धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व

गुरु-शिष्य परंपरेचा र्‍हास झाल्याने मुलांना धर्मशिक्षण देण्याचे दायित्व आई-वडिलांवर !

सध्या हिंदु धर्म, संस्कृती आणि गुरु-शिष्य परंपरा यांचा र्‍हास झाला आहे. या सर्व गोष्टींना शिक्षणव्यवस्थेतून वेगळे करण्यात आले. पूर्वी गुरुकुलात ज्ञान, विज्ञान, दर्शन आणि वाङ्मय अशा सर्व प्रकारचे शिक्षण दिले जात होते. आधुनिक शिक्षणपद्धतीत धर्म आणि संस्कृती यांविषयी जाणून घेण्याची सुविधाच नाही. त्यामुळे मुलांना धर्मशिक्षण देण्याचे दायित्व आई-वडिलांचेच आहे. सर्वप्रथम हिंदु पालकांनी ‘धर्म’ समजून घेतला पाहिजे, तरच ते मुलांवर योग्य संस्कार करू शकतील.  – दीपाली पाटवदकर

१. ‘संस्कार’ म्हणजे काय ?

‘संग करोति’, असा संस्काराचा अर्थ आहे. ज्याने एखादी व्यक्ती परिपूर्ण बनते, त्याला ‘संस्कार’ असे म्हणतात. यश हा लहान लहान सवयींचा एकत्रित परिणाम असतो. या लहान सवयी, म्हणजेच संस्कार आहेत. आजूबाजूला एखादा दगड पडलेला असेल, तर आपण त्याच्याकडे पहातही नाही; पण जेव्हा दगडावर छिन्नीचे घाव घालून त्याची सुंदर मूर्ती घडवली जाते आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते, तेव्हा तिला पहाण्यासाठी मात्र दूरवरून लोक येतात. संस्कारांमुळेही असेच घडते. संस्कृतीच त्यांना ते साध्य करण्याची संधी देते. ‘बाहेरून आल्यावर हात-पाय धुतले पाहिजेत’, ‘स्वयंपाक करण्यापूर्वी अंघोळ केली पाहिजे’, या गोष्टी हिंदु संस्कृतीत सांगितलेल्या आहेत. आजच्या विज्ञानयुगातही हे लागू आहे. एकदा एका आधुनिक शल्यचिकित्सकांनी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सहकार्‍यांना हात धुण्याची सूचना केली. त्यानंतर तेथील मृत्यूदर न्यून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजच्या युगात मुले जे काही पहातात किंवा अनुभवतात, त्या सर्वांचा त्यांच्यावर संस्कारांच्या रूपात प्रभाव पडतो. आम्ही लहान होतो, तेव्हा आमच्याकडे कोणतेही माध्यम नव्हते. दूरचित्रवाहिनीही नव्हती. त्या वेळी आम्हाला केवळ बाहेर जाऊन खेळायचे इतकेच ठाऊक होते. बाहेर जाता आले नाही, तर आम्ही घरी बसून बैठे खेळ खेळायचो. आताची मुले संगणकीय खेळ खेळतात. मुले जे खेळ खेळतात, तीच त्यांची संस्कृती होते. सगळीकडे इतके वैचारिक प्रदूषण झाले आहे की, पालकांनाही कळत नाही की, मुलांना काय पाहू द्यावे ? काय पाहू देऊ नये ? आपल्या मुलांचे जीवन निरोगी, सुरक्षित आणि यशस्वी बनवायचे असेल, तर त्यांच्यावर आपला धर्म आणि संस्कृती यांनुसार चांगले संस्कार होणे आवश्यक आहे.

‘सामाजिक माध्यमे, ‘ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅॅटफॉर्म’ आणि दूरचित्रवाहिन्या मोठ्या प्रमाणात हिंदु धर्म, संस्कृती अन् परंपरा यांच्या विरोधात खोट्या कथानकांचा प्रसार करत आहेत. अशा वेळी नवीन पिढीमध्ये धर्म, ज्ञान आणि सांस्कृतिक मूल्ये रुजवणे, हे पालकांचे दायित्व आहे. या माध्यमातून आपल्याला सहस्रो वर्षांपासून मिळालेला वारसा जपला जाऊ शकतो. यासंदर्भात ‘प्राच्यम्’चे संचालक कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) यांनी ‘द चेंज मेकर्स’ या ‘पॉडकॉस्ट’मध्येसुप्रसिद्ध लेखिका दीपाली पाटवदकर यांची मुलाखत घेतली. दीपाली पाटवदकर यांनी मांडलेले विचार येथे देत आहोत.

