‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू

ग्रामविकास समितीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळाले यश  

उद्वाहन उभारणीचे काम चालू

राजापूर, २५ जून (वार्ता.) – तालुक्यातील एकमेव महत्त्वाचे असलेले आणि खोलगट भागात वसलेले ‘राजापूर रोड’ या रेल्वेस्थानकात प्रवाशांना प्रतिदिन चढ-उतार करतांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, विकलांग (दिव्यांग), तसेच आजारी प्रवासी यांना सामानासह ये-जा करतांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या स्थानकात उद्वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रवासी आणि ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येत होती. या मागणीसाठी पंचक्रोशी ग्रामविकास समितीने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

अंतत: कोकण रेल्वे प्रशासनाने उद्वाहन उभारणीचे काम चालू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी उद्वाहनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

१. पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे प्रशासकीय प्रमुख आदिनाथ कपाळे यांनी कोकण रेल्वे प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.

२. श्री. कपाळे यांच्या प्रयत्नांना यश येत अनुमाने ६० लाख रुपयांच्या निधीतून उद्वाहन उभारणीस संमती मिळाली. निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली होती; मात्र प्रत्यक्ष काम चालू होण्यास विलंब झाला आहे.

३. राजापूर रोड रेल्वेस्थानकात कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी, तसेच उधना आणि मडगाव-नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा असल्याने येथे प्रतिदिन मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे उद्वाहनाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर होणार आहे.

संपादकीय भूमिका

  • भौगोलिक रचनेवरून रेल्वे प्रशासनाने अशी स्थानके बांधतांना ज्येष्ठ, दिव्यांग किंवा आजारी व्यक्तींच्या सुलभ दळणवळणाचा विचार आधीच का केला नाही ? जनतेने उद्वाहनाची सातत्याने मागणी केल्यानंतर अनेक वर्षांनी ते काम चालू होते, हे प्रशासनाला लज्जास्पदच होय !  
  • लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन यांच्या पुढाकाराने नव्हे, तर स्वतःच्या सुविधांसाठी जनतेलाच सातत्याने संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैव !