संपादकीय : आतंकवादी कारखाना चालू ?

पाक सैन्याचे फील्ड मार्शल असीम मुनीर

पाकच्या सैन्याने भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे नष्ट केलेले आतंकवाद्यांचे ९ तळ पुन्हा चालू करण्यासाठी ४० कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली आहे. हा निधी पाकचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी स्वत: हस्तक्षेप करत आतंकवाद्यांसाठी दिला आहे. या ठिकाणी मशीद आणि मदरसेही चालू करण्यात येणार आहेत. यातून पाक पुन्हा एकदा आतंकवादाचे पुनरुज्जीवन करणार आहे, हे लक्षात येते. याचाच अर्थ पाक सरकारच्या अनेक विभागांपैकी आतंकवाद हा एक विभागच आहे, हे लक्षात येते. भारतीय सैन्याच्या हवाई आक्रमणात पाकमधील जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनांचे अनेक आतंकवादी अन् त्यांचे कमांडर मारले गेले होते. या आतंकवाद्यांच्या ‘जनाजा’ला (अंत्ययात्रेला) पाकचे अनेक वरिष्ठ सैन्याधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते, म्हणजे पाकला हे आतंकवादी त्यांच्या परिवाराचाच एक भाग वाटतात, एवढी भीषण परिस्थिती आहे. आतंकवादी मसूद अझहर याचे १४ नातेवाइक या आक्रमणात मारले गेले होते, त्याला पाकने १४ कोटी रुपयांचे साहाय्य दिले, म्हणजे ‘तुम्ही भारताविरुद्ध आतंकवादी कारवाया चालूच ठेवा, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’, हा संदेश पाकने आतंकवाद्यांना दिला आहे.

आतंकवादी हेच पाकचे सैन्य !

पाक तसा जगाच्या दृष्टीने ‘भिकारी’ देश आहे. आतंकवाद्यांची निर्मिती आणि आतंकवादी कारवाया करणे, हा पाकच्या सरकारी धोरणाचाच एक भाग आहे. या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम पाकचे सैन्य करते. मदरशांतील मुलांना शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देत असतांना पाक सैन्याचे अनेक व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाले आहेत, म्हणजे आतंकवादी हे पाकचे युद्ध चालू नसणार्‍या काळात भारतात कारवाया करणारे अधिकृत सैन्यच आहे. त्यामुळेच तो भारताच्या आक्रमणात ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या कुटुंबियांना कोट्यवधी रुपयांचे साहाय्य करत आहे. आतंकवादी घडवण्यासाठी आणि आतंकवाद्यांच्या मृत्यूनंतरही साहाय्य करत आहे. स्वत:ची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्यामुळे जगातील संपन्न देशांकडे विशेषत: अमेरिका, आखाती देश यांच्याकडे वारंवार भीक मागून देश चालवला जात असतांना मिळालेले पैसे मात्र आतंकवाद्यांवर खर्च केले जातात. अमेरिका अनेक महिने पाकला आर्थिक साहाय्य करत नव्हती; मात्र आता पाकच्या सैन्याकडे असलेल्या अमेरिकेच्या विमानांच्या देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली अमेरिकेने पाकला पुन्हा सहस्रो कोटी रुपयांचे साहाय्य केले. पाकसारखा आतंकवादी देश हे पैसे पुन्हा आतंकवादी कारवायांसाठी वापरणार, हे अमेरिकेलाही ठाऊक आहे, तरीही अमेरिका ते पैसे पाकला देत आहे. यातून तिचा भारताप्रतीचा कपटी हेतूही लक्षात येतो. अमेरिकेने पाकला आतापर्यंत सहस्रो कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे, हे भारताला लढवत ठेवण्यासाठीचे साहाय्य आहे, हे वेगळे सांगायला नको.

कपटी आणि धूर्त अमेरिका !

धूर्त अमेरिका तिला अडसर वाटणार्‍या गोष्टी दूर करण्यासाठी दीर्घकालीन योजना राबवते. बर्‍याच वेळा या योजना कशा प्रकारे कार्यान्वित होणार ? त्यामध्ये तिने सहभागी करून घेतलेल्या व्यक्तींचा नेमका कसा उपयोग होणार ? याचे आडाखे जगाला बांधता येत नाहीत. कोणतीही लढाई अथवा युद्ध अमेरिका स्वत:च्या भूमीवर होऊ न देता अन्य देशांमध्ये कसे होईल, हे पहाते. त्यामुळे तिची हानी होत तर नाहीच, वापर केलेल्या व्यक्तीची आणि ज्याविरुद्ध वापर केला आहे, त्यांची हानी मात्र मोठ्या प्रमाणात होते. अमेरिकेनेच कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन याला मोठे केले, त्याची आतंकवादी संघटना वाढू दिली. ओसामाने मोठ्या प्रमाणात आतंकवादी कृत्ये करून दहशत बसवली. अमेरिकेला हेच हवे होते; मात्र नंतर अमेरिका आणि त्याचे बिनसले. त्यानंतर अमेरिकेने त्याला साहाय्य करणे बंद केले आणि त्याच्यावरच कारवाई केली, मग मात्र लादेनने अमेरिका आणि सर्व जग यांना लक्षात राहील, असे मोठे आतंकवादी आक्रमण अमेरिकेवर केले. पुढे अमेरिकेने लादेनचा माग काढत त्याला ठार केले. आता पाक सैन्याचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना अमेरिकेने स्वत:च्या देशात कार्यक्रमासाठी बोलावले होते. एका देशाच्या सैन्यप्रमुखाला अमेरिका बोलावते; मात्र त्या देशाच्या निवडून आलेल्या जनतानियुक्त प्रमुखाला मात्र बोलावत नाही, हे त्या देशासाठी लाजिरवाणे नाही का ? असीम मुनीर यांच्याकडे काय असे मोठे कर्तृत्व आहे की, अमेरिकेसारखा प्रगत आणि सामर्थ्यशाली देश त्यांना बोलावत आहे ? यामागेही अमेरिकेची मोठी खेळी असू शकते, जी काही प्रमाणात उघड झाली आणि पुढे उघड होऊ शकते. यातून अमेरिकेला एकाच वेळी इराणच्या विरोधात पाक दाखवायचा असू शकतो आणि भारतालाही शह द्यायचा असू शकतो; कारण भारत आणि रशिया यांच्यातील संबंध घनिष्ट होत आहेत. रशियाने केवळ भारतालाच त्यांच्याकडील ‘एस्-५००’ या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीचे तंत्रज्ञान देण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे भारताचे पारडे रशियाकडे झुकत असल्यामुळे भारताला दमात ठेवण्यासाठी अमेरिका मुनीर यांना स्वत:च्या नियंत्रणात ठेवू शकते. पाकमध्ये सैन्यच सरकारपेक्षा वरचढ असल्यामुळे इराणलाही अण्वस्त्रे अथवा आण्विक साहाय्य न देण्यासाठी अमेरिकेचा प्रयत्न असू शकतो.

काही झाले तरी पाकच्या, म्हणजे चोराच्या मनात अमेरिकेने त्यांचा विचार केल्यामुळे जरा धाडस वाढले आहे. पाक त्याचा आतंकवाद निर्मितीचा कारखाना जोरात चालू करणार आणि भारताला पुन्हा नव्याने सतावणार, हे निश्चित आहे. यातून भारताने शस्त्रसंधी केली ती चूक होती, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य काय ? एका बाजूला इस्रायलला ‘इराण अणूबाँबचा वापर करून इस्रायलचे अस्तित्व संपवू शकतो’, हे लक्षात आल्यावर तो थेट इराणच्या हद्दीत घुसून त्याचे सैन्य तळ, आण्विक प्रकल्पांची स्थळे यांवर अखंड बाँबवर्षाव चालू करतो. इराणकडूनही तितक्याच शक्तीनिशी प्रतिआक्रमणे केली जात असली, तरी इस्रायलला त्याची पर्वा नाही. ‘इराणचा आण्विक कार्यक्रम धुळीस मिळवणे आणि त्याची ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्रे सिद्ध करण्याची क्षमता नष्ट करणे, या मुख्य उद्दिष्टांसाठी इस्रायलची सैन्य कारवाई चालू राहील’, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. येथेच संरक्षण धोरणाचा भेद प्रकर्षाने जाणवतो. भारतासारखा अण्वस्त्रसंपन्न देश अनेक दशके आतंकवादामुळे त्रस्त आहे, सहस्रो सैनिक, सैन्याधिकारी आणि निष्पाप नागरिक विशेषत: हिंदु धर्मीय यामध्ये मारले गेले असूनही आतंकवादाच्या मुख्य स्रोतावर सातत्यपूर्ण कारवाई करत नाही, तर दुसरीकडे इस्रायल एकाच वेळी अनेक आतंकवादी संघटना आणि त्यांना पोसणारा देश यांच्याशी लढतो. गांधीवादी मानसिकतेतून भारत पूर्ण बाहेर येणार कि नाही ? आणखी किती आतंकवादी आक्रमणे भारत झेलत रहाणार आहे ? हे ठरवण्याची वेळ आता आली आहे.

पाकमध्ये नव्याने उभारले जाणारे आतंकवादी तळ ही पुढील आक्रमणांची सिद्धता आहे, हे भारताने लक्षात घेऊन प्रत्युत्तर द्यायला हवे !