Boycott American Goods : अमेरिकेच्या अन्यायकारक करवृद्धीच्या विरोधात भर पावसात कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

अमेरिकेच्या वस्तूंवर देशव्यापी बहिष्काराचे आवाहन !

कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठकोल्हापूर, १ सप्टेंबर (वार्ता.) – अमेरिकेने भारतीय मालावर ५० टक्के इतका अन्यायकारक कर लादल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर येथील विविध संघटनांनी ‘मॅकडोनाल्ड्स्’ समोर (हॉटेल सयाजी शेजारी) निदर्शने करत अमेरिकी आस्थापनांच्या वस्तूंवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी वापरलेल्या ‘स्वदेशी’च्या शस्त्राचा पुन्हा एकदा वापर करून अमेरिकेच्या आर्थिक दादागिरीला उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांनी सूत्रसंचालन केले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्वीकारले.

या प्रसंगी ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ह.भ.प. महादेव यादव महाराज, ‘आरोग्य भारती’च्या डॉ. अश्विनी माळकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे करवीर तालुका समन्वयक श्री. शरद माळी, युवासेनेचे श्री. सागर पाटील, ‘हिंदु एकता आंदोलना’चे श्री. दिलीप भिवटे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

अमेरिकी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन

अमेरिकेच्या अन्यायाला उत्तर म्हणून मॅकडोनाल्ड्स, के.एफ्.सी., बर्गर किंग, पिझ्झा हट, डॉमिनोज, स्टारबक्स, डंकिन डोनट्स, सेव्हन अप, कोका-कोला. स्प्राईट, फॅन्टा, लेज, ॲमेझॉन, उबेर, नेटफ्लिक्स, कोलगेट, पामोलिव्ह, जॉन्सन अँड जॉन्सन यांसारख्या अनेक प्रसिद्ध अमेरिकन ब्रँड्सवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले. अमेरिकन वस्तूंचा त्याग करून त्याऐवजी देशी वस्तूंचा अभिमानाने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारताला कोंडीत पकडण्याचा अमेरिकेचा अश्लाघ्य प्रयत्न

हिंदु जनजागृती समिती आणि अन्य सहभागी संघटनांच्या वतीने म्हटले आहे की, रशियाकडून तेल खरेदी करण्याचे कारण पुढे करून अमेरिकेने भारताचे उद्योगधंदे, शेतकरी आणि अर्थव्यवस्था यांवर आक्रमण केले आहे. एकीकडे भारतापेक्षा अधिक तेल रशियाकडून खरेदी करणार्‍या चीनवर कोणताही कर लावला जात नाही, तर दुसरीकडे अमेरिका स्वतः रशियाकडून युरेनियम आणि पॅलेडियम यांसारख्या वस्तूंची खरेदी करत आहे. यावरून हा निर्णय केवळ भारताला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठीच घेतला असल्याचे स्पष्ट होते, असे या संघटनांचे म्हणणे आहे.

‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला अधिक गती देण्याची मागणी

या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये भारत सरकारने अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता हा अन्यायकारक कर तात्काळ मागे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणावा. या निर्णयामुळे हानी झालेल्या भारतीय उद्योगांना, साहाय्य करावे. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला अधिक गती देऊन भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे. जर अमेरिकेने कर मागे घेतला नाही, तर भारतात व्यवसाय करणार्‍या अमेरिकन कंपन्यांवर ५० टक्के प्रति-कर लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

उपस्थित मान्यवर : या आंदोलनासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. महिंद्र अहिरे, मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अशोक गुरव आणि श्री. आप्पासाहेब गुरव, विश्व हिंदु परिषदेचे श्री. विजय पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे कागल तालुका संयोजक श्री. किरण कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री दिलीप दळवी, मनोज चौगुले, संभाजी थोरवे, सतीश पाटील, युवा सेनेचे श्री. सचिन नागटिळक, सनातन संस्थेच्या डॉ. शिल्पा कोठावळे, उद्योजक श्री. आनंद पाटील, शिवसेनेचे श्री. बाळासाहेब नलवडे यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.