सामाजिक आणि मन: स्वास्थ्यासाठी योगाभ्यासाविना पर्याय नाही ! – सौ. रमाताई जोग, पतंजलि योग समिती

अनंत आगाशे लिखित ‘मंत्र आरोग्याचा’ पुस्तकाचे प्रकाशन

डावीकडून सौ. पौर्णिमा दाते, सौ. रमाताई जोग, सर्वश्री विनय साने, अनंत आगाशे आणि प्रमोद कोनकर

रत्नागिरी – धावपळीच्या आजच्या जीवनात समाजाचे मनःस्वास्थ्य हरवले आहे. ते टिकवण्यासाठी योगाभ्यासासारखा दुसरा पर्याय नाही. योगगुरु रामदेवबाबा यांनी संपूर्ण भारतभर चालू केलेल्या योगाभ्यासाची आता चळवळ झाली आहे. ११ वर्षांपासून प्रतिवर्षी २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातोय. संपूर्ण जगाला योगाभ्यासाचे महत्त्व कळले आहे. प्रत्येकाने प्रतिदिन किमान १ घंटा योग, प्राणायाम करावा, असे आवाहन पतंजलि योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. रमाताई जोग यांनी केले.

योगशिक्षक अनंत आगाशे लिखित पुस्तक ‘मंत्र आरोग्याचा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. नाचणे येथील ॐ साई सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मंचावर बी.ए. योगशास्त्र सुवर्णपदक प्राप्त, तथा पतंजलीचे संघटनमंत्री विनय साने, सह योगशिक्षिका सौ. पौर्णिमा दाते, लेखक अनंत आगाशे आणि सत्त्वश्री प्रकाशनचे प्रमोद कोनकर उपस्थित होते.

प्रास्ताविकामध्ये श्री. अनंत आगाशे यांनी सांगितले की, ईश्वराने मनुष्याला १०० वर्षांचे आयुष्य दिले आहे आणि आजच्या भाषेत सांगायचे, तर योग ही शतायुषी जगण्याची ‘गॅरंटी’ आणि ‘वॉरंटी’ आहे. वर्ष २००८ पासून साळवी स्टॉप येथे योग शिकलो. अनेक शिबिरे चालू केली. निःशुल्क योग शिकवत आहे. प्रारंभी प्रतिसाद अल्प होता; परंतु अव्याहतपणे जवळपास १७ वर्षे येथे योगकक्षा चालू आहे. वैयक्तिक आयुष्यात योग, प्राणायामामुळे पुष्कळ लाभ झाला. सहस्रो लोक येथे योग शिकून गेले आहेत. प्रारंभी पौर्णिमाताई दाते येथे योग आणि प्राणायाम शिकवत होत्या. अधिकाधिक लोकांना योगाची माहिती देण्याकरता पुस्तक लिहिण्याचे ठरवले. वर्ष २०१६ ला प्रारंभ केला; मात्र मध्ये थोडा खंड पडला. कोरोनामुळे काम थांबले; परंतु नवनवीन माहिती सोप्या पद्धतीने मांडली आहे. यासाठी योग शिक्षक मिलिंद सरदेसाई यांचेही मोलाचे साहाय्य झाले. प्रतिदिन या पुस्तकाचा संदर्भ घेऊन यौगिक जॉगिंग, योग-प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम आणि सूर्यनमस्कार याचा सराव करावा आणि निरोगी रहावे.

उपस्थिती

‘योगाभ्यासासाठी संदर्भपुस्तक म्हणून असलेली उपयुक्तता लक्षात घेऊन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.’, असे सत्त्वश्री प्रकाशनाचे प्रमोद कोनकर यांनी सांगितले. ‘योग’ या विषयावरची आणखी पुस्तके श्री. आगाशे यांनी साध्या-सोप्या भाषेत लिहावीत,’ अशा शब्दांत पतंजलीचे संघटनमंत्री विनय साने यांनी श्री. आगाशे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात योग शिक्षक विनय साने आणि सौ. पौर्णिमा दाते यांनी मनोगत व्यक्त केले.