भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

अल्पवयीन आरोपी कह्यात

(प्रतिकात्मक चित्र)

ठाणे – भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात ७ वर्षांच्या चिमुरडीवर खाऊचे आमीष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. पीडित मुलगी भावासमवेत खेळत असतांना अल्पवयीन आरोपीने तिला पैशांचे आणि खाऊचे आमीष दाखवत त्याच्या खोलीत नेले. त्यानंतर मुलीच्या भावाला पाणी आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवून आरोपीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. घरी परतल्यानंतर मुलीने पालकांना घडलेला प्रकार सांगितला. पालकांच्या तक्रारीनंतर नारपोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शहरातून पसार होण्याच्या सिद्धतेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला कह्यात घेतले. पीडित मुलीला भिवंडी येथील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नारपोली पोलीस ठाण्याच्या बाहेर गर्दी करून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केला आहे. (गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याने अशा घटनांचे प्रमाण वाढत आहे ! – संपादक)