‘२७.१.२०२६ ते २२.२.२०२६ या कालावधीत बेंगळुरू जिल्ह्यात पू. रमानंद गौडा यांचा दौरा झाला. त्या कालावधीत साधक, धर्मप्रेमी आणि हिंदु समाजबांधव यांच्यासाठी ‘धर्मशिक्षण, धर्माचरण, हिंदु राष्ट्र आणि आध्यात्मिक साधना’ या विषयांवर पू. रमानंदअण्णांचे विशेष मार्गदर्शन आयोजित केले होते. या संदर्भात बेंगळुरू आणि इतर जिल्ह्यांतील साधक, धर्मप्रेमी, व्यापारी, आधुनिक वैद्य, अधिवक्ता असे ६० हून अधिक जण आपापल्या वेळेनुसार (३ – ४ दिवस किंवा १ आठवडा) पुढील साधना शिकण्यासाठी पू. अण्णांच्या समवेत होते. त्या कालावधीत पू. अण्णांच्या समवेत असलेल्यांपैकी अनेक जण आता दायित्व घेऊन चांगली सेवा करत आहेत. ‘संतांचा सहवास आणि मार्गदर्शन मिळणे’, खरोखरच दुर्मिळ आहे. देवाच्या कृपेने पू. अण्णांच्या बेंगळुरू जिल्ह्यातील दौर्यात आम्हा सर्व साधकांना असे सौभाग्य लाभले. पू. अण्णांच्या सत्संगाच्या वेळी सर्व साधकांना निर्विचार स्थिती आणि शांती याची अनुभूती आली. त्याविषयी पुढे दिले आहे.

१. दौर्याच्या कालावधीत व्यस्त दिनक्रम असूनही पू. रमानंद गौडा यांनी त्यां च्या समवेत असलेल्या साधकांना रात्री सत्संगांत विविध विषयांवर मार्गदर्शन करणे
पू. रमानंदअण्णा एका दिवसात २ – ३ सत्संग घेत असत. त्यांचा असा व्यस्त दिनक्रम असूनही ते त्यांच्या समवेत असलेल्या साधकांसाठी रात्री सत्संग घेत असत. या सत्संगात साधकांना प्रत्येक दिवसाचे व्यष्टी साधनेचे ध्येय दिले जात होते आणि साधकांकडून झालेल्या प्रयत्नांचा आढावाही घेतला जात होता. ‘साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे, साधनेत पुढील टप्प्याचे प्रयत्न कसे करावेत ? दिवसभरात सेवेत कुठे न्यून पडले, स्वतःकडून झालेला चुका, साधकांच्या अयोग्य मानसिकतेमुळे त्यांची साधनेत होणारी हानी आणि योग्य दृष्टीकोन ठेवून प्रयत्न कसे करावेत ? भावजागृतीसाठी प्रयत्न कसे करावेत ?’, या विषयांवर पू. अण्णा साधकांना अमूल्य मार्गदर्शन करत होते. त्यांचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘पू. अण्णांना साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्याचा किती ध्यास असतो’, हे आम्हा सर्वांच्या लक्षात आले.
२. पू. रमानंद गौडा यांच्या सत्संगाच्या वेळी साधकांना आलेल्या विविध अनुभूती
२.२.२०२६ या दिवशी रात्री पू. रमानंदअण्णांचा सत्संग होता. त्या वेळी पू. रमानंदअण्णांनी आरंभी साधकांना त्यांनी दिवसभरात शिकलेल्या सूत्रांविषयी विचारले. त्यानंतर त्यांनी साधकांना भावाच्या स्तरावर प्रयत्न करण्याचे महत्त्व उदाहरणांसह समजावून सांगितले. पू. अण्णांनी ‘एका संतांनी सांगितलेली ‘मानवजन्माचे महत्त्व आणि गुरूंप्रती असलेली भक्ती कशी असावी ?’, याविषयीची सूत्रे साधकांना समजावून सांगितली. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
२ अ. सत्संगात साधकांना आलेल्या अनुभूती
२ अ १. ‘हा सत्संग पृथ्वीवर होत नसून उच्च लोकात होत आहे आणि तेथील शांती अनुभवत आहोत’, असे साधकांना वाटणे : पू. अण्णा सांगत असलेले प्रत्येक सूत्र साधकांच्या अंतरंगाला स्पर्श करत होते. पू. रमानंदअण्णा ‘संतांचे महत्त्व, गुरूंची महानता आणि गुरु-शिष्य संबंध’ या विषयावर बोलत होते. त्या सत्संगात वातावरण उत्तरोत्तर अधिकाधिक शांत होत गेले. सत्संगात साधकांच्या भावावस्थेत उत्तरोत्तर वृद्धी होत होती. सर्व जण ती निःशब्द स्थिती अनुभवण्याचा प्रयत्न करत होते. हे भावविश्व अनुभवत असतांना ‘आपण या पृथ्वीवर नसून उच्च लोकात आहोत आणि तेथील शांती अनुभवत आहोत’, असे सर्वांना वाटत होते.
२ अ २. मन निर्विचार होणे आणि देहाची जाणीव न्यून होणे : सत्संगात उपस्थित असलेले सर्व जण निर्विचार स्थिती अनुभवत होते. साधकांना ‘देहाची जाणीव न्यून होणे, बुद्धीच्या स्तरावर कोणतेही विचार मनात न येणे, हलकेपणा जाणवणे’, अशा अनुभूती येत होत्या. ‘केवळ श्वासोच्छ्वास अत्यंत मंद गतीने चालू आहे’, अशी साधकांना जाणीव होत होती. सर्व जण अनुमाने दीड घंटा ही स्थिती अनुभवत होते.
२ अ ३. काही जणांना ‘कालचक्रच थांबले आहे’, असे वाटत होते. त्या वेळी संपूर्ण वातावरणही स्तब्ध झाले होते.
२ अ ४. ‘आपण कोणत्या तरी उच्च लोकातील पोकळीत आहोत’, असे सर्व साधकांना वाटत होते.
२ अ ५. ‘गुरूंचे निर्गुण तत्त्व प्रचंड प्रमाणात कार्यरत आहे’, याची अनुभूती सर्व साधकांना आली.
२ अ ६. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा आणि पू. रमानंद गौडा यांचे अस्तित्व’ यांमुळे आनंद अन् शांती अनुभवून साधक धन्य होणे : ‘आपण भगवंतात लीन होण्याच्या स्थितीत, तसेच उच्च आध्यात्मिक स्तराच्या आनंदात राहू शकतो’, याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची संधी गुरूंनी आम्हाला त्या क्षणांमध्ये दिली. त्या वेळी ‘तेथील साधकच नव्हे, तर तेथे आजूबाजूला असलेली प्रत्येक निर्जीव वस्तूही ते दिव्य चैतन्य अनुभवत आहे’, असे आम्हाला जाणवत होते. ही अनुभूती शब्दातीत आणि साधकांच्या हृदयावर बिंबणारी होती. ‘आपण साधना करत पुढे जात असतांना शांतीची अवस्था प्राप्त होते’, असे आम्ही ऐकले आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा आणि पू. रमानंदअण्णा यांचे अस्तित्व’ यांमुळे या सत्संगात आम्ही शांतीची प्रत्यक्ष अनुभूती घेऊ शकलो. साधकांना ध्यानाच्या उन्नत स्थितीत येणार्या आत्मानंदाची अनुभूती पू. अण्णांच्या सत्संगात सहजतेने मिळाली. आम्ही सर्व जण आनंद आणि शांती अनुभवून धन्य झालो.
२ अ ७. ‘युद्धभूमीत श्रीकृष्णाने कालचक्र स्तब्ध करून अर्जुनाला गीतेचे गहन ज्ञान प्रदान केले, त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. रमानंद गौडा यांच्या माध्यमातून सर्व साधकांना आनंदाची अनुभूती दिली’, असा भाव साधिकेत निर्माण होणे : त्या अनुभूतीच्या कालावधीत एका साधिकेला महाभारतातील एक पवित्र प्रसंग आठवला. ‘युद्धभूमीत श्रीकृष्णाने कालचक्र स्तब्ध करून एका घंट्यात अर्जुनाला गीतेतील गहन ज्ञान प्रदान केले. महाभारताच्या युद्धाच्या वेळी दोन्ही बाजूकडचे सैनिक युद्धासाठी सिद्ध झाले होते. त्या वेळी दीर्घकाळ उपदेश करणे शक्य नव्हते. वेळ अत्यल्प होता. ‘त्या अल्प वेळेत श्रीकृष्णाने अर्जुनाला गहन आणि जीवनात परिवर्तन करणारे ज्ञान दिले. त्याचप्रकारे आमच्या गुरूंनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) पू. अण्णांच्या माध्यमातून सर्व साधकांना या आनंदाची अनुभूती दिली’, असा भाव त्या साधिकेत निर्माण झाला.
२ आ. साधकांना जाणवलेली सूत्रे
१. बेंगळुरूसारख्या महानगरात वाहतूक पुष्कळ असूनही त्या वास्तूच्या बाहेरील कोणताही आवाज वास्तूत ऐकू येत नव्हता.
२. सत्संगात पू. अण्णा भावावस्थेत होते. तो सत्संग शब्दातीत होता.
३. सत्संग लवकर संपवायचे नियोजन होते; मात्र सत्संग पुढे बराच वेळ चालू राहिला.
३. कृतज्ञता
या सत्संगाचा एकूण ३० पेक्षा अधिक साधकांनी लाभ घेतला. मायेत अडकलेल्या आमच्यासारख्या पृथ्वीलोकातील अपात्र जिवांनी अशी स्थिती अनुभवणे अशक्य आहे; मात्र ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनंत कृपा आणि पू. रमानंदअण्णा यांचे अस्तित्व’ यांमुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य साधकांना उच्च लोकाची अनुभूती घेणे शक्य झाले. ‘अशी दैवी अनुभूती आम्हाला दिली’, त्याबद्दल आम्ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. रमानंदअण्णा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– डॉ. प्रणव मल्ल्या, श्री. शरत कुमार, श्री. गुरुराज शर्मा, श्री. प्रशांत शानभाग, कु. रेवती मोगेर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३५ वर्षे) आणि सौ. अश्विनी नागराज, बेंगळुरू, कर्नाटक. (१४.३.२०२६)
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !