Amit Shah On Nehru : काश्मीरमध्ये सैन्य जिंकत असतांना नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम केला !  

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रत्युत्तर

  • भारताची चांगली सैनिकी स्थिती होती; मग युद्ध का केले नाही? – काँग्रेसचा प्रश्न

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व माजी पंतप्रधान नेहरू (वर्तुळात)

नवी देहली – युद्धाचे अनेक परिणाम असतात. केवळ स्थिती चांगली आहे; म्हणून युद्ध करायचे, असे नसते. दायित्वाने निर्णय घ्यावे लागतात. वर्ष १९४८ मध्ये भारतीय सैन्य उत्तम स्थितीत होते. सरदार पटेल यांनी सतत विरोध केला, तरीही नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम घोषित केले. त्यामुळेच आज पाकव्याप्त काश्मीर अस्तित्वात आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चालू असलेल्या चर्चेत काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देतांना म्हटले. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी त्यांच्या भाषणात ‘जेव्हा आपले सैन्य चांगल्या स्थितीत होती, तेव्हा युद्ध का केले नाही?’, अशी विचारणा केली होती. त्यावर शहा यांनी वरील उत्तर दिले.

काँग्रेसमुळेच पाकव्याप्त काश्मीर भारतात नाही !

अमित शहा पुढे म्हणाले की, मी इतिहासाचा विद्यार्थ्यी आहे, दायित्वाने सांगतो. पाकव्याप्त काश्मीरचे अस्तित्व आहे, तर ते केवळ नेहरूंमुळेच आहे. नेहरूच त्याला उत्तरदायी आहेत. वर्ष १९५० मध्ये पटेल यांनीही विरोध केला होता. वर्ष १९७१ च्या युद्धात इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे २ तुकडे केले. हा भारताचा मोठा विजय होता. शतकानुशतके आपण त्याचे स्मरण ठेवू. ९३ सहस्र युद्ध कैदी होते. १५ सहस्र चौरस किलोमीटर क्षेत्र भारताच्या नियंत्रणात होते. शिमला येथे करार झाला; पण पाकव्याप्त काश्मीर मागणे विसरलो. तेव्हा पाकव्याप्त काश्मीर मागितला असता, तर आज जी स्थिती उद्भवली, ती उद्भवली नसती. आपण १५ सहस्र किलोमीटरची जिंकलेली भूमीही परत केली. १५० पाकिस्तानी अधिकार्‍यांवर कारवाई करायची होती. ती केली नाही. काँग्रेस आज विचारते की, ‘पाकव्याप्त काश्मीर परत घेणार कि नाही ?’ तर उत्तर आहे की, जर वर्ष १९४८ मध्ये पाकव्याप्त काश्मीर घेतले असते, तर आज आतंकवादी तळांवर आक्रमणे करावी लागली नसती.

१. वर्ष १९६० मध्ये नेहरूंनी सिंधु नदीचे ८० टक्के पाणी पाकिस्तानला दिले. वर्ष १९७१ मध्ये शिमला कराराच्या वेळी पाकव्याप्त काश्मीरबद्दल काहीही चर्चा केली नाही. या सगळ्या संधी काँग्रेसने गमावल्या.

२. अमित शहा म्हणाले की, पाकिस्तान ही काँग्रेसच्या चुका आणि स्वीकृती यांमधून निर्माण झालेली वस्तूस्थिती आहे. गांधी कुटुंबाला चीनप्रेम आहे. चीनसमवेत काँग्रेसने काय करार केला आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. त्यांनी विजय मिळवलेले भागही पाकिस्तानला परत दिले.

३. अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका करत सांगितले की, काँग्रेसने पोटा कायद्याला (‘प्रिव्हेंशन ऑफ टेररिझम ॲक्ट’ला) विरोध केला. बाटला हाऊसमधील आतंकवाद्यांवर कारवाई केली, त्या वेळी सोनिया गांधी रडल्या. काँग्रेसने आतंकवादाबाबत काहीच ठोस काम केले नाही.

४. काल काँग्रेस विचारत होती, ‘पहलगामच्या दोषींचे काय झाले?’ मी १० नावे वाचतो. त्यांपैकी ८ आतंकवाद्यांना मोदी सरकारच्या काळात ठार करण्यात आले, जे काँग्रेस सरकारच्या काळात सुटले होते. आमच्या सैन्याने १०० पेक्षा अधिक आतंकवाद्यांना ठार केले आहे. यावर अभिमान वाटायला नको का ?, असा प्रश्न अमित शहा यांनी विचारला.

५. अमित शहा म्हणाले की, काल देशाचे माजी गृहमंत्री चिदंबरम् यांनी विचारले की, हे आतंकवादी पाकिस्तानातून आले, याचे पुरावे काय आहेत?’ मग मी विचारतो, तुम्ही पाकिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न करता का? तुम्हाला त्यांच्याशी सहानुभूती का?