Israel Shares India’s Wrong Map : इस्रायलने दाखवलेल्या नकाशामध्ये काश्मीर पाकमध्ये, तर अरुणाचल प्रदेश चीनमध्ये !

भारतियांच्या विरोधानंतर इस्रायलकडून क्षमायाचना

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलच्या संरक्षण दलाने भारताची क्षमा मागितली आहे. इस्रायलने इराणच्या आण्विक तळांवर केलेल्या आक्रमणाची माहिती देण्यासाठी ‘एक्स’वर एक माहिती प्रसारित केली होती. यात नकाशा दाखवण्यात आला होता. या नकाशात जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचे आणि अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचे दाखवण्यात आले. यास भारतियांनी सामाजिक माध्यमांद्वारे विरोध केल्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलाने क्षमा मागितली. इस्रायलने नकाशाद्वारे इराण कोणकोणत्या देशांवर क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम आहे ?, ते दाखवण्यात आले होते.

इस्रायलच्या संरक्षण दलाने म्हटले की, ही माहिती केवळ एका क्षेत्राचे चित्रण म्हणून प्रसारित करण्यात आली आहे. यात आम्ही कुठल्याही भागाचा किंवा देशाचा नकाशा दाखवलेला नाही. तरीदेखील यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांची आम्ही क्षमा मागतो. (इस्रायलने ‘जर-तर’च्या भाषेत क्षमा मागितली आहे. इस्रायलकडून हे अपेक्षित नाही, असे त्याला भारत सरकारकडून सांगणे आवश्यक आहे ! – संपादक)

वरील चित्रे प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संपादकीय भूमिका

नकाशाच्या विकृतीकरणाविषयी भारताकडून एकाही देशावर कधी कठोर कारवाई झालेली नाही. त्यामुळेच कुणीही उठतो आणि भारताचा अशा प्रकारे अपमान करतो. सरकारने ही प्रतिमा पालटण्याची आवश्यकता आहे !