भरारी पथक निर्माण करून गोहत्या आणि गोतस्करी नियंत्रणात आणणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षकांची ग्वाही

गोहत्या प्रकरणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक

हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक

रत्नागिरी, २५ जून (वार्ता.) – तालुक्यातील फणसवळे येथे झालेल्या निर्घृण गोवंश कत्तलीतील अज्ञात आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यात होत असलेल्या गोहत्या आणि गोतस्करी तात्काळ बंद व्हावी, यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, गोरक्षक, गोप्रेमी यांनी पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या कार्यालयावर २४ जून या दिवशी धडक दिली. जिल्ह्यात  होत असलेल्या गोतस्करी आणि गोहत्येवर कोणतेही नियंत्रण पोलीस प्रशासनाचे राहिलेले नाही, असे फणसवळे येथील घटनेवरून दिसत आहे.

गोमाता राज्यमाता म्हणून घोषित झाली; तरी ही राज्यमाता सुरक्षित झालेली नाही, तिची सरेआम कत्तल होत आहे. या सर्वांना उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न समस्त हिंदूंनी पोलीस अधीक्षकांसमोर उपस्थित केला. यावर उत्तर देतांना पोलीस अधीक्षक नितिन बगाटे यांनी जिल्ह्यात त्यांच्या नियुक्तीनंतर झालेली कारवाईची माहिती दिली. सदर घटनेसंदर्भात मी स्वतः जातीने लक्ष घातले असून थोड्याच दिवसांत तुम्हाला त्याच्या परिणाम दिसेल, असे सांगितले. या वेळी उपस्थित गोहत्या आणि गोतस्करी थांबवण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्याची मागणी केली असता ‘अशा पथकाची निर्मिती करू’, असे आश्वासन पोलीस अधीक्षक बगाटे यांनी दिले. या वेळी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फणसवळे गावच्या तांबड्याचा पर्‍या येथील कातळमय भागात अज्ञात समाजकंटकांनी अत्यंत क्रूरपणे अनुमाने ४ गोवंश जनावरांची कत्तल केल्याची धक्कादायक घटना २१ जून २०२६ या दिवशी उघडकीस आली आहे. ही कत्तल दोन दिवस आधी झाली असल्याचा अंदाज असून अनुमाने दीड टन गोमांस सापडले आहे. या संदर्भात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

२. हिंदु समाजात अत्यंत पवित्र मानल्या जाणार्‍या गोवंशाचे असे छिन्नविच्छिन्न अवशेष उघड्यावर टाकून हिंदु समाजाच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा आणि परिसरातील सामाजिक शांतता बिघडवण्याचा हा पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. गोवंशियांचे अवशेष ज्या पद्धतीने उघड्यावर टाकण्यात आले, त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला.

३. रत्नागिरीसारख्या शांत आणि सुसंस्कृत जिल्ह्यात अशा प्रकारे कायद्याची कोणतीही भीती न बाळगता गोवंशियांची कत्तल होणे अत्यंत चिंताजनक आहे. या आधीही रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशियाच्या कत्तली झाल्याच्या, गोमांस सापडल्याच्या अनेक घटना घडल्या असून गोवंशियांची अवैध वाहतूक (गोतस्करी) अद्यापही चालूच असल्याचे निदर्शनास येत आहे. यावरून गोतस्कर आणि गोवंश हत्यारे यांना पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे समस्त हिंदु समाजात तीव्र असंतोष आणि संतापाची लाट उसळली आहे.

४. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा पोलिसांनी तात्काळ युद्धपातळीवर शोध घेऊन त्यांना अटक करावी. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियमाच्या अंतर्गत लावण्यात आलेल्या कलमांनुसार जलद गती न्यायालयात (Fast Track Court) खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी शासनाने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी. रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध पशू वाहतूक आणि गोवंश कत्तलीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करावी आणि पोलीस प्रशासनाला कडक निर्देश देण्यात यावेत. या गुन्ह्यातील आरोपींवर मकोका कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. पोलीस तपास नाक्यांत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसह वाढ करावी.

५. जर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली नाही, तर समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, विश्वमंगल गोशाळा, सोमेश्वर, गो सेवा संघ रत्नागिरी,भाजपा, मनसे यांचे प्रतिनिधी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गोरक्षक, गोसेवक मोठ्या संखेने उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

गोवंशियांची हत्या करणार्‍यांवर कारवाई करा, अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून हे केव्हा करणार ?