राजापूर तालुक्यात पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी करा !

पंचायत समितीच्या बैठकीत ठराव संमत

राजापूर, १३ जून (वार्ता.) – तालुक्यातील वाढती बेरोजगारी आणि त्यामुळे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी तालुक्यामध्ये तातडीने पर्यावरणपूरक प्रकल्प उभारावेत, अशा मागणीचा ठराव येथील पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला. तालुक्यातील वाढत्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागांतील अनेक घरे बंद असून याचा थेट फटका शाळांच्या पटसंख्येवर होत असल्याबद्दल बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.

ही बैठक सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या  ‘किसानभवन’ सभागृहात पार पडली. या वेळी उपसभापती अभिजीत गुरव, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

१. बैठकीत आपत्कालीन नियोजनाची चर्चा चालू असतांना अनेक शासकीय कर्मचारी मुख्यालयी रहात नसल्याची गोष्ट समोर आली. सदस्य पंढरीनाथ मयेकर यांनी ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, डॉक्टर आणि अन्य विभागांचे कर्मचारी मुख्यालयी रहात नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले ‘आपत्काळात कर्मचारीच नसतील, तर लोकांनी कुणाशी संपर्क साधायचा ?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

२. यावर सभापती आणि उपसभापती यांसह सर्व सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळा चालू झाल्याने नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांच्या साहाय्यासाठी सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्तीने मुख्यालयी रहावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या

३. तालुक्यातील विदारक स्थिती पालटण्यासाठी रोजगार निर्मिती करणार्‍या पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी करण्यात यावी, असा ठराव सदस्य राजेश गुरव यांनी मांडला. त्याला सर्व सदस्यांनी एकमताने संमती दिली.

४. बैठकीत तालुका कृषी विभागाकडून आंबा आणि काजू पिकांच्या हानीच्या सर्वेक्षणाची माहिती देण्यात आली, तसेच खरीप हंगामाच्या नियोजनावर चर्चा झाली. यासमवेत बांधकाम, महिला व बालकल्याण, सांख्यिकी, वनविभाग, महावितरण आणि शिक्षण अशा विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

५. पंचायत समितीचे ‘किसानभवन’ सभागृह आता वातानुकूलित (AC) करण्यात आले आहे. या सभागृहाचा वापर तालुक्यातील विविध बैठका आणि कार्यक्रमांसाठी केला जाणार असून त्यातून मिळणार्‍या भाड्याच्या रकमेमुळे पंचायत समितीला अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. या कामात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल उपसभापती अभिजीत गुरव आणि गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांच्या अभिनंदनाचा ठरावही या वेळी संमत करण्यात आला.