Bihar Free Electricity : बिहार सरकार प्रत्येक घराला १२५ एकक वीज विनामूल्य देणार !

१ कोटी ६७ लाख कुटुंबांना होणार लाभ !

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

पाटलीपुत्र (बिहार) – राज्यातील नागरिकांना १२५ एकक (युनिट) वीज निःशुल्क देण्यात येणार आहे. यासमवेतच पुढील ३ वर्षांत घरगुती ग्राहकांना सौरऊर्जेचा लाभही मिळेल. स्वत: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याची घोषणा केली. याचा लाभ राज्यातील १ कोटी ६७ लाख कुटुंबांना होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ‘एक्स’वर पोस्ट करत नीतिश कुमार म्हणाले की, आम्ही आरंभीपासूनच सर्वांना स्वस्त दरात वीज पुरवत आहोत. यापुढे १ ऑगस्टपासून, म्हणजेच जुलै महिन्याच्या वीज देयकातून सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंतच्या विजेसाठीचे पैसे द्यावे लागणार नाहीत.

मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व घरांच्या छतावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून दिले जातील. अत्यंत गरीब कुटुंबांसाठी हे उभारण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल. अन्यांनाही पुरेसे सहकार्य करू.

संपादकीय भूमिका

देशावर मोठे कर्ज असतांना अशा योजना जनतेला सकृतदर्शनी साहाय्यभूत ठरणार असल्या, तरी ते एकूणच देशाला परवडणारे आहे का ? अशा प्रकारे विनामूल्य गोष्टी देण्याची टूम थांबण्यासाठी केंद्र सरकारने दिशानिर्देश प्रसारित करून राज्य सरकारांकडून त्यांचे पालन होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !