देवस्थाने सुरक्षित राखण्यासाठी विश्वस्तांची प्रभावी एकजूट आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र्र मंदिर महासंघाच्या वतीने दापोली येथे मंदिर परिषद !

डावीकडून श्री. सुरेश शिंदे, सद्गुरु सत्यवान कदम, श्री. सुरेश रेवाळे आणि बोलतांना श्री. रमेश शिंदे

दापोली, १३ जून (वार्ता.) – वर्ष २००७ मध्ये महाराष्ट्र्रातील साधारणतः ४ लाख मंदिरे तत्कालीन शासनाने एका आदेशाने कह्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया चालू केली होती; मात्र हिंदु जनजागृती समितीने मंदिर विश्वस्त, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांना एकत्र घेऊन राज्यभर लढा दिल्यामुळे तत्कालीन शासनाला तो आदेश मागे घ्यावा लागला होता. आताही महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ या प्रस्तावित कायद्याला स्थगिती दिली आहे, ती महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिर विश्वस्तांच्या माध्यमातून करत असलेल्या विरोधामुळेच होय; मात्र हे संकट पूर्ण गेलेले नाही. सरकार आपले आहे; परंतु त्याहीपेक्षा देवस्थाने आणि मंदिर संस्कृती आम्हाला अधिक जवळची आहे. त्यामुळे मंदिर संस्कृती आणि  देवस्थाने सुरक्षित राखायची असतील, तर विश्वस्तांची प्रभावी एकजूट आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंदिर महासंघाचे मार्गदर्शक श्री रमेश शिंदे यांनी केले. ते दापोली तालुक्यातील जालगाव-ब्राह्मणवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात आयोजित मंदिर परिषदेत बोलत होते. या वेळी दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील ८५ मंदिर विश्वस्त उपस्थित होते.

शंखनाद करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश गुजराथी यांनी केले. प्रस्तावना मंदिर महासंघाचे जिल्हा संघटक श्री. सुरेश शिंदे यांनी केली.

प्रारंभी व्यासपिठावरील मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. सनातनचे धर्मप्रचारक सद्रगुरु सत्यवान कदम यांचा सन्मान तालुक्यातील लाडघर गावाचे अध्यक्ष श्री. सुधीर साळवी यांनी, प्रमुख वक्ते श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार समितीचे श्री. चंद्रकांत उजाळ यांनी, मंदिर महासंघाचे दापोली तालुका संयोजक श्री. सुरेश रेवाळे यांचा सत्कार खेड तालुक्यातील बीजघर देवस्थानाचे विश्वस्त श्री. सुनील भोसले यांनी, तसेच मंदिर महासंघाचे श्री. सुरेश शिंदे यांचा सत्कार मंडणगड तालुक्यातील टाकेडे देवस्थानाचे श्री. अनंत शिंदे यांनी केला.

श्री रमेश शिंदे

रमेश शिंदे म्हणाले की,

१. शासनाच्या प्रस्तावित देवस्थान इनाम निर्मूलन कायद्यात, वक्फ बोर्डाकडे लाखो एकर भूमी असूनही वक्फ बोर्डला वगळले आहे आणि हिंदूंच्या देवस्थानांची भूमी बळकवण्याचा अधिकार दिलेला आहे, हा कसला सेक्युलरवाद ?

२. शासनाने देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याला स्थगिती दिली आहे; मात्र कायदा रहित केलेला नाही. त्यामुळे आता कायदा होणार नाही, अशा भ्रमात रहायला नको. अधिकाधिक मंदिर विश्वस्तांनी या कायद्याच्या विरोधातील अभियान राबवायला हवे.

३. आज जी मंदिरे सरकारच्या कह्यात आहेत. त्यातून धार्मिक परंपरांचे खंडण होत आहे. देवधन, सोने, चांदी, भूमी यांविषयी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे उघड झालेले आहे. त्या संदर्भात न्यायालयीन लढाई चालू आहे.

