्री. चंद्रशेखर यांनी पू. देसाईआजोबांच्या अस्थी गोळा केल्या. तेव्हा त्या अस्थी हातात घेतल्यावर त्यांना शांत वाटले.’ – संकलक)
१०. पू. देसाईआजोबांची मागील १४ जन्मांत झालेल्या आणि पुढील एका जन्मात होणार्या व्यष्टी अन् समष्टी साधनेचे प्रमाण
टीप – पू. (कै.) देसाईआजोबा यांच्या अंतःकरणातील ‘भाव आणि तळमळ’ या गुणांमुळे त्यांची विविध योगमार्गांनुसार व्यष्टी साधना पूर्णत्वाला जाणार आहे. पू. आजोबा यांच्यावरील श्री गुरुकृपेमुळे त्यांच्यातील व्यष्टी भावाचे रूपांतर समष्टी भावात आणि व्यष्टी तळमळीचे रूपांतर समष्टी तळमळीत झाले आहे. त्यामुळे त्यांनी गुरुकृपायोगानुसार केलेल्या साधनेमुळे त्यांची समष्टी साधना पृथ्वीवरील त्यांच्या पुढील, म्हणजे १५ व्या जन्मात पूर्णत्वाला जाणार आहे. त्यांच्या १५ व्या जन्मात त्यांच्यातील भावाचे रूपांतर भक्तीत आणि प्रेमभावाचे रूपांतर प्रीतीत होणार आहे. या त्यांच्या शेवटच्या जन्मात त्यांना श्री गुरुकृपेने ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तिन्हींची प्राप्ती होऊन ते समष्टी परात्पर गुरुपद गाठणार आहेत.
११. पुढील ३६ वर्षांनंतर पू. देसाईआजोबांच्या पृथ्वीवर होणार्या शेवटच्या मनुष्यजन्माची वैशिष्ट्ये !
पू. देसाईआजोबांचा लिंगदेह पुढील ३६ वर्षे, म्हणजे एकूण ३ तपे जनलोकात राहून साधनारत असणार आहे. त्यानंतर त्यांचा पृथ्वीवर हिंदु राष्ट्रात जन्म होणार आहे. या जन्मात ते गुरुकृपायोगांतर्गत ज्ञानयोगानुसार साधना करून आत्मज्ञान प्राप्त करणार आहेत. या जन्मात ते गुरुस्थानी राहून अनेक जिवांना ‘त्यांच्या कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग या योगमार्गांना गुरुकृपायोगाला जोडून त्यानुसार साधना कशी करायची ?’, या संदर्भात अचूक मार्गदर्शन करून महत्त्वपूर्ण समष्टी साधना करणार आहेत. या जन्मात त्यांना त्यांच्या व्यष्टी साधनेमुळे प्रथम सायुज्य मुक्ती आणि त्यानंतर समष्टी साधनेमुळे मोक्षाची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे पुढील ३६ वर्षांनी त्यांचा पृथ्वीवर होणारा जन्म हा त्यांचा १५ वा आणि शेवटचा मनुष्य जन्म असेल. पू. देसाईआजोबांच्या मागील जन्मांतील, म्हणजे त्यांच्या १४ व्या जन्मातील चिताभस्म शिवाने सूक्ष्मातून धारण केल्याचे प्रतीक म्हणून पू. देसाईआजोबांच्या १५ व्या जन्मात जन्मतःच त्यांच्या कपाळावर सोनेरी रंगाचे बिल्वपत्राचे चिन्ह असेल.
१२. पू. (कै.) देसाईआजोबांना सायुज्य मुक्ती आणि मोक्ष मिळणार असण्यामागील गूढ रहस्य
पू. आजोबांचा अहं अत्यल्प असल्यामुळे त्यांचे मन निर्मळ आणि चित्त शुद्ध झाले आहे. त्यांच्यामधील बुद्धीचा अडथळा दूर होऊन त्यांची बुद्धी सात्त्विक आणि सूक्ष्म झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर भरभरून गुरुकृपा होऊन त्यांना आत्मज्ञान होणार आहे. त्यामुळे त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांना पुढे केवळ १५ वा मनुष्य जन्म घेतल्यानंतर सायुज्य मुक्ती (भगवंताच्या सगुण रूपाशी एकरूप होणे) आणि मोक्ष (भगवंताच्या निर्गुुण रूपात विलीन होणे) मिळणार आहे.
१३. श्री गुरुचरणी कृतज्ञता
‘श्री गुरूंच्या कृपेनेच पू. देसाईआजोबांचा देहत्याग, त्यांचा देहत्यागानंतरचा प्रवास, त्यांनी विविध जन्मांत केलेली साधना आणि त्यांचा हिंदु राष्ट्रात होणारा भावी जन्म’, यांच्या संदर्भातील सूत्रे समजली’, त्याबद्दल मी श्री गुरुचरणी कृतज्ञताभावरूपी पिवळे कमलपुष्प समर्पित करते. मी पू. (कै.) देसाईआजोबांच्या चरणी हे लेखरूपी कृतज्ञतापुष्प समर्पित करते.’
(समाप्त)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक २४.१०.२०२५ आणि ते टंकलेखन करण्याची वेळ दुपारी ३.१५ ते ३.३५)
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !