केरळम्मध्ये जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यातूनच चोरीला !

मलप्पुरम् (केरळम्) – जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आलेले ९३.३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मलप्पुरम् जिल्ह्यातील कारीपूर पोलीस ठाण्यातून चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

१. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही प्रवासी हे दागिने विसरले होते. तेथे सापडलेले ३ सोन्याचे हार, २ कानातले, १ अंगठी आणि १ ब्रेसलेट नागरिकांनी प्रामाणिकपणे आणून पोलीस ठाण्यात जमा केले होते.

२. ‘ज्यांचे दागिने हरवले आहेत त्यांनी येऊन ओळख पटवून ते घेऊन जावेत’, या उद्देशाने ते पोलीस ठाण्यात कपाटात सुरक्षित ठेवण्यात आले होते; मात्र आता हे दागिनेच गायब झाले आहेत.

३. यामुळे संपूर्ण पोलीसदलाची मोठी नाचक्की झाली आहे. पोलीस ठाण्यातीलच कुणी हे कृत्य केले आहे कि बाहेरच्या कुणी व्यक्तीने केले आहे ?, हे शोधण्यासाठी कारीपूर पोलीस ठाण्यातील ‘सीसीटीव्ही’चे चित्रीकरण पडताळले जात आहे. यासह पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे जबाब आधीच नोंदवण्यात आले आहेत.

४. ‘अन्वेषण पूर्ण करून काही दिवसांतच मलप्पुरम् जिल्हा पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर केला जाईल’, असे अन्वेषण अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

जेथे पोलीस ठाणेही चोरांपासून सुरक्षित नसेल, तेथे सर्वसामान्य नागरिकांची घरे किती सुरक्षित असतील ?, हे वेगळे सांगायला नको ! केरळम्मधील काँग्रेस सरकारला हे लज्जास्पद !