सनातनचे ५३ वे संत पू. (कै.) सीताराम देसाई (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग आणि देहत्यागानंतरचा सूक्ष्मातील प्रवास यांचे सुश्री मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘२३ ऑक्टोबर २०२५ या दिवशी सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई (वय ८४ वर्षे) यांनी देहत्याग केला. देवाच्या कृपेने त्यांचा देहत्याग आणि त्यानंतर त्यांचा सूक्ष्मातील प्रवास यांच्या संदर्भात माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहेत.  ३.११.२०२५ या दिवशी या सूक्ष्म-परीक्षणाचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

या लेखाचा भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/972946.html

पू. (कै.) सीताराम देसाई

४. पू. (कै.) देसाईआजोबांचा पिवळ्या रंगाच्या ज्योतीच्या रूपातील शिवमय झालेला लिंगदेह हरि आणि हर यांचा दूत भक्तशिरोमणी हनुमान याने जनलोकात घेऊन जाणे

पू. देसाईआजोबांना शिवाच्या कृपेमुळे वैराग्य, श्री दत्तात्रेयांच्या कृपेमुळे गुरुकृपा आणि देवीच्या कृपेमुळे संपन्नता लाभली होती. त्यांच्यावरील शिवकृपेमुळे त्यांचा लिंगदेह घेऊन जाण्यासाठी ११ वा रुद्र, म्हणजे भक्तशिरोमणी हनुमान हा हरि आणि हर (शिव) यांचा दूत बनून आला होता. पू. आजोबांनी देहत्याग केल्यावर त्यांच्या आज्ञाचक्रातून पिवळ्या रंगाची दिव्य ज्योत बाहेर पडली. पू. आजोबा अखंड शिवदशेत होते. त्यामुळे त्यांच्या लिंगदेहाची ही पिवळी ज्योत म्हणजे त्यांचा शिवमय झालेला दिव्य लिंगदेह होता. हनुमानाने ही दिव्य ज्योत त्याच्या ओंजळीत घेऊन भूलोकातून जनलोकाकडे प्रयाण केले.

५. गरुड आणि हनुमान यांनी पू. देसाईआजोबांच्या ज्योतीस्वरूप शिवमय लिंगदेहावर सूक्ष्मातून आक्रमणे करणार्‍या विविध अनिष्ट शक्तींच्या शस्त्रास्त्रांशी सूक्ष्मातून युद्ध करणे अन् पू. आजोबांचा ज्योतीस्वरूप लिंगदेह जनलोकात सुखरूपपणे पोचवणे

पू. आजोबांच्या ज्योतीस्वरूप लिंगदेहाचा ‘पृथ्वी ते जनलोक’ हा सूक्ष्मातील प्रवास चालू असतांना त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाताळातील मोठ्या अनिष्ट शक्तींनी नागपाश टाकला. तेव्हा विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या सेवेत असलेले त्यांचे वाहन गरुड याला पू. आजोबांच्या शिवमय लिंगदेहाचे रक्षण करण्यासाठी पाठवले. गरुडाने नागपाशातील नागांशी सूक्ष्मातून युद्ध करून त्यांना नष्ट केले. त्यानंतर पाताळातील अनिष्ट शक्तींनी पू. आजोबांच्या शिवमय लिंगदेहाच्या दिशेने विविध अस्त्रे सोडली. तेव्हा हनुमानाने त्याच्या गदेच्या मारक प्रहाराने ती सर्व अस्त्रे विफल केली आणि त्यानंतर त्याने मनाच्या वेगाने जनलोकापर्यंतचा प्रवास पूर्ण करून तेथे पू. देसाईआजोबांचा शिवमय लिंगदेह ज्योतीस्वरूपात सुखरूपपणे पोचवला.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

६. पू. (कै.) देसाईआजोबांच्या हलणार्‍या ज्योतीस्वरूप लिंगदेहाला जनलोकातील सनकादी कुमारांच्या सत्संगातील चैतन्यमय ज्ञान लाभल्यावर पू. आजोबांचा ज्योतीस्वरूपातील लिंगदेह स्थिर होणे

पू. (कै.) देसाईआजोबांचा शिवमय लिंगदेह ज्योतीस्वरूपात जनलोकात पोचला. तेव्हा तेथे ‘सनक, सनातन, सनंदन आणि सनत्कुमार’ हे जनलोकातील ऋषिमुनी अन् संत यांना भागवतकथा सांगून त्यांचा सत्संग घेत होते. पू. आजोबांच्या लिंगदेहाचा ‘पृथ्वी ते जनलोक’ हा प्रवास चालू असतांना त्यांचा लिंगदेह थोडा विचलित झाला होता. त्यामुळे त्यांचा ज्योतीस्वरूप लिंगदेह सतत हलत होता. त्यांना जनलोकातील सनकादी कुमारांच्या सत्संगातील चैतन्यमय ज्ञान लाभल्यावर त्यांचा ज्योतीस्वरूपातील लिंगदेह स्थिर झाला.

