एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !

महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी महामंडळाचा मोठा निर्णय !

प्रतिकात्मक इमेज

मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १ ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एन्.सी.एम्.सी. कार्ड वापरणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस्.टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. महामंडळाच्या सेवांमध्ये पारदर्शकता आणणे आणि डिजिटल व्यवहारांना चालना देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

राज्यभरात या ‘कार्ड’च्या नोंदणीला वेग आला असून आतापर्यंत ५१ लाख नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २५ लाख कार्ड कार्यान्वित झाले आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यभरात ४ सहस्रांहून अधिक वितरण केंद्रे चालू करण्यात आली आहेत. ‘शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ विनाअडथळा मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी ‘स्मार्ट कार्ड’ मिळवावे’, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक पैसे मागणार्‍या केंद्रांवर होणार कारवाई !

‘स्मार्ट कार्ड’ वितरण प्रक्रियेत अपव्यवहार खपवून घेतला जाणार नाही’, अशी चेतावणी मंत्री सरनाईक यांनी दिली आहे. ‘जे केंद्रचालक प्रवाशांकडून निश्चित शुल्काहून अधिक पैशांची मागणी करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांचा वितरण परवाना तातडीने रहित केला जाईल’, असेही त्यांनी सांगितले.