छत्रपती शिवाजी महाराज ‘सेक्युलर’ (निधर्मी) नसल्याचे पुरावे…

आज तिथीनुसार ‘शिवराज्याभिषेक दिन’ आहे. त्या निमित्ताने…

छत्रपती शिवाजी महाराज ‘निधर्मी’ होते का ? म्हणजे  ‘मराठे स्वस्तात (कमी वेतनात) मिळत होते; म्हणून महाराज मराठ्यांना घेऊन लढले, अन्यथा मुसलमान स्वस्तात मिळाले असते, तर कदाचित् त्यांना घेऊन महाराज लढले असते’, अशी स्थिती होती का ? हिंदु समाज अथवा हिंदुत्वनिष्ठ यांना आदर्श म्हणून मानले जाण्यासाठी राणा प्रताप, बाप्पा रावळ, छत्रपती शिवाजी महाराज अशीच नावे आहेत. हिंदुत्ववाद न मानणारा जो वेगवेगळ्या स्वरूपाचा वर्ग आहे, मग ते मुसलमान, समाजवादी, ख्रिस्ती, साम्यवादी असे कोणत्याही विचारधारेचे कुणीही असतील; पण या सर्व विचारधारांचा एक मूळ समान धागा हा आहे की, त्यांना हिंदु धर्म मानवत नाही. या सगळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंसाठीचे प्रेरणास्थान असणे, हे पुष्कळ अडचणीचे होत असेल का ? कारण गेल्या कित्येक हिंदु पिढ्या या छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदूंसाठीचा एक आदर्श, एक प्रेरणास्थान अशा स्वरूपात बघत आहेत.

१. ‘छत्रपती शिवाजी महाराज निधर्मी होते, असे म्हणणे’, हे श्रद्धा नष्ट करण्याचे षड्यंत्र !

मग ही प्रेरणा, हा आदर्श मोडून काढायचा असेल, तर काय करायचे ? हिंदुत्व, हिंदु धर्म, अध्यात्म यांच्याशी असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध तोडायचा ! म्हणजे त्यांना ‘सेक्युलर’ करायचे ! म्हणजे ही श्रद्धा हळूहळू नष्ट होते. त्यासाठी हा खटाटोप ! असा प्रयत्न केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच होतो, असे नाही, तर ‘गणेशोत्सव’ हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण ! महाराष्ट्रापुरता विचार केला, तर लाखो लोक एकत्र येतात, गल्ली-गल्लीतील मुले एकत्र येतात, समाज एकत्र येतो. मग अशा वेळी ‘त्यातून प्रदूषण होते’, अशी आवई उठवायची ! हे केवळ गणेशोत्सवाच्या प्रदूषणाविषयी बोलायचे, वर्षभर अन्यत्र होणार्‍या प्रदूषणाविषयी नाही. असे का ? तर हिंदूंची श्रद्धा नष्ट करण्यासाठी, केवळ अन् केवळ श्रद्धा नष्ट करण्यासाठी; कारण हिंदू हिंदूंना कितीही नावे ठेवत असले, तरी ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, ही भावना तुलनेने हिंदूंमध्ये अजून प्रभावी आहे. ‘आपल्यामुळे इतरांना त्रास झाला, तर त्याचा आनंद मानणे अथवा ‘आपणच श्रेष्ठ इतर म्हणजे जनावरे, ती माणसेच नाहीत’, असे वाटणे, हा हिंदूंचा स्थायीभाव नाही. मग यातून होते काय की, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, ही भावना जपणारा हिंदु आपल्या धर्मामुळे वा आपल्या सणांमुळे प्रदूषण होते म्हटले की, हळूहळू त्या धर्माच्या विचारधारेपासून, त्या सणातील कर्मकांडापासून दूर जायला लागतो, म्हणजे ही विलगीकरणाची प्रक्रिया चालू होते.

पुन्हा हिंदु धर्माची ‘ॲलर्जी’ असणारे अनेकदा ‘निधर्मी, पुरोगामी, राज्यघटनेलाच मानणारे’ असे असतात आणि दुसरा वर्ग हिंदूंचा म्हणजेच, ‘हा देश हिंदूंचा; पाकिस्तान मुसलमानांना दिला, तर भारत हिंदूंसाठीच राहिला पाहिजे; इथे बाहेरून आलेले मोगल, निजाम, आदिलशाह यांसारखे मुसलमान राजे हे काही लोकहितकारी शासन करणारे नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचे शासन मोडून काढले’, असे मानणारा ! या दोन वर्गांतील प्रत्येकाची त्यांची त्यांची प्रेरणास्थाने आहेत, त्यांचे त्यांचे नेते आहेत, त्यांची त्यांची विचारस्रोतांची केंद्रे आहेत.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

२. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी डॉ. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि कवी रवींद्रनाथ टागोर यांचे विचार

साम्यवादी (कम्युनिस्ट) म्हटले, तर त्यांच्यासाठी ‘कार्ल मार्क्स’ हे सगळ्यात महत्त्वाचे प्रेरणास्थान आहे. कार्ल मार्क्सचे विचार हे पुरोगामी पुढे नेतात. जर भारतापुरता विचार केला, तर मानवेंद्रनाथ रॉय हे स्थानिक साम्यवादी विचारांचे स्रोत आहेत. यामुळेच काही पुस्तके ‘शिवाजी कोण होता?’, ‘शिवाजीच्या पदरी मुसलमान कोण होते ?’, ‘शिवाजी हा एक सेक्युलर राजा होता’, अशा भाषेत लिहिली गेली. या विचारसरणीवरून त्यांच्या नेत्यांचीसुद्धा विभागणी होते. जसे मोहनदास गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. आंबेडकर हे डाव्या किंवा साम्यवादी वर्गाचे नेते, तर स्वातंत्र्यवीर सावरकर, रा.स्व. संघाचे डॉ. हेडगेवार, पू. गोळवलकरगुरुजी हे उजव्या किंवा हिंदुत्वनिष्ठ वर्गाचे नेते अर्थात् ही ढोबळ विभागणी आहे, जी वर्ग समजून घेण्यासाठी केली आहे. हिंदुत्वनिष्ठ वर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘धर्मनिरपेक्ष’ मानत नाही; पण प्रश्न हा येतो की, जो हिंदुत्वनिष्ठ नसणारा वर्ग आहे, त्यांचे नेते काय म्हणतात आणि त्यांचे नेते जे म्हणतात, ते त्या वर्गातील अनुयायी मान्य करणार का ?

२ अ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काँग्रेसचे डॉ. आंबेडकर यांचे विचार : या विचारसरणीचे दोन महत्त्वाचे नेते आहेत जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ! या दोन नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काय म्हटले, ते पुढे दिले आहे.

१७ नोव्हेंबर १९४९ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या संदर्भातील चर्चेमध्ये संसदेत भाषण केले. त्यात त्यांनी चिंता व्यक्त केली. ‘जरी स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने ही राज्यघटना स्वीकारली (ज्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेत मीसुद्धा होतो), तरी हे मिळालेले स्वातंत्र्य टिकेल कसे ? भारत परत पारतंत्र्यात तर जाणार नाही ना ?’ ही भीती व्यक्त करतांना ते म्हणतात, ‘आपल्या देशामध्ये याआधी गद्दारी (देशद्रोह) झालेली आहे. राजा दाहीरच्या सैन्यप्रमुखांनी मुसलमानांकडून लाच घेतली आणि राजा दाहीरला युद्धात पराजित होऊ दिले. हे चुकीचे झाले. कशा पद्धतीने जयचंदने महंमद घोरीला बोलवले आणि पृथ्वीराजाच्या विरोधात ती लढाई झाली !’

हे सांगतांना डॉ. आंबेडकर तिथे म्हणतात, ‘When Shivaji was fighting for the liberation of Hindus, the other Maratha noblemen and Rajput were fighting the battle on the side of Mughal emperors.’ याचा अर्थ असा ‘ज्या वेळी शिवाजी महाराज हिंदूंच्या मुक्तीसाठी लढत होते, तेव्हा इतर मराठा सरदार आणि राजपूत राजे हे मोगल सम्राटांच्या बाजूने लढत होते.’ ही विधाने डॉ. आंबेडकर एका उत्तरदायी ठिकाणी, म्हणजेच संसदेत आणि तेही राज्यघटना मान्य केली जाण्याच्या प्रक्रियेची चर्चा करतांना करतात. याचा स्पष्ट अर्थ होतो, ‘डॉ. आंबेडकरही हे मान्य करत होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांची जी लढाई होती, ती केवळ माझे राज्य वाढवण्यापुरती सीमित नव्हती, तर ती हिंदूंच्या मुक्तीसाठी होती.’

असाच एक संदर्भ डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या भारताच्या फाळणीवर आधारित ‘थॉट्स ऑन पाकिस्तान (Thoughts on Pakistan)’, या पुस्तकात त्यांची बाजू मांडण्यासाठी दिलेला आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे,

‘‘As Bhai Parmanand points out in his pamphlet called’ ‘The Hindu National Movement’ : ‘In history the Hindus revere the memory of Prithvi Raj, Partap, Shivaji and Be-ragi Bir who fought for the honour and freedom of this land (against the Muslims), while the Mahomedans look upon the invaders of India, like Muhammad bin Qusim and rulers like Aurangzeb as their national heroes.’’

याचे मराठीत भाषांतर असे, ‘भाई परमानंद यांनी त्यांच्या ‘द हिंदू नॅशनल मुव्हमेंट’ या पत्रकात म्हटल्याप्रमाणे : ‘इतिहासापासून हिंदु हे पृथ्वीराज, प्रताप, शिवाजी आणि बे-रागी बीर यांच्या स्मृतींचा आदर करतात, ज्यांनी या भूमीच्या सन्मानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी (मुसलमानांविरुद्ध) लढा दिला, तर मुसलमान भारतावरील आक्रमणकर्ते महंमद बिन कासिम आणि औरंगजेबासारख्या शासकांना त्यांचे राष्ट्रीय नायक मानतात.’

डॉ. आंबेडकर यांनी मुसलमान कुणाला आदर्श मानतात ?, त्यांची श्रद्धास्थाने कोणती आहेत ? आणि हिंदूंची कोणती आहेत ? असे दोन संदर्भ दिलेले आहेत. हिंदू पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतात. यावरून ‘हिंदूंचे हे मानणे चुकीचे आहे’, असे ते म्हणत नाहीत; पण हा प्रवाह आहे, हे स्पष्ट होते. याउलट मुसलमान कुणाला मानतात, हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे.

२ आ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काँग्रेसचे जवाहरलाल नेहरू यांचे विचार : ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकामध्ये आजही आपल्याला नेहरूंनी लिहिलेले वाक्य दिसते, ‘Shivaji was the symbol of a resurgent Hindu nationalism, drawing inspiration from the old classics, courageous and possessing high qualities of leadership. He built up the Marathas as a strong unified fighting group, gave them a nationalist background, and made them a formidable power which broke up the Mughal Empire. He died in 1680, but the Maratha power continued to grow till it dominated India.’ (अर्थ : जुन्या शास्त्रीय विचारांतून प्रेरणा घेत धाडसी आणि नेतृत्वाचे उच्च गुण बाळगणारे शिवाजी हे पुनरुज्जीवित हिंदु राष्ट्रवादाचे प्रतीक होते! त्यांनी मराठ्यांना एक मजबूत संघटित लढाऊ गट म्हणून उभे केले. त्यांना राष्ट्रवादी पार्श्वभूमी दिली आणि शक्तीशाली बनवले, ज्यांनी मोगल साम्राज्याचे विघटन केले. वर्ष १६८० मध्ये त्यांचे निधन झाले; परंतु मराठ्यांची शक्ती भारतावर वर्चस्व गाजवेपर्यंत वाढतच राहिली.)

येथे छत्रपती शिवाजी महाराज हे ‘हिंदु राष्ट्रवादा’च्या पुनरुत्थानाचे प्रतीक आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘साम्यवादी राजा’ किंवा ‘स्वार्थी राजा’ असे म्हटलेले नाही.

२ इ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बंगाली कवी रविंद्रनाथ टागोर यांचे विचार : बंगालचे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बंगाली भाषेत कविता लिहिली होती. पु.ल. देशपांडे यांनी कवितेचे मराठीत भाषांतर केले आहे. यात ते म्हणतात,

‘डोंगरातल्या अरण्यात, अंधारात बसलेल्या हे शिवराज,
उजळीत तुझे भाळ, विजेच्या तेजाने उतरला होता एक विचार,
खंड खंड छिन्न-विछिन्न भारत,
मी एकत्र बांधीन एका धर्मपाशात’

इंग्रजी कवितेतील ओळीत ‘With a singular religious thread, I shall bind in one’, असे म्हटले आहे. याचाच अर्थ ‘छिन्न-विछिन्न भारत एका धर्मपाशात बांधीन’, असा आहे.

३. ‘डॉ. आंबेडकर, नेहरू, रवींद्रनाथ टागोर, पु.ल. देशपांडे हे सारेच चुकीचे आहेत’, असे म्हणणार का ?

यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती असणारी श्रद्धा, प्रेरणा नष्ट करण्यासाठीच ‘शिवाजी महाराज साम्यवादी, ‘निधर्मी’ (सेक्युलर) होते’, असे म्हटले जाते’, हे स्पष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणणारे तथाकथित नेते, विचारवंत आणि या वर्गाचे अनुयायी यांना दोनच पर्याय रहातात, ‘एक तर त्यांच्या नेत्यांचे विचार मान्य करा आणि गप्प बसा; अन्यथा डॉ. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर, पु.ल. देशपांडे हे सारेच चुकीचे आहेत’, असे म्हणण्याचे धारिष्ट्य दाखवा. मग बघू, इतर पुराव्यांची चर्चा नंतर करता येईल.

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद.