(म्हणे) ‘भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही ! – Donald Trump

अमेरिकेचे भ्रमिष्ट राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे विधान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत. आमचे पुष्कळ चांगले संबंध आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याकारणाने मी खूश नव्हतो; पण आज त्यांनी (पंतप्रधान मोदी यांनी) मला आश्वासन दिले की, ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. जरी ते त्वरित थांबवू शकत नसले, तरी एक प्रक्रिया आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल. आता आपल्याला चीनलाही तेच करायला लावावे लागेल, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत केले. अमेरिकेने ऑगस्ट २०२५ मध्ये भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने त्याच्यावर २५ टक्के अतिरिक्त कर लादला आहे. यापूर्वी अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात शुल्क लादले होते. त्यामुळे भारतावर एकूण ५० टक्के कर लादला गेला आहे.

ट्रम्प पुढे म्हणाले की, अलीकडेच भारतात अमेरिकेचे राजदूत होणारे सर्जियो गोर आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली होती. या भेटीनंतर सर्जियो यांनी मला सांगितले की, त्यांना (मोदींना) ट्रम्प आवडतात, जरी मी येथे ‘प्रेम’ या शब्दाचा चुकीचा अर्थ लावू इच्छित नाही, तरी मला कुणाचीही राजकीय कारकीर्द बिघडवायची नाही.

  • ट्रम्प यांच्या विधानावर भारताचे स्पष्टीकरण

  • भारत तेल आणि वायू यांचा एक प्रमुख खरेदीदार असल्याने सार्वजनिक हितांचे रक्षण करणे, हे आमचे प्राधान्य !  

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

ट्रम्प यांच्या विधानावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘भारत रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करणार कि नाही ?’, यावर थेट उत्तर न देता ‘भारत सर्वांकडून तेल खरेदी करतो’, असे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘‘भारत तेल आणि वायू यांचा एक प्रमुख खरेदीदार आहे. सार्वजनिक हितांचे रक्षण करणे, हे आमचे प्राधान्य आहे. आमच्या आयात धोरणांमुळे हे उद्दिष्ट साध्य होते. ऊर्जा धोरणाची दोन उद्दिष्टे आहेत. पहिले म्हणजे स्थिर किमती राखणे आणि दुसरे सुरक्षित पुरवठा राखणे. हे करण्यासाठी आम्ही आमचे ऊर्जा स्रोत विस्तृत करतो आणि बाजारातील परिस्थितीनुसार विविधता आणतो. अमेरिकेविषयी आम्ही अनेक वर्षांपासून आमच्या ऊर्जा खरेदीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या दशकात याविषयी एक स्थिर प्रगती आहे. अमेरिकी प्रशासनाने भारतासमवेत ऊर्जा सहकार्य वाढवण्यात रस दाखवला आहे आणि त्याविषयी चर्चा चालू आहे.’’

अमेरिकेचा विरोध का आहे ?

रशियावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. ट्रम्प यांनी वारंवार दावा केला आहे की, रशिया भारताच्या तेल खरेदीतून मिळणार्‍या पैशातून युक्रेनमधील युद्धाला वित्तपुरवठा करतो. रशियाकडून तेल खरेदी केल्याकारणाने भारताविरुद्ध केलेल्या आर्थिक कारवाईचे समर्थन ट्रम्प प्रशासन दंड किंवा शुल्क म्हणून करत आहे.


आम्ही भारतासाठी एक पुष्कळ चांगला पर्याय आहोत ! – रशियाचे उत्तर

रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह

डॉनल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर रशियानेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह म्हणाले, ‘‘भारताच्या अर्थव्यवस्थेला रशियाच्या तेलाची नक्कीच आवश्यकता आहे. विशेष म्हणजे भारत आणि रशिया यांची एक विश्वासार्ह भागीदारी राहिली आहे. भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातींपैकी एक तृतीयांश आयात रशियाकडून केली जाते. आम्ही भारतासाठी एक पुष्कळ चांगला पर्याय आहोत. रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी जगात स्थिरता आणणारी एक अत्यंत मोठी शक्ती म्हणून पाहिली जाते. मुळात म्हणजे हे नाते भक्कम स्थितीत उभे आहे. ऊर्जा क्षेत्रामध्ये आम्ही भारताचे मोठे भागीदार आहोत.’’

मोदी ट्रम्प यांना विरोध करत नाहीत  ! – राहुल गांधी यांची टीका

ट्रम्प यांच्या विधानानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. त्यांनी ‘एक्स’वर म्हटले की, ट्रम्प यांना निर्णय घेऊ द्या आणि भारत रशियाचे तेल खरेदी करणार नाही, हे घोषित करू द्या. वारंवार दुर्लक्षित करूनही मोदी ट्रम्प यांना अभिनंदनाचे संदेश पाठवत रहातात. मोदी ‘ऑपरेशन सिंदूर’वरील ट्रम्प यांच्या विधानांनाही विरोध करत नाहीत.

सत्तेत असतांना पाक, चीन आणि अमेरिका यांच्यासमोर सातत्याने शेपूट घालणारी गांधीवादी काँग्रेस म्हणते, ‘मोदी एक दुर्बल पंतप्रधान !’

काँग्रेसने म्हटले आहे की, परस्पर मैत्री सुधारण्यासाठी राष्ट्रीय संबंधांना हानी पोचवू नका. नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली आहे. ट्रम्प यांच्या मते त्यांचा राग आणि धमक्या यांच्यापुढे झुकून मोदी यांनी आश्वासन दिले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. एक गोष्ट स्पष्ट आहे की, नरेंद्र मोदी हे एक दुर्बल पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या कृतींमुळे देशाचे परराष्ट्र धोरण अस्थिर झाले आहे.