
पिंपरी – दुबई आणि थायलंड येथून सायबर फसवणुकीचे जाळे चालवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. इंटरपोलच्या ‘रेड कॉर्नर नोटीस’ (अटक वॉरंट) आणि ‘लुकआऊट सर्क्युर’च्या (नजर ठेवण्याच्या परिपत्रकाच्या) साहाय्याने थायलंडमधील बँकॉक विमानतळावर सौरभ उपाख्य गणेश काळे याला कह्यात घेण्यात आले. त्यानंतर भारतात आणून त्याला अधिकृत अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी कारवाई केली आहे. याच्या अटकेमुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक मोठ्या सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यात प्रविष्ट झालेल्या ‘ऑनलाईन टास्क फ्रॉड’च्या अन्वेषणातून हे आंतरराष्ट्रीय जाळे उघडकीस आले. जून २०२४ मध्ये या प्रकरणात १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. चौकशीच्या वेळी मुख्य सूत्रधार गणेश काळे दुबई येथून संपूर्ण यंत्रणा चालवत असल्याचे समोर आले आहे.
काळे भारतातील व्यक्तींकडून बँक खाती, ए.टी.एम्. कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड मिळवत होता. त्याबदल्यात त्याला पैसे दिले जात होते. या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम वळवण्यासाठी केला जात होता. त्याने दुबईत स्वतंत्र कार्यालयही उभारले होते. तांत्रिक अन्वेषणात आरोपीचे चीनसह इतर विदेशी नागरिकांशी संबंध आहेत. टास्क फ्रॉड, शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक आणि डिजिटल अरेस्टसारख्या गुन्ह्यांमधून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. हिंजवडीतील १८ लाख रुपयांच्या आणि सायबर पोलीस ठाण्यातील २ कोटी ६६ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातही त्याचा सहभाग आढळला होता.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती