‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई, २५ जून – राज्याच्या कृत्रिम बुद्धीमत्ता प्रारूपाद्वारे ज्ञानाधारित आणि माहिती-आधारित कारभार उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ‘महासारथी’ सुविधेमुळे एकात्मिक माहिती भांडार निर्माण होऊन योजनांची नेमकी कार्यवाही होईल, लाभार्थ्यांची दुहेरी नोंद टाळणे आणि गैरवापर रोखणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यातील नागरिकांना सेवा अधिक जलद आणि सुलभ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानभवन येथे ‘महासारथी’, तसेच ‘महाडीबीटी २.०’ यांचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सेवाकेंद्रांचे मानकीकरण, डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) आणि राज्याच्या एआय प्रारूपाचे (मॉडेलचे) लोकार्पण या वेळी करण्यात आले.

‘महाडीबीटी २.०’अंतर्गत सर्व विभागांच्या योजना एकाच व्यासपिठावर येणार आहेत. यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होऊन नागरिकांचा वेळ आणि कष्ट वाचतील. शिष्यवृत्ती आणि अन्य इतर योजना यांतील भ्रष्टाचाराला ‘प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण प्रणाली’मुळे आळा बसू शकेल. डिजिटल हयातीच्या दाखल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता रहाणार नाही.