पाकिस्तानमधून भारतात आलेल्या विस्थापित हिंदूंसाठी ‘निमित्तेकम्’ संस्थेच्या माध्यमातून संघर्ष करणारे राजस्थानचे श्री. जय आहुजा !

‘पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक हिंदूवर अत्याचार केले जातात. त्यांच्या मुली आणि महिला यांच्यावर बलात्कार होतात, तसेच अल्पवयीन मुलींचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांचे लग्न लावले जाते. हिंदूंची हत्या ही तेथील सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. मुसलमान झाल्यावर त्यांच्या अत्याचारातून सुटका झाली असती; पण स्वधर्म वाचवण्यासाठी काही वर्षांपासून तेथून सहस्रो हिंदूंनी घरदार सोडून भारतात आश्रय घेतला आहे. त्यांना नागरिकत्व कायद्यानुसार विशिष्ट प्रक्रियेतून नागरिकता मिळण्यात प्रचंड कायदेशीर अडचणी होत्या. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या विस्थापित हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने येथे हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. अशा विस्थापित हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी श्री. जय आहुजा यांनी ‘निमित्तेकम्’ नावाची संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ३ सहस्रांहून अधिक पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळवून दिले आहे. १० सहस्र पाकिस्तानी हिंदूंना अधिकृतपणे पाकिस्तानातून सुखरुपपणे सोडवले आहे आणि कायदेशीर प्रक्रियेने त्यांचे भारतात पुनर्वसन करून त्यांना रोजगार मिळवून देणे अन् त्यांना भारतीय नागरिकत्व मिळवून देणे, यासाठी ते सतत संघर्ष करत आहेत. 

श्री. आहुजा पाकिस्तानातून आलेल्या पीडित हिंदूंच्या व्यथा ऐकतात. त्यासाठी त्यांच्या झोपड्यांमध्ये जातात आणि त्यांना शक्य ते साहाय्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पाकिस्तानरूपी नरकातून सुटका करणारे श्री. जय आहुजा विस्थापित हिंदूंसाठी ‘देवदूत’ बनले आहेत. 

विशेष सदर


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. विस्थापित हिंदूंचे पुनर्वसन करण्याच्या कार्याकडे कसे वळले ?

श्री. जय आहुजा ( डावीकडून दुसरे ) आणि पाकिस्तानी विस्थापित हिंदूं

श्री. जय आहुजा यांनी वर्ष २०१० मध्ये पाकिस्तानी विस्थापित हिंदूंचे पुनर्वसन करण्याचे कार्य चालू केले. या काळात ‘ऑर्कुट’ आणि ‘फेसबुक’ हे सामान्य लोकांच्या जीवनाचा भाग बनत चालले होते. सनातन धर्मातील पहिले शक्तीपीठ आणि त्यांची कुलदेवता हिंगलाजमाता मंदिर पाकिस्तानात आहे. त्या मंदिराची स्थिती जाणून घेण्यासाठी श्री. आहुजा यांनी पाकिस्तानातील लोकांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ (मैत्रीची विनंती) पाठवली. त्यातून त्यांची डॉ. राजेश लखानी यांच्याशी मैत्री झाली. तेही जन्माने भारतीय असून त्यांचे पूर्वज सिंधमधून विस्थापित होऊन भारतात आले होते. ते त्या वेळी अदानी वैद्यकीय महाविद्यालयाचे तंत्रज्ञान प्रमुख होते आणि ‘वर्ल्ड प्रेस’चे ब्लॉग लिहित होते. पाकिस्तानात बंदुकीचा धाक दाखवून ९ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिचे ४५ वर्षांच्या व्यक्तीशी लग्न लावून दिले, ही बातमी त्यांच्या माध्यमातून समजली. त्या वेळी श्री. आहुजा यांचीही मुलगी ९-१० वर्षांची होती. त्यांना पाकिस्तानातील हिंदु मुली आणि हिंदु समाज यांच्यावरील अत्याचारांचे गांभीर्य लक्षात आले. ‘त्यांच्या आजोबांनी वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानातून भारतात परतण्याचा निर्णय घेतला नसता, तर पाकिस्तानात त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागला असता’, याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे ‘कुटुंब आणि स्वधर्म वाचवण्यासाठी पाकिस्तानातून भारतात येणार्‍या हिंदूंना भारतियांनी बाहू पसरून सामावून घेतले पाहिजे’, असे त्यांना वाटले; कारण शरण घेण्यासाठी त्यांना पृथ्वीतलावर भारताविना दुसरा देश नाही. तेव्हापासून श्री. आहुजा यांनी पाकिस्तानी विस्थापित हिंदूंच्या वेदना अल्प करण्याच्या कामाला प्रारंभ केला. वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यावर अनुकूल काळात श्री. आहुजा यांनी ‘निमित्तेकम्’ संस्था स्थापन केली. या संस्थेमध्ये १२ विस्थापित पाकिस्तानी हिंदू वेतनावर काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून श्री. आहुजा यांनी ३ सहस्र लोकांना नागरिकत्व मिळवून दिले.

(चित्रावर क्लिक करा)

२. ‘निमित्तेकम्’ संस्थेचे कार्य 

२ अ. परराष्ट्र विभागांतर्गत कार्य  

पाकिस्तानमधील विस्थापित हिंदूंच्या संदर्भात श्री. वैभव सिंह यांच्याशी ‘पॉडकास्ट’मध्ये वार्तालाप करतांना श्री. जय आहुजा

श्री. जय आहुजा यांनी १० सहस्र पीडित हिंदूंना पाकिस्तानातून सोडवले. ‘निमित्तेकम्’चे काम तेथूनच चालू होते. जेव्हा पाकिस्तानातील हिंदु भारतात येण्याचे ठरवतो, तेव्हा तो  भारतातील मित्र, नातेवाईक किंवा परिचित यांच्याशी दूरभाषवरून संपर्क साधतो. भारतीय नागरिकाच्या ‘स्पॉन्सरशिप गॅरंटी’ची कागदपत्रे असल्याविना भारतीय व्हिसासाठी पाकिस्तानातील दूतावासात अर्ज करता येत नाही. व्हिसासाठी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासमध्ये धारिका प्रविष्ट करण्यासाठी भारतीय हमीदार आवश्यक असतो. ते हमी घेण्याचे कागदपत्र ‘निमित्तेकम्’ बनवून देते. त्यांना भारतीय सरकारी अधिकार्‍याकडून प्रमाणित करून पािकस्तानपर्यंत अधिकृतपणे पोचवणे आणि त्या लोकांची व्हिसाची कागदपत्रे तेथील भारतीय दूतावासात प्रविष्ट करणे, ही कामे निमित्तेकम् करते. त्यानंतर हमीधारकाची पडताळणी करण्याचे काम गुप्तचर विभाग करतो. यात ३-४ मासांचा कालावधी जातो.

Pakistani Hindus & Their Miserable Situation Explained by Jay Ahuja
(सौजन्य : Defensive Offence)

ही पडताळणी योग्य पद्धतीने होऊन पुढील प्रक्रिया व्हावी, तसेच संबंधित व्यक्तींना व्हिसा मिळावा, यासाठी श्री. आहुजा आणि निमित्तेकम्चा चमू प्रयत्न करतो. कुणाला पाकिस्तानातून भारतात यायचे असेल, तर त्याला ही संस्था सुविधा पुरवते, तसेच हमीधारक होण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना प्रेरित करते.

नागरिकत्व कायद्यात सुधारणा

श्री. जय आहुजा

पूर्वीच्या नागरिकत्व कायद्यात ‘पाकिस्तानातून आलेले हिंदू ७ वर्षांपासून भारतात रहात असतील, त्यांचा जन्म वर्ष १९४७ पूर्वी भारतात झाला असेल किंवा फाळणीच्या पूर्वी त्यांचे पूर्वज भारताचे नागरिक असतील, तर त्यांना प्राधान्याने भारतीय नागरिकत्व मिळू शकते’, अशी अट होती. या अटीमुळे विस्थापितांना नागरिकत्वासाठी अडचण येत होती. यासंदर्भात त्यांनी ‘केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायद्यात सुधारणा करून वर्ष १९४७ ची अट, तसेच ७ वर्षांची मर्यादा काढावी’, असे सुचवले. त्यानुसार केंद्र सरकारने वर्ष १९४७ ची अट काढली आणि ७ वर्षांची मर्यादा ५ वर्षे केली.

भेट द्या → Nimittekam फेसबुक पेज लिंक https://www.facebook.com/Nimittekam/
Nimittekam (Working for Pakistani Hindus) https://x.com/Nimittekamindia

२ आ. गृहमंत्रालयांतर्गत कार्य  

संबंधित व्यक्ती पाकिस्तानातून भारताच्या सीमेत आल्यावर ते परराष्ट्र मंत्रालयाचे नाही, तर गृहमंत्रालयाचे प्रकरण होते. त्यानंतर त्वरित ‘सीआयडी’ कार्यालयात नेऊन नोंदणी करण्यात येते. बहुतेक वेळा ९० दिवसांचा ‘व्हिजिट व्हिसा घेऊन लोक भारतात येतात. त्यानंतर त्यांचा व्हिसा दीर्घकालीन व्हिसामध्ये परावर्तित करण्यासाठी त्यांचे शरणार्थी होण्यासंदर्भातील अर्ज प्रतिज्ञापत्राच्या (ॲफिडेव्हिटच्या) समवेत लावले जातात. त्यानंतर त्यांचा अर्ज संमत होऊन त्यांना भारतात आश्रय मिळेल, याची निश्चिती करण्यात येते.

Man Who Rescued 10,000 Pakistani Hindus, They Need Modi’s Help Jai Ahuja, Nimittekam
(सौजन्य : Dharmansh Foundation)

२ इ. विस्थापित हिंदूंच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवणे

वर्ष २०१२ मध्ये राजस्थानमध्ये शिक्षण अधिकारांतर्गत  विस्थापितांची मुले शाळा प्रवेशासाठी पात्र झाली. त्यानंतर अन्य राज्यांनीही या आदेशाचे अनुकरण केले. त्यामुळे शिक्षणाच्या अधिकारांतर्गत विस्थापितांची मुले चांगल्या शाळांत शिकत आहेत.

२ ई. विस्थापितांना वैद्यकीय सुविधा मिळवून देणे

डॉ. ओमेंद्र रत्नू

श्री. आहुजा यांचे सहकारी डॉ. ओमेंद्र रत्नु हे कान-नाक-घसा तज्ञ आहेत. ते ‘निमित्तेकम्’चा वैद्यकीय विभाग सांभाळतात. त्यांनी जयपूर आणि जोधपूर येतील स्थानिक डॉक्टरांना जोडले आहे. विस्थापित हिंदू हे पाकिस्तानी पासपोर्टधारक असल्याने त्यांना भारताच्या ‘आयुष्यमान भारत’सारख्या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे विस्थापित हिंदूंवर अल्प खर्चात उपचार होण्यासाठी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून स्वास्थ्य मंत्रालयाच्या साहाय्याने जोधपूरच्या ‘एम्स’ला पत्र लिहिण्यात आले. तेव्हापासून त्यांना आरोग्य सुविधा मिळत आहेत.

हे ही वाचा → पाकिस्तानी स्थलांतरित हिंदूंना नवजीवन देण्यासाठी संघर्षरत असणारे जयपूर (राजस्थान) येथील डॉ. ओमेंद्र रत्नू !

__________________

३. हिंदु जनजागृती समितीच्या ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादात सहभाग

श्री. जय आहुजा

श्री. जय आहुजा यांनी वर्ष २०२१ मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘कोरोना लसीकरणामध्ये ‘सेक्युलरवाद्यां’कडून हिंदु-मुसलमान भेद’ या विषयावरील विशेष चर्चासत्रात सहभाग घेतला होता.

🚩 विशेष संवाद : 💉 कोरोना टीकाकरण में सेक्युलरवादियों का हिन्दू-मुस्लिम भेद !

यात त्यांनी लसीकरण करतांना पाकिस्तानातून भारतात आलेल्या विस्थापित हिंदूंविषयी भेदभाव होत असल्याविषयी आवाज उठवला. ‘हिंदु राष्ट्राची मागणी सत्यात उतरल्याविना या परिस्थितीत पालट होणार नाही’, असेही ते म्हणाले.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