‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !

‘साधकाचा प्रवास स्वेच्छेकडून परेच्छेकडे नंतर ईश्वरेच्छेकडे असावा !’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मवाक्यानुसार आचरण करण्याची संधी मला संहिता (स्क्रिप्ट) लेखन सेवेच्या माध्यमातून मिळाली. कोरोना महामारीच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सत्संग उपक्रमाच्या अंतर्गत संहिता लेखन सेवा करण्याची मला संधी मिळाली. ‘गुरुकृपा हेच धन आणि ते वाढवण्यासाठी गुरूंना अपेक्षित अशी साधना करणे अन् गुरूंनी दिलेली शिकवण आपल्या आचरणात येत आहे ना ?’, यानुसार माझे निरीक्षण चालू झाले. या सेवेच्या आरंभापासूनच देवाने मला सतत ‘शिकणे, स्वीकारणे आणि ऐकणे’ या स्थितीत रहाण्याविषयी आतूनच सतर्क केले होते. त्याविषयीची सूत्रे येथे दिली आहेत. 

सौ. ज्योत्स्ना नारकर

१. आरंभी साधिकेला उत्तरदायी साधकांनी सेवेत सांगितलेले पालट स्वीकारता न येणे आणि नंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने साधिका अंतर्मुख होणे

काही वर्षांपूर्वी मला दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांचे ‘इंग्रजी भाषांतर करणे’ ही सेवा करण्याची संधी मिळाली होती. उत्तरदायी साधकांनी त्या सेवेत संकलनाच्या दृष्टीने एखादा पालट सांगितला, तर तो मला मनापासून स्वीकारता येत नसे. मला समजावून सांगण्यासाठी उत्तरदायी साधकांना वेळ द्यावा लागत असे. नंतर गुरुकृपेने माझीच अंतर्गत प्रक्रिया होऊन ‘माझ्या साधनेचा प्रवास कोणत्या दिशेने होत आहे’, याविषयी गुरुदेवांनी मला अंतर्मुख केले. ‘या सेवेतून माझ्यात स्वीकारण्याची, शिकण्याची आणि ऐकण्याची वृत्ती वाढत आहे ना ?’, हे माझ्या साधनेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. भाषांतर सेवा हे केवळ माध्यम आहे’, हे माझ्या लक्षात आले.

२. सेवेतील एका टप्प्यावर निर्णय घेता न आल्याने ती सेवा उत्तरदायी साधकांना सांगणे आणि त्यांनी सांगितलेले पालट भावपूर्ण करणे

सौ. गौरी कुलकर्णी या माझ्या उत्तरदायी साधिका होत्या. ‘त्यांचे साहाय्य घेऊन गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करूया’, असा माझा विचार नेहमीच असायचा. मला संहितेसाठी निवडलेली सगळीच सूत्रे महत्त्वाची वाटायची. त्यामुळे संहिता मोठी व्हायची. ‘कुठली सूत्रे काढू ?’, याचा निर्णय मला घेता येत नव्हता. त्या वेळी ‘‘उत्तरदायी साधिकेला तुम्हीच संहिता अंतिम करून पाठवा’’, असे मी सांगायचे. त्या वेळी ‘उत्तरदायी साधक, म्हणजे गुरुदेव सांगत आहेत’, या भावाने मी त्यांनी सांगितलेले पालट करत असे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

३. फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे

एका सत्संगात उत्तरदायी साधिकेने साधकांच्या सेवेच्या फलनिष्पत्तीचे सूत्र सांगितले. त्या वेळी त्या ‘कोणत्या संहितेला किती वेळ लागला ?’, हे सांगत असत. उत्तरदायी साधिकेने त्या संहितेत सुधारणा करायला सांगितल्यावर मला त्यासाठी वेळ द्यावा लागत असे. त्यामुळे माझ्याकडून ती सेवा ठरलेल्या समयमर्यादेत पूर्ण होत नव्हती.

३ अ. संहिता अंतिम करण्याविषयी मनात उत्तरदायी साधिकेविषयी येणार्‍या नकारात्मक विचारांवर गुरुकृपेने सकारात्मक विचार येऊन त्यावर मात करता येणे : मला संहिता अंतिम करूनच पाठवायला सांगितल्यावर माझ्या मनात अयोग्य विचार यायचा, ‘गौरीताई स्वतःकडे संकलनाची सेवा आहे’, असे मला सांगते; मात्र मलाच संहिता अंतिम करून द्यायला लागते.’, त्याच क्षणी ‘ताई मला सेवेतील पुढच्या टप्प्यात नेत आहे. ती मला सेवेच्या दृष्टीने घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे’, असा सकारात्मक विचार येऊन तिच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत असे.

४. ‘उत्तरदायी साधिका सांगत असल्याप्रमाणे कृती केली, तर साधनेच्या दृष्टीने लाभ होईल’, हा विचार गुरुकृपेने मनात असणे

संहिता अंतिम करून पाठवण्याची सिद्धता सौ. गौरीताईनेच माझ्याकडून करून घेतली. या सेवेच्या माध्यमातून माझ्यामध्ये सेवेच्या दृष्टीने शिकण्याच्या वृत्तीत वाढ होत होती. हे केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते. ‘सौ. गौरीताई उत्तरदायी साधिका असल्याने ती सांगते त्याप्रमाणे मी केले, तर मला साधनेच्या दृष्टीने लाभ होईल’, हा एकच विचार गुरुकृपेने माझ्या मनात असायचा.

