नवीन घाटांची कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आदेश

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभपर्वाच्या विकासकामांचा आढावा

नाशिक – येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभपर्व होत आहे. या कालावधीत येणार्‍या भाविकांसाठी ठिकठिकाणी नदीच्या काठावर घाट बांधण्यात येत आहेत. या घाटांचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करावे, असा आदेश जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली कुंभपर्वाच्या विकासकामांची आढावा बैठक झाली. येथील विकासकामांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.

अधिकार्‍यांनी क्षेत्रीय भेटी द्याव्यात. रस्त्यांची कामे लवकर पूर्ण होतील, असे नियोजन करावे. साधूग्राम, नाशिक परिक्रमा मार्ग, द्वारका सर्कल, रामकाल पथ, त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथ, ओझर विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला गती द्यावी. या सर्व कामांचा लवकरच आढावा घेण्यात येईल, असे डवले यांनी या वेळी सांगितले.

या वेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी नाशिक प्रदक्षिणा मार्गासाठी चालू असलेल्या भूसंपादनाविषयी माहिती दिली. विशेष पोलीस महानिरीक्षक ऐनपुरे आणि पोलीस आयुक्त कर्णिक यांनी विविध सूचना केल्या. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती खत्री, तसेच विविध विभागाचे अभियंते यांनी विविध विकासकामांची सद्य:स्थिती सांगितली.