‘महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्यानुसार सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात १९.५.२०२५ या दिवशी दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ या वेळेत श्री महाधन्वन्तरि याग करण्यात आला. या यज्ञाचे यजमानपद सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भूषवले. ६४ दांपत्यांनी या यज्ञाचा संकल्प केला. ईरोड, तमिळनाडू येथील गुरुमूर्ती शिवाचार्य आणि शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती यांनी यागाचे पौरोहित्य केले. देश-विदेशांतून आलेले सहस्रो साधक आणि धर्माभिमानी यागाला उपस्थित होते.


१. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन

यागातील विविध घटकांची यागापूर्वी आणि यागानंतर छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.
१ अ. यागाला उपस्थित साधक आणि साधिका यांच्यावर यागाचा सकारात्मक परिणाम होणे : यागापूर्वी २ साधिकांमध्ये अत्यल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली; पण यागानंतर ती नाहीशी झाली. यागापूर्वी सर्वांमध्ये चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती आणि यागानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत आणखी वाढ झाली. या सर्वांतील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.
१ अ १. निष्कर्ष : यागानंतर साधक आणि साधिका यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने ८ ते २० मीटरनी वाढ झाली. यातून ‘सर्वांना यागाचा आध्यात्मिकदृष्ट्या लाभ झाला’, असे लक्षात येते.
१ आ. यागानंतर सनातनच्या तिन्ही गुरूंमधील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : सनातनच्या तिन्ही गुरूंमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. यागापूर्वीही त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती आणि यागानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत आणखी वाढ झाली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.
१ आ १. निष्कर्ष : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत १२४३ किलोमीटरनी आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने २ किलोमीटरनी वाढ झाली. यातून ‘सनातनच्या तिन्ही गुरूंमधील चैतन्य समष्टीच्या कल्याणासाठी कार्यरत झाले’, असे लक्षात येते.
१ इ. यागाचे पुरोहित आणि यागाचा संकल्प करणारी दांपत्ये यांच्यावर यागाचा सकारात्मक परिणाम होणे : पुरोहित आणि दांपत्ये यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. यागापूर्वी सर्वांमध्ये चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती आणि यागानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.
१ इ १. निष्कर्ष : पुरोहितांमधील सकारात्मक ऊर्जेत ७७ मीटरने वाढ झाली. दांपत्यांतील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने २० ते ३२ मीटरनी वाढ झाली. यातून ‘सर्वांना यागाचा आध्यात्मिकदृष्ट्या लाभ झाला’, असे लक्षात येते.
१ ई. यागाचा तेथील वातावरण आणि यागातील अन्य घटक यांच्यावरही सकारात्मक परिणाम होणे : ‘श्री महाधन्वन्तरि यागाचा तेथील वातावरण, तसेच यागातील श्री धन्वन्तरि देवतेचे चित्र, प्रधान देवता, यज्ञकुंड आदी घटकांवर काय परिणाम होतो ?’, हेही अभ्यासण्यात आले. कोणत्याही घटकामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. यागापूर्वी सर्व घटकांमध्ये चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती आणि यागानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत आणखी वाढ झाली.
हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.

१ ई १. निष्कर्ष : श्री धन्वन्तरि देवतेचे चित्र आणि प्रधान देवता यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुक्रमे ११० मीटर अन् १८६ मीटर एवढी वाढ झाली. यज्ञस्थळाची भूमी, हवेचा नमुना आणि यज्ञकुंड यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने १९०० ते २००० मीटरनी वाढ झाली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातून ‘श्री महाधन्वन्तरि यागाचा तेथील वातावरण आणि यागातील अन्य घटक यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला’, असे लक्षात येते.
१ उ. यज्ञकुंड-निर्मितीच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन ! : सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत उल्लेख केल्यानुसार महोत्सवस्थळी श्री धन्वन्तरि यागासाठी कमळाच्या आकारातील एक वैशिष्ट्यपूर्ण यज्ञकुंडाची निर्मिती करण्यात आली. यज्ञकुंडाचे बांधकाम १४.५.२०२५ या दिवशी आरंभ झाले आणि १६.५.२०२५ या दिवशी ते पूर्ण झाले. या कालावधीत यज्ञकुंडाची विविध टप्प्यांवर छायाचित्रे काढण्यात आली. त्यानंतर १७ ते १९ मेपर्यंत महोत्सव होता. (महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी (१९.५.२०२५ या दिवशी) दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ या वेळेत श्री महाधन्वन्तरि याग झाला.) हे यज्ञकुंड महोत्सवातील व्यासपिठासमोर काही अंतरावर असल्याने ‘महोत्सवाचा यज्ञकुंडावर काही परिणाम होतो का ?’, हेही अभ्यासण्यात आले. यासाठी महोत्सव कालावधीत प्रतिदिन यज्ञकुंडाची छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.
१ उ १. निष्कर्ष : वरील नोंदींवरून लक्षात येते की, यज्ञकुंड निर्मितीचे कार्य आरंभ होऊन जसजसे ते पूर्णत्वाला गेले, तसतसे त्यातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढत गेले. महोत्सव कालावधीतही यज्ञकुंडातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले. यातून ‘निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर यज्ञकुंडाच्या सात्त्विकतेत वाढ होत गेली, तसेच महोत्सवातील चैतन्यमय वातावरणाचाही यज्ञकुंडावर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला’, असे लक्षात येते.