५. गुरुकृपेने सेवेशी एकरूपता वाढून कोणत्याही परिस्थितीत सेवा समयमर्यादेत पूर्ण करण्याचा ध्यास असणे

काही वेळा ‘दिलेली सेवा समयमर्यादेत होईल कि नाही ?’, याचा मला ताण असायचा. एकदा मी सौ. गौरीताईला माझी अडचण सांगितल्यावर तिने ‘इतर काही नियोजन करायचे का ?’, असे मला विचारले. तेव्हा ‘या सेवेपासून वंचित होऊ नये’, यासाठी स्वतःची पूर्ण क्षमता वापरून रात्री जागूनही सेवा पूर्ण करण्यासाठी माझे आटोकाट प्रयत्न व्हायचे. गुरुकृपेने सेवेशी एकरूपता इतकी वाढली होती की, कोणत्याही परिस्थितीत सेवा समयमर्यादेत पूर्ण करण्याचा मला ध्यास असायचा.

६. उत्तरदायी साधिकेने पालट केल्याचे लक्षात आल्यावर स्वतःच्या मतावर ठाम न रहाता स्वतःतील स्वीकारण्याची वृत्ती वाढण्यासाठी प्रयत्न करणे आणि उत्तरदायी साधिकेने सांगितलेले दृष्टीकोन स्वीकारणे

कधी कधी ‘मी लिहिलेल्या उदाहरणांऐवजी दुसरे उदाहरण किंवा स्वयंसूचना संहितेत घेतली आहे’, असे माझ्या लक्षात यायचे. त्या वेळी स्वतःच्या मतावर ठाम न रहाता ‘माझ्यातील स्वीकारण्याची वृत्ती वाढावी’, यासाठी मी प्रयत्न करत असे. संहिता लिहितांना वक्त्याला दिलेल्या वेळेनुसार ‘किती वेळासाठी, किती पानी लिखाण असायला हवे’, याविषयी काही नियम आहेत. एखाद्या संहितेचे लिखाण वाढल्याचे लक्षात आल्यावर मी त्वरित गौरीताईला सांगत असे. तिने दिलेला दृष्टीकोन मी तत्परतेने स्वीकारत असे.

७. गुरुकृपेने संहिता लेखन सेवेच्या माध्यमातून शरणागत भाव वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करणे

सौ. गौरीताईला संहिता सेवेतील साधकांना घडवण्याची पुष्कळ तळमळ आहे. ती मला आणि कोल्हापूर येथील साधक श्री. अमोल कुलकर्णी यांना संहितांचे नवे-जुने करायला अनेक वेळा सांगत असे; मात्र माझ्या इतर सेवांच्या व्यस्ततेत या आवश्यक सूत्राकडे माझे दुर्लक्ष होत असे. संहितेचे नवे-जुने करतांना अनेक नवीन सूत्रे शिकायला मिळून स्वतःच्या मनाचा अभ्यास करता आला. ‘आमच्या सेवेची गती वाढावी, अल्प कालावधीत आमच्या सेवेची फलनिष्पत्ती वाढावी’, असा सौ. गौरीताईचा हेतू असायचा. आमच्या सेवेची फलनिष्पत्ती वाढण्यासाठी ती एक प्रकारे आमच्याकडून शरणागतभाव वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करून घेत होती. ताई तिच्याकडे असलेल्या अंगभूत कौशल्यांचा कुठेही उल्लेख करत नाही.

८. ‘आमच्याकडून संहिता लेखनाची सेवा होणे’, हा या सेवेतील साधकांमधील संघभावाचा परिणाम आणि आम्ही अनुभवलेली गुरुकृपा आहे. एकंदरीत या सगळ्या प्रक्रियेत देवाला मी घडणे अपेक्षित होते. ‘उत्तरदायी साधकाच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत आहे’, असा भाव ठेवणे आवश्यक आहे, हे माझ्या लक्षात आले.

९. संहिता लेखन सेवेच्या संदर्भात होणार्‍या प्रत्येक सत्संगातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले समजून घेऊन साधिकेवर प्रेम आणि चैतन्य यांचा वर्षाव करत असणे

संहिता लेखन करणारे साधक एकत्रित विचारविनिमय करत असत. त्यातून मला सेवेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभत होती. त्या वेळी मला अडचणी मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळत होती आणि त्यामुळे अडचणींवर मार्ग सापडून सेवेतील उत्साह टिकून रहाण्यास साहाय्य होत होते. ‘सेवेच्या संदर्भात होणार्‍या प्रत्येक सत्संगातून गुरुदेव मला समजून घेऊन माझ्यावर प्रेम आणि चैतन्य यांचा वर्षाव करत असून साधना करण्यासाठी पुष्कळ प्रोत्साहन देत आहेत’, हे मला अनुभवता आले.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संहिता लेखन सेवेच्या माध्यमातून मला शिकण्याच्या स्थितीत आणि सकारात्मक ठेवले’, त्याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर (वय ६४ वर्षे), पडेल, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग. (२७.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक