हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस

आस्थापनांना ध्वनीमर्यादा १० डेसिबलने वाढवण्यास अनुमती मिळणार 

पणजी, २७ जून (वार्ता.) – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ हणजूण आणि वागातोर परिसरातील व्यावसायिक आस्थापनांची संख्या अन् ‘सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट’ यांनी सिद्ध केलेला ध्वनीप्रदूषण नकाशीकरण (नॉईज मॅपिंग) अहवाल यांच्या आधारे हणजूण-कायसूव ग्रामपंचायत क्षेत्राला ध्वनीप्रदूषण नियमांनुसार ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची शिफारस पर्यावरण विभागाकडे करण्याची शक्यता आहे. हणजूण परिसरात सध्या ९०० हून अधिक व्यावसायिक आस्थापने कार्यरत आहेत.

सध्या निवासी क्षेत्रासाठी दिवसाच्या वेळी ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल इतकी ध्वनीमर्यादा आहे, तर व्यावसायिक क्षेत्रासाठी ही मर्यादा दिवसाच्या वेळी ६५ डेसिबल आणि रात्री ५५ डेसिबल आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हणजूण परिसरात ‘रिअल-टाइम ऑनलाईन नॉईज मॉनिटरिंग स्टेशन’ उभारण्यासाठी सिद्ध केलेल्या प्रारूप अहवालात नमूद केले आहे की, या परिसरातील ध्वनीची पातळी वाढण्यामागे वाहतुकीचा मोठा वाटा आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीमुळे निर्माण होणारा आवाज हा संगीत कार्यक्रमांमुळे होणार्‍या आवाजाइतकाच किंवा त्याहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. ‘सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या एका अहवालानुसार हणजूण, वागातोर आणि हडफडे किनारपट्टी भागात वाढलेली पर्यटकांची संख्या अन् रात्री उशिरापर्यंत चालू रहाणारे पर्यटन आणि मनोरंजन यांच्याशी संबंधित उपक्रम (नाईट लाईफ) यांमुळे ध्वनीप्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे आणि यांमुळे स्थानिक नागरिकांना आरोग्य, शांतता अन् जीवनमान यांच्याविषयी चिंता भेडसावत आहेत.