२. चाचण्यांतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. श्री महाधन्वन्तरि यागातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून यागाचा आरंभ झाला. सामूहिकरित्या श्री गणेशाचा श्लोक म्हणण्यात आला. त्यानंतर पुण्याहवाचन, महागणपतिपूजन, नवग्रहपूजन करून श्रीविष्णुसहस्रनामाचे पारायण करण्यात आले. पुरोहितांनी यज्ञात देवतांना आवाहन करून त्यांचे पूजन, त्यांच्या कृपेसाठी हवन, मंत्रपठण इत्यादी कृती भावपूर्ण अन् परिपूर्ण केल्या. श्री धन्वन्तरि देवतेमधील तत्त्व (चैतन्य) कार्यरत झाले. यज्ञकुंडात विविध औषधी वनस्पतींची आहुती देण्यात आली. यज्ञकुंडातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाले. याचा पुढीलप्रमाणे सर्वांवर सकारात्मक परिणाम झाला.
१. यागाला उपस्थित विविध आध्यात्मिक पातळीचे त्रास असलेले आणि नसलेले साधक अन् साधिका यांनी त्यांची क्षमता अन् भाव यांनुसार यागातील चैतन्य ग्रहण केले.
२. पुरोहितांनी यागाचे पौरोहित्य परिपूर्ण आणि भावपूर्ण केले. त्यामुळे त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.
३. यागात संकल्प केलेल्या दांपत्यांनी त्यांची क्षमता आणि भाव या यांनुसार यागातील चैतन्य ग्रहण केले. त्यामुळे त्यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.
२ आ. यज्ञकुंडात पुष्कळ सात्त्विकता निर्माण होण्याचे कारण : यज्ञकुंडाचे बांधकाम आणि रंगकाम करणार्या साधकांनी दिवसरात्र एक करून अल्प वेळेत कमळाच्या आकारातील वैशिष्ट्यपूर्ण यज्ञकुंड सिद्ध केले. जसजसे यज्ञकुंड सिद्ध होत गेले, तसतसे त्यात अधिकाधिक सात्त्विकता निर्माण होत गेली. यातून ‘बांधकाम आणि रंगकाम या कृती सात्त्विक पद्धतीने अन् ‘साधना’ म्हणून केल्याने तिच्यात पुष्कळ सात्त्विकता निर्माण होते’, हे लक्षात येते.
२ इ. यागाशी संबंधित सर्व घटक सात्त्विक असल्याने यागाची फलनिष्पत्ती उत्तम मिळणे : ‘येणार्या भीषण काळात सर्व साधकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे आणि सनातन राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी’, या समष्टी उद्देशाने हा याग करण्यात आला. यागासाठी महर्षींचा संकल्प कार्यरत होता. यागाची सर्व सिद्धता साधक आणि पुरोहित यांनी सेवाभावाने केली. यागाचे यजमान असलेले सनातनचे तिन्ही गुरु हे उच्च आध्यात्मिक पातळीचे समष्टी संत आहेत. यागाला देश-विदेशातील साधक, संत, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आदी उपस्थित होते. याग अत्यंत चैतन्यमय वातावरणात पार पडला. थोडक्यात यागाशी संबंधित सर्व घटक सात्त्विक असल्याने यागाची फलनिष्पत्ती उत्तम मिळाली.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.८.२०२५)
ई-मेल : [email protected]
| • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |




‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!