Elon Musk : इलॉन मस्क बनले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ !

स्वत:च्या ‘स्पेसएक्स’ आस्थापनाच्या यशस्वी ‘आयपीओ’मुळे गाठला टप्पा

(आयपीओ म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफरिंग, म्हणजेच एखादे खासगी आस्थापन पहिल्यांदाच स्वतःचे समभाग जनतेला विकून भांडवल उभे करते, ती प्रक्रिया.)

(ट्रिलियनेअर म्हणजे १ सहस्र अब्ज अमेरिकी डॉलर असलेली व्यक्ती)

इलॉन मस्क

न्यूयॉर्क (अमेरिका) – ‘स्पेसएक्स’च्या प्रचंड यशस्वी ‘इनिशिअल पब्लिक ऑफरिंग’मुळे त्याचे मालक इलॉन मस्क यांच्या व्यावसायिक साम्राज्याचे मूल्य १ ट्रिलियन अमेरिकी डॉलर, म्हणजेच तब्बल ९५ लाख कोटी रुपये झाले आहे. यामुळे ते जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ झाले आहेत. १ सहस्र अब्जाधीश (१ अब्ज अमेरिकी डॉलर मालमत्ता असलेले १ सहस्र लोक) बरोबर एक ट्रिलियनेअर होत.

११ जूनला ७५ अब्ज डॉलर उभारणार्‍या या विक्रमी समभाग विक्रीमुळे ‘स्पेसएक्स’चे मूल्य गगनाला भिडले. हे आस्थापन खासगी रॉकेट आणि सॅटेलाइट (उपग्रह) यांची निर्मिती करते. जेव्हा आस्थापनाच्या समभागांची प्रत्यक्ष खरेदी-विक्री चालू होईल, तेव्हा मस्क यांची एकूण संपत्ती १.१ ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. ‘आयपीओ’ होण्यापूर्वीही मस्क यांची एकूण मालमत्ता ७८० अब्ज डॉलर होती. त्यांच्या खालोखाल श्रीमंत असलेल्या ‘अल्फाबेट’चे सह-संस्थापक लॅरी पेज यांची संपत्ती अनुमाने ३०० अब्ज डॉलर आहे. याचा अर्थ मस्क हे पेज यांच्यापेक्षा तिप्पट श्रीमंत आहेत.