२. धर्म आणि त्याचे व्यापक स्वरूप

सर्व काही ‘धर्म’ या एकाच शब्दात सामावलेले आहे. हिंदु धर्मात मुलगा, आई-वडील, सून, राजा, मंत्री, विद्यार्थी या सर्वांची कर्तव्ये सांगितलेली आहेत. विशेष परिस्थितीत धर्म वेगळा असू शकतो; पण सर्वसाधारण परिस्थितीत प्रत्येकाचे धर्मानुसार आचरण कसे असावे ?, हे हिंदु धर्मात सांगितले आहे. विद्यार्थ्याचा धर्म ‘प्रतिदिन अभ्यास करणे’, हा आहे; पण विशेष परिस्थितीत म्हणजे परीक्षेच्या काळात त्याला १६ घंटेही अभ्यास करावा लागू शकतो. त्याच वेळी अभ्यास करतांना कुठे आग लागली, तर आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवणे, हा त्याचा धर्म बनतो. वाहनचालकाने ‘वाहतुकीचे नियम पाळणे’, हा त्याचा धर्म आहे. अशाच प्रकारे जेव्हा प्रत्येक जण त्याच्या धर्माचे पालन करतो, तेव्हा समाजात आपोआपच उत्तम व्यवस्था निर्माण होते. त्यामुळे ‘स्व धर्मानुसार आचरण करणे, हीच धर्माची खरी व्याख्या आहे’, असे मला वाटते.


वडीलधार्‍यांकडून लहान मुलांवर होणारे संस्कार

वर्ष १९५०-१९५५ च्या आसपासची सत्य घटना आहे. ७-८ वर्षांचा एक मुलगा १ महिन्यापासून त्याच्या वाढदिवसाची वाट पहात असतो. वाढदिवसाच्या दिवशी तो शुचिर्भूत होऊन आजोबांना नमस्कार करतो. त्याला आजोबांकडून मिळणार्‍या भेटवस्तूविषयी पुष्कळ उत्सुकता असते; पण आजोबा त्याला गव्हाची दोन पोती देतात आणि दाराबाहेर बसून येणार्‍या-जाणार्‍या भिक्षेकर्‍यांना प्रत्येकी एक शेर (साधारण १ किलो) गहू देण्यास सांगतात. त्याच्यासाठी हे अनपेक्षित असते; पण तो नाईलाजाने आजोबांनी सांगितल्याप्रमाणे करतो. प्रत्येकाला धान्य देता देता त्याचा आनंद वाढत जातो आणि हळूहळू त्याच्या जवळील धान्य संपते. ‘आपल्याकडे देण्यासाठी आता काहीच नाही’, याचे त्याला वाईट वाटते. हाच वाढदिवसाचा संस्कार असतो.

विवाह संस्कार : एक परिपूर्ण यज्ञ !

विवाह हा एक यज्ञ आहे. त्यात होम करून अग्नीला प्रदक्षिणा घातली जाते. वधू आणि वर अग्नीला साक्षी ठेवून ‘आता आपण दोघे मिळून अर्थार्जन करू, एकत्र घर बांधू, संसार थाटू, मुलांचे संगोपन करू आणि एकमेकांचे चांगले मित्र होऊ’, अशी शपथ घेतात.

– दीपाली पाटवदकर

३. हिंदु धर्मग्रंथांमधून दिले जाणारे धर्मशिक्षण

जीवनात स्वतःचे आचरण कसे असावे ?, हे जाणून घेण्यासाठी ‘भगवद्गीते’त दया, क्षमा, शांती, अहिंसा असे १६ गुण सांगितले आहेत. ते सर्व गुण अभ्यासण्यासाठी ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ वाचणे अधिक श्रेयस्कर आहे. त्यांच्या कथेतील संवादांतून आपल्याला पुष्कळ शिकायला मिळते. महाभारतातील राजधर्माचे पालन करण्यासाठी ‘आपण राजाच असायला हवे’, हे आवश्यक नाही. प्रत्येक जण त्याच्या घरात, कार्यालयात किंवा क्षेत्रात ‘राजा’च असतो. तेथे त्याने आदर्श राजासारखे वर्तन करणे अपेक्षित आहे. रामायणात प्रभु श्रीरामाने नल याला समुद्रावर सेतू बांधण्यास सांगितले; पण त्या पुलाचे श्रेय प्रभु श्रीरामाने स्वत:कडे घेतले नाही; म्हणून ते त्याला ‘नल सेतू’ म्हणतात. आपण त्याला ‘रामसेतू’ म्हणू लागलो. रामायण, महाभारत, उपनिषदे यांसह सर्व पुराणांमधून आपल्याला अप्रत्यक्षपणे धर्मशिक्षणच मिळते. ‘कठोपनिषदा’तील नचिकेता आणि यम यांच्या कथेतून ऋषिमुनी अत्यंत कठीण गोष्टीही सोप्या करून शिकवतात.

४. शिक्षणाशी संबंधित विद्यारंभ संस्कार

प्राथमिक शिक्षणाने विद्यारंभ होतो. त्यात वाचन आणि लेखन करणे, गणिते सोडवणे, पाढे पाठ करणे इत्यादींचा समावेश होतो. या सर्व गोष्टी विद्यारंभाने चालू होतात. गुरुकुलात प्रवेश घेतल्यावर केवळ वेदच नाही, तर इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, वास्तूकला, कला आणि आयुर्वेद हे विषयही शिकवले जातात. ‘गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाले’, असे गुरूंना वाटते, तेव्हा ‘संवर्तन’ किंवा ‘पदवीदान समारंभ’ केला जातो. आजच्या भाषेत ‘दीक्षांत समारंभ’ विधी पार पडतो.

५. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार !

आपल्यावर सर्वप्रथम आई-वडील संस्कार करतात. त्यानंतर गुरु किंवा आचार्य संस्कार करतात. कधी कधी ते रागावतात, तर कधी ते प्रेमाने समजावून सांगतात. हे संस्कार करणे सोपे नाही; कारण ते सहज होत नाहीत. त्यासाठी पुष्कळ प्रयत्नांची आवश्यकता असते. पंचमहायज्ञ, म्हणजे स्वतःसाठीच केलेले विधी आहेत. ‘कुणीतरी येऊन आपल्यासाठी काही करावे’, असे किती काळ म्हणत रहाणार ? त्यासाठी आपण रामायण, महाभारत, पुराणे, उपनिषदे आणि वेद यांचे वाचन करावे. हा ब्रह्मयज्ञ होय.

दत्तगुरु म्हणतात, ‘२५ वे गुरु तुम्ही स्वतःच आहात.’ (श्री दत्ताने २४ गुरु केले होते.) त्यामुळे आई-वडिलांच्या नावाने रडगाणे न गाता ‘जीवन विद्या मिशन’चे संस्थापक सद्गुरु वामनराव पै यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’, हे लक्षात ठेवून आपणच स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे.


गर्भधारणा ते बाळाच्या पहिल्या वर्षापर्यंत करावयाचे धार्मिक संस्कार

अ. गर्भाधान संस्कार : भारताचे भविष्य, म्हणजे येणारी पिढी आहे. तिच्यावर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. हिंदु धर्मात जन्मापूर्वी ‘गर्भाधान संस्कार’ सांगितलेला आहे. चांगली आणि सुदृढ संतती व्हावी, यासाठी पती-पत्नी दोघेही इंद्रदेव अन् सूर्यदेव यांना प्रार्थना करतात.

आ. दोहद संस्कार (डोहाळे संस्कार) : ‘दोहद संस्कार’, म्हणजे ‘दोन हृदये.’ स्त्रीच्या शरिरात तिचे आणि बाळाचे अशी २ हृदये धडधडत असतात. हा संस्कार गर्भधारणेच्या शेवटच्या तिमाहीत येतो. आई आनंदी असेल, तर बाळही आनंदी आणि सुदृढ राहील. या संस्काराच्या निमित्ताने गर्भवतीला आईकडे (माहेरी) बोलावून विविध पदार्थ खाऊ घालतात. तिला संगीत ऐकवले जाते आणि चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यातून गर्भावर चांगले संस्कार केले जातात.

इ. नामकरण : जन्मानंतर ‘नामकरण’ संस्कार येतो. बाळाचे नाव किती अक्षरांचे असावे ?, हे ठरलेले आहे. मुलाचे नाव ‘सम’, तर मुलीचे नाव ‘विषम’ अक्षरांचे असते. बाळाच्या जन्म नक्षत्राप्रमाणेही नाव ठेवले जाते. त्यामुळे आपला जन्म कोणत्या नक्षत्रात झाला, हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता भासत नाही.

ई. निष्क्रमण : ‘निष्क्रमण’ या संस्काराच्या अंतर्गत बाळाला ४० दिवसांनंतर प्रथमच चार भिंतींच्या बाहेर काढले जाते. त्यामुळे संसर्ग टळतो. त्यानंतर एका विधीच्या अंतर्गत त्याला ‘सूर्यदर्शन’ घडवले जाते.

उ. अन्नप्राशन : अन्नप्राशन हा संस्कार साधारणपणे ८ व्या महिन्याच्या आसपास असतो.

ऊ. अन्य संस्कार : त्यानंतर मुंडन, कर्णवेध, विद्यारंभ, उपनयन, वेदारंभ, केशांत, समावर्तन, विवाह आणि सर्वांत शेवटचा अंत्यसंस्कार असे १६ संस्कार आहेत.

– दीपाली पाटवदकर

६. जीवनातील पंचमहायज्ञ

अ. ब्रह्मयज्ञ : ब्रह्मचर्य संपल्यानंतर विवाह होतो. त्यानंतर संसारातील दायित्वे वाढतात. ती पार पाडतांना प्रतिदिन पंचमहायज्ञ करावे लागतात. त्यातील पहिला यज्ञ, म्हणजे ब्रह्मयज्ञ होय. या यज्ञात अभ्यास करावा लागतो, शिकावे लागते आणि शिकवावे लागते. जर आपल्याला शिकवणे शक्य नसेल, तर कोणत्याही शैक्षणिक संस्थेला काही दान देऊ शकतो.

आ. देवयज्ञ : देवयज्ञ म्हणजे देवतांची उपासना होय. सृष्टीतील सूर्य, इंद्र, चंद्र, अग्नि, वायू, मरुत, पृथ्वी, आकाश, वने, झाडे आणि वनस्पती ही आपली दैवते आहेत. त्यामुळे देवयज्ञ, म्हणजे निसर्गाची सेवा करणे होय. आपल्याला देवघरातील पूजेसह निसर्गामध्येही देव पहायचा आहे.

इ. पितृयज्ञ : मुलांच्या संस्कारांमध्ये ‘पितृयज्ञ’ सर्वांत महत्त्वाचा आहे. यात आपल्याला घरातील वडीलधारी मंडळी आणि लहान मुले यांची काळजी घ्यावी लागते. आपली मुले आपल्यापेक्षाही चांगली व्हावीत, अशा प्रकारे त्यांच्यावर संस्कार होणे आवश्यक आहे. या यज्ञात प्रत्येकाला वडील आणि मुलगा यांची प्रतिदिन कर्तव्ये पार पाडावी लागतात.

ई. मानवता यज्ञ : यात आपल्या सभोवताली असलेल्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून साहाय्य करायचे असते.

उ. भूतयज्ञ : गृहस्थाश्रमात प्रत्येक जण आपल्यावर अवलंबून असतो. यात सर्व प्राणी, पक्षी, जीव, कीटक इत्यादीही येतात. मुलेही आपल्यावर अवलंबून असतात. यासमवेतच ज्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला आहे आणि जे निवृत्त झाले आहेत, तेही आपल्यावर अवलंबून असतात. त्यामुळे हा यज्ञ महत्त्वाचा असून यात सर्वकाही करावे लागते.

या ५ महायज्ञांच्या नंतर येतो, तो अंतिम यज्ञ अंत्यसंस्कार ! शेवटी स्वतःचे शरीर यज्ञात अर्पण करणे.

त्यानंतर स्वतःचा जीवनप्रवास संपतो.

७. चांगली मूल्ये आत्मसात् केल्यास जीवन यशस्वी होते !

आपल्या मुलांमध्ये चांगली मूल्ये रुजवणे पुष्कळ महत्त्वाचे आहे; कारण संस्कृती केवळ मूल्यांच्या माध्यमातूनच जतन केली जाऊ शकते. आपण चांगली मूल्ये आत्मसात केली, तर आपले जीवन सुंदर, यशस्वी आणि अर्थपूर्ण होईल ! आपण आपले धर्मग्रंथ वाचले पाहिजेत. संस्कृत येत नसेल, तर धर्मग्रंथ आपल्या मातृभाषेत तरी वाचले पाहिजेत. कसेही करून धर्मशिक्षित होऊन मुलांना चांगले संस्कार देणे महत्त्वाचे आहे.’

– दीपाली पाटवदकर, सुप्रसिद्ध लेखिका आणि व्याख्यात्या, पुणे.

(साभार : ‘प्राच्यम्’)