संपादकीय : अघोषित ‘ब्रेनवॉशिंग’ !

हिंदूंमध्ये व्यापक स्तरावर जागृती होऊ नये, याची पद्धतशीर काळजी भारतातील प्रस्थापित व्यवस्था घेत आल्या आहेत. देशावर गेले दशकभर हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असले, तरी प्रशासकीय व्यवस्था मात्र साम्यवादी आणि वसाहतवादी दृष्टीकोन बाळगणारी असल्याने ती भारतहिताला मारक ठरत आहे. वर्ष २०१४ च्या आधी किमान ६ दशके भारताचे व्यापक कथानक हे व्यवस्थेला हाकणार्‍या साम्यवाद्यांच्या हाती होते. एवढे की, ११ वर्षे होऊन गेली आणि भारताचे नवे शिक्षण धोरण कार्यवाहीत येऊ लागले असले, तरी ‘हिंदु’ भारतावरील ऐतिहासिक ‘अन्यायां’ना केंद्र सरकारला अजूनही पूर्णपणे न्याय मिळवून देता आलेला नाही. ‘जो स्वत:चा इतिहास विसरतो, त्याने त्याच्या भूगोलाचीही तिलांजली दिली पाहिजे’, असे जे म्हटले जाते, ते भारतासाठी तंतोतंत लागू पडते. त्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न सध्या नव्याने केला जात आहे. पदार्थविज्ञानाचा एक प्रतिभावान प्राध्यापक नीरज अत्री ! अल्बर्ट आईन्स्टाईन, नील्स बोर, मायकल फॅराडे, इर्विन स्क्रोडिंजर यांसारख्या पदार्थविज्ञानाच्या महान वैज्ञानिकांचे शोध आणि त्याआधारे विकसित झालेले तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये स्वत:ची प्रतिभा पणाला लावून अत्यंत महत्त्वपूर्ण वैज्ञानिक कार्य करणार्‍या या प्राध्यापकाला ते सर्व सोडून इतिहासात शिरावेसे वाटले ! याला कारण आहे भारतियांमध्ये, म्हणजेच हिंदूंमध्ये पराभूत मानसिकता आणि न्यूनतेची भावना उद्दिपित करणारी सध्याची भारतीय शिक्षणव्यवस्था ! अत्याधुनिक जीवनशैली जगणार्‍या भारतीय समाजाला किमान हिंदु बुद्धीमंतांना ‘या प्राध्यापकाला असे का करावेसे वाटले’, हा प्रश्न खचितच पडला पाहिजे; परंतु तो प्रश्न पडण्यासाठी त्याची कथा जगासमोर आणली गेली पाहिजे. ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ या अगदी आठवड्याभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला समाजासमोर येऊ न देण्याचे पद्धतशीर अघोषित प्रयत्न चालवण्यात येत आहेत. या चित्रपटाला चांगली अथवा प्रेक्षकांना जाण्यास सोयीची चित्रपटगृहे मिळू न देणे, भर दुपारचा अथवा रात्री उशिरा चित्रपटाचा ‘शो’ निर्धारित करणे, अशा प्रकारे चित्रपटाला हेतूपुरस्सर दाबण्याचे षड्यंत्र आखले गेले आहे.

दुष्प्रचाराचा कहर !

गेल्या शतकातील बंगालचे प्रसिद्ध इतिहासकार आर्.सी. मजूमदार म्हणत, ‘हे अत्यंत दु:खद आहे की, इतिहासाचे विकृतीकरण आता राजकारण्यांपुरते सीमित राहिले नसून व्यावसायिक इतिहासकारही ते करत आहेत.’ ही वर्ष १९८० च्या आधीची गोष्ट ! वर्ष २०२५ येता-येता वास्तविक इतिहास समाजापर्यंत पोचू दिला न जाणे, ही दशा त्यापेक्षा अधिक धोकादायक आणि हिंदूंचा घात करणारी आहे. भारताचा यथार्थ इतिहास हिंदु समाजापासून लपवण्यासाठी चालू असलेल्या गेल्या १५० वर्षांच्या कुटील डावांना उघडे पाडण्याचा सुंदर प्रयत्न या ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ चित्रपटातून करण्यात आला आहे. प्रा. नीरज अत्री यांनी लिहिलेल्या ‘ब्रेनवॉश्ड रिपब्लिक’ या पुस्तकावर आधारलेला हा चित्रपट ! त्यांच्या पुस्तकाने ‘वैचारिक आतंकवादा’चा भांडाफोड केला आहे. त्यांनी यात स्पष्ट केले आहे की, ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ची पाठ्यपुस्तके लिहिणारे चांगले इतिहासकार नसून दुष्प्रचारक (प्रॉपेगँडिस्ट) आहेत. या कथित लेखकांनी भारताच्या इतिहासाचा कहर केला आहे. आपल्या संस्कारक्षम अशा लक्षावधी शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे पूर्वज, संस्कृती आणि देश यांचा द्वेष नि आत्यंतिक तिरस्कार करण्यासाठी या माध्यमातून अक्षरश: प्रशिक्षित केले गेले. त्यामुळेच आपल्याकडे ‘अकबर’, ‘टिपू सुलतान’ हे गौरवशाली राजे, तर ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘भगतसिंह’ हे आतंकवादी ठरतात, ‘मनुस्मृति’, ‘वेद-उपनिषदे’ ही अत्यंत जटील, स्त्रीविरोधी, भेदभावाचा विचार शिकवणारे धर्मग्रंथ बनतात.

सत्याकडे वाटचाल !

सध्याच्या काळात ‘सोशल मिडिया’मुळे संपूर्ण जग आपल्या तळहातावर आले आहे. त्यामुळेच हिंदु मन:पटलावर जरी त्यांच्या संस्कृती, परंपरा यांना हीन लेखण्याचे संस्कार त्यांच्या कोवळ्या वयात झाले असले, तरी काही प्रमाणात ते पुसण्याचे प्रयत्न होत आहेत. आधी हिंदूंच्या डोळ्यांवर चढवण्यात आलेल्या ‘साम्यवादी’ चष्म्याला उतरवण्याचा प्रयत्न तितकासा यशस्वी होत नव्हता. आता मात्र या अज्ञानाचे स्थान टप्प्याटप्प्याने संभ्रमावस्था, शंका आणि पुढे दाट संशय यांनी घेतले. ‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरला स्टोरी’ आदी चित्रपटांच्या माध्यमातून हिंदु धर्म आणि हिंदू यांवर कशा प्रकारे अन्याय, अत्याचार झाले, हे समोर आले. कोट्यवधी हिंदूंसमोर या पीडित हिंदूंच्या अत्याचारांना वाचा फोडण्यात आली. वर्ष १९९० च्या दशकातील काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद आणि हिंदूंच्या मुळावर उठवलेला ‘लव्ह जिहाद’ या सांप्रत काळातील षड्यंत्रांचा बुरखा फाडणारे हे चित्रपट ! ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ हा चित्रपट मात्र ब्रिटीशकालीन १०० वर्षे आणि स्वतंत्र भारतातील ७५ वर्षे अशा पावणे दोनशे वर्षांच्या नीच हिंदुद्वेष्ट्या प्रयत्नांचा – या संपूर्ण षड्यंत्राचा भांडाफोड करणारा आहे. थोडक्यात हा मुळावर, ‘डीप स्टेट’वर घाव घालणारा चित्रपट आहे. त्याच्या परिणामकारकतेमुळेच त्याला अत्यंत चतुराईने अघोषित विरोध होत आहे, त्याला ‘सायलेंटली किल’ केले जात आहे.

एखाद्याला वाटेल की, जर हा चित्रपट हिंदुहित साधणारा आहे, तर हिंदुद्वेष्ट्या ‘सेन्सॉर बोर्डा’ने तरी त्याला हिरवा कंदील कसा काय दिला ? जेव्हा जेव्हा हिंदूंमध्ये जागृती करणारे चित्रपट निघतात, तेव्हा तेव्हा त्या चित्रपटांतील काही दृश्ये आक्षेप घेऊन काढण्यासाठी दबाव आणला जातो. यामुळे साहजिकच चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वी प्रसिद्धी मिळते. या वेळी मात्र वेगळी खेळी खेळण्यात आलेली दिसते. सेन्सॉर बोर्डाने चित्रपट प्रसारणाची अनुमती दिली; परंतु नंतरच्या ‘माफिया इकोसिस्टम’ने त्याला पद्धतशीरपणे चित्रपटगृहे नाकारली. या माध्यमातून राष्ट्रविघातक शक्तींकडून एक नवा पायंडा पाडला जात आहे का ? काहीही झाले, तरी या शक्तींशी दोन हात करण्याची या चित्रपटाच्या निमित्ताने मात्र ही नामी संधी हिंदूंनी दवडता कामा नये.

प्रत्येक हिंदूची ‘स्टोरी’!

आता हिंदूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या चित्रपटाच्या प्रसारणासाठी सुनियोजित प्रयत्न केले पाहिजेत. भाजप, शिवसेना, रा.स्व. संघ यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ पक्ष अन् संघटना, भारतप्रेमी स्वयंसेवी संस्था यांनी चित्रपटाला प्रायोजित करणे, शाळा-महाविद्यालयांत त्याचे ‘शो’ ठेवणे आदी योजना आखल्या पाहिजेत. चित्रपटाचा आधार असलेले ‘ब्रेनवॉश्ड रिपब्लिक’ पुस्तकाच्या लक्षावधी प्रती विकण्याची व्यवस्था झाली पाहिजे. ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ खरेतर केवळ एका प्राध्यापकाच्या इतिहासाची कथा नाही, तर प्रत्येक ‘हिंदु भारतिया’ला अंधारात ठेवण्याची कथा आहे, अशी संवेदनशीलता निर्माण झाली, तर आणि तरच त्याच्या प्रसारणासाठी नि अघोषित ‘ब्रेनवॉशिंग’च्या विरोधात हिंदूंकडून प्रयत्न होतील !

‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ ही केवळ एका प्राध्यापकाची कथा नसून प्रत्येक हिंदूला अज्ञानात ठेवण्याची कथा आहे, हे जाणा !