७. पू. (कै.) देसाईआजोबांच्या लिंगदेहाचे जनलोकातील ऋषिमुनी आणि संत यांच्या शिवमय लिंगदेहांनी स्वागत करणे अन् त्यानंतर सनकादी कुमारांनी पू. आजोबांच्या ज्योतीस्वरूपातील लिंगदेहाला एका पिवळसर रंगाच्या ज्ञानकमळावर स्थापन करणे

पू. (कै.) देसाईआजोबांच्या लिंगदेहाच्या शुभागमनाने जनलोकातील ऋषिमुनी आणि संत यांच्या शिवमय लिंगदेहांना आनंद झाला. त्यांनी आनंद प्रक्षेपित करणार्‍या गुलाबी रंगाच्या दैवी फुलांचा वर्षाव पू. आजोबांच्या शिवमय लिंगदेहस्वरूपी पिवळ्या ज्योतीवर करून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सनकादी कुमारांनी जनलोकातील एका पिवळसर रंगाच्या ज्ञानमय कमळावर पू. देसाईआजोबांचा पिवळ्या रंगातील ज्योतीस्वरूप लिंगदेह ठेवला. त्यानंतर सनकादी कुमारांनी पू. देसाईआजोबांना भक्तीयोगानुसार श्रीकृष्णाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप अखंड करायला आणि ध्यानातून भगवंताच्या अनुसंधानात रहायला सांगितले. त्यानुसार पू. देसाईआजोबांचा लिंगदेह कमलासनावर विराजमान होऊन अखंड नामसमाधीत मग्न झाला; कारण ते सामान्य कमलासन नसून एकप्रकारचे सिद्धासन होते. सिद्धासनावर बसून केलेली साधना सिद्ध होऊन ती १०० टक्के फलद्रूप होते. अशा प्रकारे या कमलासनरूपी सिद्धासनावर विराजमान झालेल्या पू. देसाईआजोबांची ही नामसमाधी पुढील ३६ वर्षे, म्हणजे ३ तप अखंड चालू रहाणार आहे.

८. पू. (कै.) देसाईआजोबांनी मागील १३ जन्मांमध्ये विविध योगमार्गांनी केलेल्या साधनेची वैशिष्ट्ये ! 

टीप १ – पू. (कै.) देसाईआजोबांनी मागील १३ जन्मांमध्ये ‘कर्मयोग, भक्तीयोग आणि ध्यानयोग’ या तिन्ही योगांच्या संमिश्र योगानुसार व्यष्टी स्तरावरील साधना करून ते उत्तम शिष्य झाले. त्यांच्या १४ व्या जन्मात त्यांच्यातील शिष्यत्वामुळे त्यांच्यावर गुरुतत्त्वाने गुरुकृपा केली. त्यामुळे पू. आजोबांनी गुरुकृपायोगांतर्गत कर्मयोग, भक्तीयोग आणि ध्यानयोग यांनुसार व्यष्टी-समष्टी साधना करून संतपद प्राप्त केले.

टीप २ – पू. (कै.) देसाईआजोबांनी उतारवयातही सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून गुरुकृपायोगांतर्गत व्यष्टी आणि समष्टी साधना अधिकाधिक तळमळीने अन् भावपूर्ण केली. त्यामुळे ते साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यासाठी ठरलेल्या वेळेच्या आधीच येऊन नाम घेत ध्यान लावत होते.

टीप ३ – पू. देसाईआजोबांकडून प्रक्षेपित झालेल्या तारक-मारक दैवी शक्तीमुळे त्यांच्या संपर्कात येणार्‍या साधकांना चैतन्य मिळून साधकांच्या भोवती असणारे रज-तमप्रधान त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होत होते. ही अनुभूती अनेक साधकांना येत होती.

टीप ४ – पू. देसाईआजोबांकडून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे त्यांच्या संपर्कात येणार्‍या साधकांना चैतन्य मिळून त्यांच्या मनाचा उत्साह वाढत होता. त्यामुळे साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी नवचेतना प्राप्त होत होती.’

(क्रमशः)

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक २४.१०.२०२५ आणि ते टंकलेखन करण्याची वेळ दुपारी ३ ते ३.१५ )

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/974617.html