चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !

‘१७.६.२०२६ या दिवशी पणजी, गोवा येथील प्रसिद्ध ज्येष्ठ नट पद्मश्री प्रसाद सावकार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी दु:खद निधन झाले. मराठी रंगभूमीवर संगीत नाटके गाजवलेल्या शेवटच्या फळीतील मान्यवर कलाकारांपैकी पंडित प्रसाद सावकार हे एक होते. पंडित प्रसाद सावकार यांची मराठी नाट्यक्षेत्रात अण्णासाहेब किर्लोस्करांचे ‘संगीत सौभद्र’ ते अलीकडील डॉ. मीना नेरूरकर यांचे ‘संगीत अवघा रंग एक झाला’, या नाटकापर्यंत अनेक दशकांची दीर्घ अशी यशस्वी वाटचाल पुढील पिढ्यांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी राहील. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही ‘पेडगावचे शहाणे’, ‘गोरा कुंभार’, ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटांमध्येही कामे केली. त्यांना पद्मश्री पुरस्कारासहित ‘बालगंधर्व सुवर्णपदक’, ‘संगीतभूषण राम मराठे स्मृती पुरस्कार’, गोवा शासनाचा ‘कलावंत पुरस्कार’, ‘दिनानाथ मंगेशकर पुरस्कार’, ‘लता मंगेशकर पुरस्कार’ आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

वर्ष २०२२ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांची त्यांच्या गोवा येथील निवासस्थानी भेट घेतली. २६.६.२०२६ या दिवशी पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या भेटीच्या वेळी त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि नाट्यक्षेत्रातील त्यांचे काही अनुभव यांना उजाळा देत आहोत.

पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार

१. उतारवयातही उत्साही, प्रेमळ आणि बोलक्या स्वभावामुळे साधकांना प्रथम भेटीतच आपलेसे करून घेणे

आम्ही पंडित सावकार यांच्या भेटीला गेलो असता प्रथम भेटीतच त्यांनी आम्हाला आपलेसे केले होते. त्यांच्या प्रेमळ आणि बोलक्या स्वभावामुळे ‘आम्ही त्यांना प्रथमच भेटत आहोत’, हे त्यांनी आम्हाला जाणवूही दिले नव्हते. त्या वेळी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आमचे प्रेमाने स्वागत केले.


नाट्यकलेच्या माध्यमातून साधना करून ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘नाट्यकला सादर करतांना ती झोकून देऊन आणि निरपेक्ष भावनेने केल्याने साधनाच होते’, हे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांच्या नाट्यकलेतील प्रवासातून जाणवले. पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांच्यातील या गुणांमुळे त्यांनी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.‘नाट्यकलेतूनही साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होता येते’, याचा आदर्शच पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांनी समाजासमोर ठेवला आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२५.६.२०२६)

२. पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार मराठी नाट्यसृृष्टीतील ज्येष्ठ आणि अनेक दशकांचा अनुभव असलेले कलाकार असूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात यत्किंचितही अहं न जाणवणे

त्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पंडित प्रसाद सावकार यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ते त्यांच्या नाट्यप्रवासाविषयी पुष्कळ सहजतेने हसत-खेळत सांगत होते. वास्तविक पहाता त्यांचे सर्व अनुभव नाट्यक्षेत्रातील पुष्कळ नावाजलेल्या मान्यवरांच्या समवेतचे होते; पण याचा त्यांना यत्किंचितही अहं नव्हता किंवा ‘मी एवढा मोठा कलाकार आहे’, असेही त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत नव्हते.


पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार हे प्रथम नाट्यकृतींचा, नंतर इतरांचा आणि त्यानंतर स्वत:चा विचार करणारा जाणता नि:स्वार्थी कलाकार !