४. देवस्थानाची भूमी कुणीही बळकावू नये यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ हा कायदा महाराष्ट्रात लागू करावा, याची मागणी मंदिर महासंघांकडून शासनाकडे गेली वर्षभर चालू आहे. गुजरात राज्यात हा कायदा २०२३ पासून लागू झाला आहे. हा कायदा महाराष्ट्रात लागू आहे, तो केवळ वक्फ बोर्डाच्या भूमीच्या रक्षणासाठी ! त्यामुळे हिंदु मंदिरासाठीही ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ महाराष्ट्र्रात लागू व्हावा, यासाठी प्रत्येक मंदिर आणि विश्वस्त यांनी सर्वत्र स्वाक्षरी मोहीम राबवण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

५. देवस्थानाच्या देवरहाटी उतार्‍यावरील देवस्थानाचे नाव खोडून ‘महाराष्ट्र शासन’ नाव लावणे, हे घडत असतांना आपण शांत रहाता कामा नये. मंदिरे आणि धर्म याविषयी जागृत असायला हवे.

मंदिरांचा समृद्ध वारसा जपणे आपले कर्तव्य ! – सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम

मंदिरांचा समृद्ध वारसा जपणे आपले कर्तव्य आहे. प्राचीनकाळी मंदिरे हे धर्मशिक्षणाची केंद्रे होती. त्यामुळे सर्व भेद विसरून हिंदु मंदिरांच्या माध्यमातून संघटित होत असत. जन्महिंदूंना कर्महिंदू करणे, हे मंदिराच्या माध्यमातून होत असे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच आज मंदिरांमध्ये दर्शनासाठी येतांना त्यांचे वागणे पर्यटकांसारखे  झाले आहे. या समस्या लक्षात घेऊनच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती विनामूल्य धर्मशिक्षणवर्ग घेते. सनातन-निर्मित धर्मशिक्षण फलक मंदिरात लावून त्या माध्यमातून भक्तांपर्यंत धर्मशास्त्र पोचेल. धर्मशिक्षणाने आपली श्रद्धा बळकट होईल. यासाठी मंदिरे हे धर्मशिक्षणाची केंद्रे झाली पाहिजेत.

मनोगत

१. श्री. अनंत शिंदे, टेकाडे आणि श्री. रमेश शिंदे, सुरले ता. मंडणगड : या विषयांची जनजागृती गावागावांत झाली पाहिजे. आम्ही तालुक्यातील १२० गावांपर्यंत पोचू.

२. श्री. राजेश दुसार, अध्यक्ष-श्री भैरी मंदिर, मुरुड : आज काही शाळांमध्ये मुलींना बांगड्या, टिकली लावण्यासाठी विरोध केला जातो, याविषयी आपण सतर्क असायला हवे.

उपस्थिती

विशेष

१. विषयानंतर झालेल्या चर्चेत विश्वस्तांनी देवस्थान संदर्भातील समस्यांवर  उपाययोजना विचारून घेतली.

२. श्री महालक्ष्मी देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाने या कार्यक्रमासाठी सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली.

३. देवस्थानाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोअर कमिटी सदस्य श्री. रमेश कडू अन् देवस्थानाचे उपाध्यक्ष श्री. सुरेश रेवाळे यांनी मंदिर परिषदेच्या प्रसार कार्यात, तसेच नियोजनात महत्त्वाचे योगदान दिले.

४. गव्हे येथील श्री. लक्ष्मण गुरव, शिरखलचे श्री. दीपक वारे, मुरुडचे श्री. सदानंद साटले, दापोली येथील हनुमान मंदिराचे श्री. नितीन शिंदे, श्रीराममंदिराचे श्री. अविनाश प्रधान, कुडावले येथील श्री. महेश कदम, मंडणगड येथील श्री. श्रीरंग राणे आणि श्री. रामचंद्र भोसले आणि अन्य विश्वस्त उपस्थित होते.