Foreign Universities In India :  १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती

नवी देहली – केंद्र सरकारने १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा (कॅम्पस) चालू करण्यासाठी संमत्ती दिली. या विद्यापिठांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एबरडीन, ब्रिस्टल, यॉर्क, इलिनोइस टेक, लिव्हरपूल आणि व्हिक्टोरिया यांसारख्या नामांकित विद्यापिठांचा समावेश आहे. मुंबई, देहली आणि बेंगळुरू येथे या विद्यापिठांच्या शाखा चालू होणार आहेत. सरकारने या विद्यापिठांना हेतूपत्र (लेटर ऑफ इंटेंट) दिले आहे. त्यामुळे यातील काही विद्यापिठांच्या पहिल्या शैक्षणिक सत्राला ऑगस्टपासून प्रारंभ होईल. या विद्यापिठांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना संबंधित विदेशी विद्यापिठांची पदवी मिळणार आहे. यामुळे आता परदेशी विद्यापिठाची पदवी घेण्यासाठी परदेशात जाण्याची आवश्यकता नसेल.

आरंभी या विद्यापिठांमध्ये २०० ते २५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. पुढील ५ वर्षांत हे प्रमाण वर्षाला १ सहस्र ते १ सहस्र २०० विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात कृत्रिम बुद्धीमत्ता, संगणकशास्त्र आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांवर भर दिला जाणार आहे.