आपण आजच्या स्पर्धेच्या जगात पहातो, ‘लोक स्वार्थापोटी दुसर्‍याचे कामही आपल्याला कसे मिळेल’, हे पहातात; मात्र पंडित सावकार हे नाट्यकृतीचा प्रथम विचार करत असत. या संदर्भात त्यांनी एक किस्सा सांगितला होता, ‘‘वर्ष १९६७ मध्ये श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात मी खानसाहेबांची भूमिका करावी’, अशी दिग्दर्शकाची इच्छा होती. तेव्हा ‘माझ्यापेक्षा ती भूमिका पं. वसंतराव देशपांडे अधिक चांगली करतील’, हे मी पटवून दिले. मी याच नाटकात ‘सदाशिव’ ही भूमिका साकारली. आपल्याला ठाऊकच आहे की, ‘नाट्य इतिहासात खानसाहेबांची भूमिका अजरामर ठरली.’ यातून पंडित सावकार यांची मर्मज्ञ (पारखी) दृष्टी आणि ‘नाट्यकृतीच्या हिताच्या दृष्टीने अधिक आवश्यक काय आहे’, ही तत्त्वनिष्ठ विचारसरणी लक्षात येते. – सौ. शुभांगी शेळके

३. चित्रपटसृष्टीत आर्थिक कमाई अधिक असूनही पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांनी नाट्यकलेचीच अविरत सेवा करणे आणि त्यातच समाधानी असणे

मराठी चित्रपटसृष्टीत आर्थिक कमाई अधिक असूनही पंडित सावकार यांनी चित्रपटांत फारसे काम केले नाही; मात्र त्यांच्या बोलण्यातून याची कुठेही खंत जाणवली नाही. त्यांना नाट्यसृष्टीत अखंड काम करत राहिल्याचे सात्त्विक समाधानच अधिक वाटत होते. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. ‘ते जे काही आहे, त्यात समाधानी होते आणि हेच त्यांच्या आनंदी स्वभावाचे गमक आहे’, असे जाणवले.


पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संगीत विषयक कार्य पाहून काढलेले गौरवोद्गार !

पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार, उभे डावीकडून सौ. शुभांगी शेळके, सुश्री तेजल पात्रीकर, कु. रेणुका कुलकर्णी (आताच्या सौ. रेणुका क्राक) आणि श्री. मनोज सहस्रबुद्धे (वर्ष २०२२)

‘एका चलचित्रफितीच्या (‘व्हिडिओ’च्या) माध्यमातून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ‘संगीत विषयक संशोधन आणि कलेतून साधनाविषयक कार्य’ पाहून पंडित प्रसाद सावकार म्हणाले, ‘‘तुमचे कार्य पाहून मी भारावून गेलो आहे. तुम्ही करत असलेले कलेच्या संदर्भातील आध्यात्मिक संशोधन पुढच्या पिढीला कळणे आवश्यक आहे. हे कार्य विशेष आहे. हे संशोधनकार्य सर्व लोकांपर्यंत पोचले पाहिजे. तुमचे विविधांगी संशोधनकार्य पाहून ‘रंगभूमीवर असतांना अभिनयाविषयी संशोधन कसे करू शकतो’, हे माझ्या लक्षात आले.’ – पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार

४. पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांनी संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारण्याआधी आळंदीला जाऊन आळंदीचे आध्यात्मिक वातावरण अनुभवल्याने त्यांना भूमिका भावपूर्ण साकारता येणे

पंडित प्रसाद सावकार यांनी संत ज्ञानदेवांची भूमिका असलेले नाटक ‘गीता गाती ज्ञानेश्वर’ हे करण्याआधी ते प्रत्यक्ष आळंदीला गेले. ‘तेथील आध्यात्मिक वातावरण आणि संत ज्ञानदेवांचे सूक्ष्म अस्तित्व’ यांची पंडित सावकार यांनी अनुभूती घेतली. त्यामुळे त्यांची भावजागृती झाली. याचा लाभ त्यांना संत ज्ञानदेवांच्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी झाला. त्यांनी कलेच्या माध्यमातून केलेली ही आध्यात्मिक साधनाच होती.

खरा कलाकार कला आयुष्यभर जगतो आणि त्यातून तो जगाला आनंद अखंड देत असतो. हेच पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांनी आपल्याला शिकवले आहे. अशा या हरहुन्नरी कलाकाराला आम्ही मनापासून नमस्कार करतो. पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार यांच्या चरणी या लेखाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो !’

– सौ. शुभांगी शेळके (एम्.ए. नाट्यशास्त्र), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.६.२०२६)