उटणे कोणत्या प्रकारचे, कधी, कसे आणि कुणी वापरावे ?

उद्यापासून, म्हणजेच १७ ऑक्टोबर या दिवशी दिवाळीला प्रारंभ होत आहे. दिवाळीत नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. त्या वेळी सुगंधी तेल आणि उटणे लावले जाते. हे उटणे कोणत्या प्रकारचे, कधी, कसे आणि कुणी वापरावे ? अशी  सामान्यपणे विचारल्या जाणार्‍या काही प्रश्नांची उत्तरे आणि त्यातल्या काही व्यवहार्य सूत्रांची माहिती आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून येथे देत आहे.

उटणे

१. अभ्यंग आणि उटणे कधी वापरायचे ?

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

दिवाळीचे ४ दिवसच नाही, तर थंडी असणार्‍या महिन्यांमध्ये प्रतिदिनच अंगाला थोडे तरी तेल लावून मग उटणे वापरून अंघोळ करावी. अभ्यंग हा तीळ तेल किंवा एखाद्या वातशामक सिद्ध तेलाने करता येईल. थंडीमध्ये तेल हे कोमट किंवा गरम करून लावावे. लहान मुलांना विशेष करून ‘बला तेल’ किंवा ‘चंदनबलालाक्षादि तेल’ लावावे. संपूर्ण शरिराला किमान ५-१० मिनिटे आणि विशेष करून डोके, कान, हात अन् पाय या ठिकाणी अभ्यंग करून मग उटणे लावावे.

२. कुठले उटणे वापरावे ?

थंडीच्या काळात लावायचे उटणे हे स्निग्ध आणि त्वचेला चांगल्या करणार्‍या वनस्पतींच्या मिश्रणाने बनलेले असावे. नुसतेच सुगंधी असण्यापेक्षा तेवढेच औषधीही असावे.

३. उटणे कसे वापरावे ?

उटणे पावडर तेल लावलेल्या अवयवांवर छानपैकी चोळून मग स्नान करण्यास जावे. यासाठी उटणे हे नीट पूर्ण चूर्ण स्वरूपात असावे, जेणेकरून त्वचेला त्रास होणार नाही. तेल न लावता त्वचेवर उटणे जोरजोरात घासू नये. तेलात मिसळून अंगाला उटणे लावून मग साबण लावून अंघोळ करणे, असेही करू नये. अंगाला तेल थोडा वेळ ठेवून मग उटणे लावून गरम पाण्याने अंघोळ करावी. साबण लावू नये. उटणे हे अत्तर न घातलेले आणि केवळ वनस्पती चूर्णांपासून बनवलेले असावे. असे उटणे लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींनाही लावता येते.

४. उटणे कुणी वापरू नये ?

ज्यांच्या त्वचेची आग होते आहे, ज्यांची त्वचा नाजूक वा पातळ आहे (ज्यांना पटकन खरचटते, त्वचा लगेच लाल होते, ‘सन बर्न’ (सूर्य प्रकाशाने त्वचा भाजणे) पटकन होतो), नुकताच येऊन गेलेला ताप, गांध्या, तसेच त्वचेचे काही ‘ऑटोइम्युन’ व्याधी (स्वतःच्या रोगप्रतिकार शक्तीने स्वतःच्या शरिरावर आक्रमण करणे) असतील, तर उटणे लावणे टाळा. अगदी लहान मुले आणि ज्येष्ठ व्यक्ती यांना पुष्कळ तेल लावून लागेल तितकेच उटणे वापरावे. त्वचेचा विशिष्ट दाह (सेल्युलायटिस), ‘व्हेरिकोज अल्सर’ (पायाच्या घोट्याच्या भागावर बरी न होणारी उघडी जखम), त्वचेला असलेल्या भेगा, व्रण / जखमा असतांना आपसूक वापरले जाणार नाहीच. सण म्हणून हट्टाने वापरूही नये. आजार आटोक्यात असला, तरी लक्षणानुसार आपापल्या वैद्यांच्या सल्ल्याने वापरा.

५. उटणे लावण्याचे लाभ

साबण लावण्याऐवजी उटणे लावण्याने त्वचा कोरडी होत नाही. तजेलदार होणे,  मऊ होणे, हे लाभ होतात. त्वचेला लवकर सुरकुत्या पडणे, त्वचा निस्तेज दिसणे, या गोष्टी टळतात. वैद्यांकडून घेतलेले उटणे श्रेयस्कर आहे. वरील गोष्टी पाळल्या, तर केवळ थंडीतच नाही, तर पूर्ण वर्षभरच त्वचा उत्तम राहील, याची खात्री आहे.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंडये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (१४.१०.२०२५)