कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !

धर्मशिक्षणाचा अभाव, तसेच सामाजिक माध्यमांच्या स्वातंत्र्यतेचे दुष्परिणाम !

कोल्हापूर – ‘इस्टाग्राम’वर झालेल्या ओळखीतून जिल्ह्यात १० वर्षीय मुलगी घरातून कुणालाही न सांगता १९ वर्षीय तरुणासमवेत पळून गेली. मुलगी परत न आल्याने चिंताग्रस्त पालकांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी तातडीने तांत्रिक उपकरणांचे साहाय्य घेत शहापूरजवळ मिठारवाडी रस्यावरील निर्जनस्थळी तिला शोधून काढले. (धर्मशिक्षणाअभावी आजच्या विद्यार्थ्यांना योग्य-अयोग्य कळेनासे झाले आहे. लहान वयात सामाजिक माध्यमांचा वापर करण्यास सवलत देणारे पालकही या घटनेस तितकेच उत्तरदायी आहेत ! यापुढे शासनाने लहान मुलांच्या सामाजिक माध्यमांवरील वापरावर कायमस्वरूपी बंदी आणण्याच्या दृष्टीनेच पावले उचलणे अत्यावश्यक आहे, तरच अशा घटनांना आळा बसू शकेल ! – संपादक)

पोलिसांनी केलेल्या ‘सीसीटीव्ही’च्या पडताळणीत मुलगी शहापूरच्या दिशेने एका तरुणाच्या दुचाकीवर बसून गेल्याचे दिसले. पोलिसांनी तिच्या सामाजिक माध्यमाच्या खात्यावरून, तसेच तिच्या मित्र-मैत्रिणींकडून अधिक माहिती घेतली. यानंतर गतीने विविध मार्गांनी अन्वेषण करत मुलीला शोधून काढले. या प्रकरणी पोलिसांनी उमेश चौगुले या तरुणाला कह्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत सामाजिक माध्यमांवरील वाढलेली ओळख आणि प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा यांमुळे मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले. मुलीला सध्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

१० वर्षांची मुलगी ‘इन्स्टाग्राम’चा वापर करते, १९ वर्षांच्या मुलाशी मैत्री करते, नियमित त्याच्याशी बोलते आणि घरातून थेट पळून जाण्याचे पाऊल उचलते अन् हे करेपर्यंत पालकांना यातील काहीही ठाऊक नसणे, ही गंभीर स्थिती या निमित्ताने समोर येत आहे. पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या हातात भ्रमणभाष दिल्यास त्याचे गंभीर परिणाम काय होतात, हे या निमित्ताने समोर आले आहे.